गुजरातमध्ये तुल्यबळ!
 महा एमटीबी  11-Dec-2017
जनमत चाचण्यांचे निष्कर्ष हवामान खात्याच्या अंदाजासारखे असते. कधी अंदाज खरा ठरतो, तर कधी सपशेल खोटा! जनमत चाचण्यांचेही तसेच आहे. एक ताज्या जनमत चाचणीने गुजरातमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यातील लढत आता तुल्यबळ झाली असल्याचा निष्कर्ष काढला आहे. भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43- 43 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जागा मात्र भाजपाला जादा मिळतील असे सांगण्यात आले आहे. अन्य एका जनमत चाचणीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर दुसर्‍या दोन जनमत चाचण्यांनी भाजपाला बहुमत मिळण्याचा अंदाज सांगितला आहे.
 
तीन महिन्यांत घसरण
सर्व जनमत चाचण्यांमध्ये दिसणारा एक समान धागा म्हणजे भाजपाच्या जागा कमी होतील असे आढळून आले आहे. गुजरातमध्ये भाजपाचे सरकार येईल, पण कमी मताधिक्याने असे बहुतेक जनमत चाचण्यांनी म्हटले आहे. सीएसडीएस-लोकनीती या संस्थेची ही चाचणी आहे. तीन महिन्यांपूर्वीच्या चाचणीत भाजपाला 153 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. महिनाभरापूर्वी 120 जागांचा अंदाज वर्तविण्यात आला होता, तर ताज्या चाचणीत भाजपाला 100 च्या खाली दाखविण्यात आले आहे. हे तिन्ही निष्कर्ष एकाचवेळी खरे ठरू शकत नाहीत. एकतर पहिला 153 जागांचा निष्कर्ष चुकीचा असला पाहिजे वा ताजा 95 जागांचा निष्कर्ष चुकीचा असला पाहिजे. मोदी गुजरातचे मु‘यमंत्री असताना भाजपाला कधी 153 जागा मिळाल्या नाहीत त्या आता मिळतील असा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल. आणि तीन महिन्यांत भाजपा 153 वरून 95 च्या आसपास घसरला आहे असे मानणे चुकीचे ठरणार आहे.
 
सरळ लढत
गुजरातमधील निकाल कसे असतील, हे सांगण्याच्या स्थितीत आज कुणीही नाही. आणखी काही संस्थांनी जनमत चाचण्या केल्या आहेत. त्यातील एका चाचणीत तर काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. गुजरात निकालांना अद्याप काही दिवस बाकी असले तरी या निवडणुकीबाबत काही बाबी सांगता येतील. त्यातील एक बाब म्हणजे गुजरातमधील लढत भाजपा-काँग्रेस अशी झाली आहे. यात शंकरसिंग वाघेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. वाघेलांना किंगमेकर व्हावयाचे होते. भाजपाला बहुमतासाठी काही जागा कमी पडाव्यात असा त्यांचा प्रयत्न होता. या निवडणुकीत त्यांचा पार सफाया होत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा सफाया ठरलेला आहे. राजकारणात नेहमीच दुहेरी खेळी चालत नाही हे पवार-पटेल जोडीच्या लक्षात आले असावे. भाजपाला पराभूत करण्यासाठी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल करत होते. राहुल गांधींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. काँग्रेसशी युती करून 4-5 आमदार निवडून आणावयाचे व निवडणूक झाल्यावर भाजपाकडे जायचे ही पटेल-पवार यांची खेळी लक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही करता आलेले नाही.
 
आप- साफ
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबनंतर आपला मोर्चा गुजरातकडे वळविला होता. पंजाबमध्ये आपचे स्वप्न भंगले. त्याचा परिणाम दिल्लीवर झाला. केजरीवाल यांना दिल्लीतील बवाना पोटनिवडणुकीने साथ दिली. त्यांनी ही जागा कायम राखली. अन्यथा आपचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. आम आदमी पक्षाने बवानाची जागा गमावली असती तर आपचे सरकार जाणे निश्चित होते. ते टळले. राजकीय वास्तव ओळखून केजरीवाल यांनी दिल्लीवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. गुजरातमध्ये त्यांनी काही उमेदवार उभे केले असले तरी त्याचा काहीही परिणाम गुजरातच्या निवडणुकीवर होण्याची चिन्हे नाहीत. म्हणजे दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान अशी राज्ये पादाक्रांत करीत नवी दिल्लीचे-देशाचे राज्य मिळविण्याची जी महत्त्वाकांक्षा केजरीवाल यांच्या मनात तयार झाली होती, ती आता शांत झाली आहे. दिल्ली वगळता आपल्याला फार वाव नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दिल्ली सरकारकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे.
 
मोदी विरुद्ध राहुल
गुजरात विधानसभा निवडणुकीने मोदी विरुद्ध राहुल ही स्थिती तयार केली आहे. गुजरात विधानसभेचे निकाल काहीही लागले तरी 2019चा मुकाबला मोदी विरुद्ध राहुल असा होईल. गुजरातच्या निवडणुकीचे निकाल कसे असतील हे तर 18 तारखेला स्पष्ट होईल. मात्र, याचा तातडीने झालेला परिणाम म्हणजे राहुल गांधींना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाली आहे. 2019 मध्ये मोदी विरुद्ध कोण, असा प्रश्न होता. गुजरात निवडणूक प्रचाराने तो सोडविला असून, मोदी विरुद्ध राहुल असे चित्र तयार झाले आहे.
 
सोनियाचा अस्त
गुजरात प्रचारमोहीम सुरू असतानाच राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदी निवडण्याची प्रकि‘या सुरू करण्यात आली. याने सोनिया गांधींच्या राजकीय जीवनाचा एकप्रकारे अस्त होत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या 132 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविण्याचा विक‘म त्यांच्या नावावर आहे. सलग 19 वर्षे त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले. त्यातील 10 वर्षे त्यांचा पक्ष संयुक्त सरकारात सत्तापक्ष राहिला. जगाच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना असेल. याला सोनिया गांधींचे कर्तृत्व म्हणावयाचे की काँगे‘स नेतृत्वाचे नाकर्तेपण याचे उत्तर इतिहास देईल. आता सोनिया गांधी काँग्रेसच्या राजकारणात सकि‘य राहणार नाहीत असे समजते. मात्र, ज्येष्ठ-वरिष्ठ नेत्यांना हाताळण्यासाठी त्या पडद्यामागे राहून राहुल गांधींना मदत करतील. त्यांना कोणते पद दिले जाईल की नाही याची कल्पना काँग्रेस नेत्यांना नाही. मात्र, सोनिया युग संपले असे पक्षात मानले जात आहे. त्याचप्रमाणे प्रियंका गांधींना पक्षाचे अध्यक्ष करण्याचा विचार काही नेते करत होते. राहुल-प्रियंका यांच्यातील संबंध सलो‘याचे राहिलेले आहेत. राहुलच्या अध्यक्षपदानंतर प्रियंकाला अध्यक्ष करण्याचा विचारही संपुष्टात आला आहे.
 
वादळी अधिवेशन
संसदेचे हिवाळी अधिवेशन या आठवड्यापासून 15 तारखेपासून सुरू होईल. अधिवेशनाला रंगत येईल ती 18 तारखेपासून गुजरातचे निकाल जाहीर झाल्यानंतर. काँग्रेस पक्ष सध्या तरी संसद चालू देण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. तसा संकेत काँग्रेस नेते खाजगीत बोलताना देत आहेत. आणि गुजरातमध्ये काँग्रेसला काही जागा जादा मिळाल्या तरी ते टॉनिक काँग्रेसला पुरेसे ठरणार आहे. संसदेचे हे अधिवेशन मोदी सरकारसाठी सर्वात वादळी अधिवेशन ठरेल असे विरोधी पक्षांमधून सांगितले जात आहे. एक नेता म्हणाला, अधिवेशन चालणार नाही हे निश्चित. सत्ताधारी पक्षाने आम्हाला भरपूर मुद्दे दिले आहेत. गुजरातचे निकाल काहीही लागले तरी आम्ही आमची आक्रमकता सोडणार नाही. गुरुदासपूरपासून, चित्रकूटपर्यंत आम्हाला जनतेचा कौल लक्षात आला आहे. त्याचे प्रतिबिंब संसदेच्या अधिवेशनात दिसून येईल.