भारतीय संस्कृती
 महा एमटीबी  10-Dec-2017

भारतीय संस्कृती ही नेहमीच पाश्चात्यांच्या आकर्षणाचा आणि जिज्ञासेचा विषय ठरली आहे. येथील प्रत्येक राज्याची स्वतःची अशी जीवनशैली, वास्तुशिल्पे, खाद्यसंस्कृती, विशिष्ट पेहेराव, नृत्य-कला-साहित्य यांच्यातील विविधता ही निव्वळ जिज्ञासा न राहता विदेशी पर्यटकांसाठी अभ्यासाचा विषयही ठरली आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी जन-गण-मन म्हणताना आम्हा मुलांचा आवाज अगदी टिपेला जायचा. 'पंजाब-सिंध-गुजरात-मराठा-द्राविड-उत्कल-बंग’ हे म्हणताना त्या नकळत्या वयातही भारताची विविधता उमजत होती, हे विशेष. हळूहळू पाठ्यपुस्तकातून आपला ऐतिहासिक वारसा आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची जाणीव झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासूनच उदात्त मूल्यांचा आणि समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलाय आणि आपण जबाबदार नागरिक म्हणून त्याचे संवर्धन आणि संगोपन करायचे आहे, ही जाणीव त्याच वयात शिक्षकांनी रुजवली.

आशिया खंडात भारताची ओळखच मुळी 'ऐतिहासिक संस्कृती लाभलेला देश’ अशी आहे. भाषा, राहणीमान, खानपान, नृत्य-कला-संगीत, साहित्य, स्थापत्यशैली, पोशाख या सर्वांशी त्या त्या प्रदेशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी निगडित आहे. भारतातील प्राचीन स्थापत्यशैली ही शास्त्रज्ञांच्याही कुतूहलाचा विषय आहे. भव्यता, हवा आणि सूर्यप्रकाश यांची वास्तुशास्त्रानुसार केलेली मांडणी, या वास्तुंवरील शिल्पकाम हे तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे निदर्शक आहेत. ताजमहाल, बिबी का मकबरा, कुतुबमिनार, शिवरायांचे गडकोट, जलदुर्ग, शनिवारवाडा, खजुराहोची लेणी, नालंदा विद्यापीठ, कोणार्क सूर्यमंदिर, अजंठा लेणी अशी कितीतरी वास्तुशिल्पे बघताचक्षणी आपण अचंबित होतो. आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसतानाही या भव्य वास्तूंची आखीवरेखीव बांधणी आणि मोहून टाकणारे सौंदर्य, त्यातील जिवंतपणा पाहून आपण भारावून जातो. शिल्पकलेप्रमाणेच आपले वेद, उपनिषदे, प्राचीन शिलालेख हे तत्कालीन व्यापारी आणि भारतभ्रमणाकरिता आलेल्या युरोपियन, चिनी पर्यटकांमार्फत जगभर प्रसारित झाले. रामायण आणि महाभारत ही खंडकाव्ये आजच्या २१ व्या शतकातील तरुणांनाही उद्बोधक ठरताहेत, हा एक त्यांचा विशेष ! ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, गुरुनानक, कबीर, चक्रधर स्वामी या संतांनी अभंग, भारूडे, दोहे यांच्यामार्फत दिलेला समतेचा, बंधुतेचा ठेवा तर सदोदित आपले विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी जागरूक ठेवणारा. तत्कालीन समाजप्रवाहाविरुद्ध बंड करून या संतांनी जात-पात, धर्मभेद यांविषयी जे निर्भीडपणे आपल्या काव्यातून मांडले ते आजही सामान्य जनता आणि राज्यकर्त्यांना विचार करायला लावणारे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लो. टिळक, आगरकर, साने गुरुजी यांनी केसरी, साधना यांसारख्या विविध वर्तमानपत्रे, मासिके यातून समाजउद्बोधन तर केलेच पण समाजात विचारक्रांती आणली. 'भारतीय साहित्य’ हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्या त्या विशिष्ट कालखंडातील समाजमनाचा तो जणू आरसाच आहे.
भारत हा जगातील सर्वात जास्त सामाजिक सुधारणा झालेला तसेच प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे. येथे प्रामुख्याने हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख धर्मांचा प्रभाव आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार जवळपास ८० टक्के लोकसंख्या हिंदू धर्माची तर १४.२ टक्के लोकसंख्या ही मुस्लीमधर्माची अनुयायी आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेनुसार (Pew Research Center ) २०५० पर्यंत हिंदू-मुस्लीम लोकसंख्या ३११ दशलक्ष म्हणजेच सर्वाधिक असेल.

भारतीय साहित्य, वास्तुशैलीप्रमाणेच भारतीय पेहेरावही लक्षात राहण्याजोगा. अश्मयुगीन काळात जनावरांची कातडी पांघरणारा अश्मयुगीन मानव प्राण्यांच्या हाडापासून सुया बनवून त्यापासून कातडे शिवून ते परिधान करू लागला. त्यानंतर शेतीचा शोध लागल्यावर तो कापूस पिकवू लागला. कापूस पिकविणार्‍या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वप्रथम आहे. त्यानंतर या कापसापासून वस्त्र बनवून पुरुष लुंगीसारखे तर स्त्रिया अंगाभोवती गुंडाळून साडीसारखे परिधान करू लागल्या. साडी हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कापड, वस्त्र असा होतो. त्यानंतर जेव्हा चीनमधून टोकदार सुया भारतात आल्या त्यानंतर कापड शिवून त्याची विविध प्रकारची वस्त्रप्रावरणे तयार होऊ लागली. त्यानंतर विविध प्रकारांत कपडे वापरले जाऊ लागले. साड्यांमध्येही विविध रंगांच्या आणि विविध धाग्यांपासून बनविलेल्या साड्या वापरल्या जाऊ लागल्या. त्यातही श्रीमंत, कुलीन, उच्च मानमरातब असलेल्या स्त्रिया मलमलपासून बनविलेल्या साड्या तर इतर स्त्रिया कॉटनच्या साड्या वापरीत. तेव्हा साधारणतः नऊवार साड्या प्रचलित होत्या. हळूहळू पाचवार वा सहावार साड्या नेसल्या जाऊ लागल्या. आता तर साड्यांऐवजी सलवार सूट, जीन्स हे स्त्रियांना सोयीचे वाटू लागले. पितृसत्ताक कालखंडात केवळ पतीचे घर, संसार सांभाळणार्‍या स्त्रिया आणि आता घरसंसार सांभाळून नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय अगदी लीलया सांभाळणार्‍या स्त्रियांचा पोशाख हाही एका सामाजिक स्थित्यंतराचाच भाग आहे.
शृंगार हा तसा स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी अश्मयुगीन कालखंडातही विविध आकाराच्या, रंगाच्या दगडांपासून बनविलेले दागिने स्त्रिया वापरत. धातूचा शोध लागल्यावर दागिन्यांमध्ये नाविन्य आले. राजपूत, मोगलकालीन स्त्रिया, पेशवाई काळातील स्त्रियांच्या आभूषणांमध्ये, त्याकाळी वापरली जाणारी धातूची भांडी, तसेच संगीताची वाद्ये यांच्यातही त्यावेळच्या देवीदेवता, प्राणी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली एकत्र कुटुंबपद्धती हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक मानला जातो. त्यामुळेच परंपरागत चालत आलेले आपले विचार, सणवार, आपल्या रितीभाती आणि वडीलधार्‍यांच्या सहवासामुळे नकळत मिळणारे संस्कार पुढील पिढीत संक्रमित होताना दिसतात. हळूहळू नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतर करणार्‍या नव्या पिढीमुळे विभक्त कुटुंबपद्धती रूजली. त्यामुळेच कदाचित मानसिक असुरक्षितता, एकलकोंडेपणा, ताणतणाव, नैराश्य, वैफल्य या गोष्टींचा सामना करताना एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
भारतीय संस्कृतीत लग्न हा एक सोहळा मानला जातो. इथल्या विविध धर्मांमध्ये तो वेगवेगळ्या रितीने पार पडत असला तरी प्रत्येक कुटुंबासाठी तो एक पवित्र विधी असतो. इथल्या धारणेनुसार हा सोहळा केवळ दोन व्यक्तींनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनाही एकत्र आणतो. भारतात पूर्वापार कुटुंबीयांनी ठरवून केलेल्या विवाहाला मान्यता असली तरी सामाजिक स्थित्यंतरानुसार हळूहळू जातीबाहेर, धर्माबाहेरही प्रेमविवाह होऊ लागले, नव्हे तर ते काळाची गरज बनले. भारतीय संस्कृतीची आणखी एक ओळख म्हणजे तिचे संगीत. प्राचीन काळातही राजेरजवाड्यांच्या दरबारात नृत्यसंगीताची मैफल भरत असे. सिंधू नदीच्या खोर्‍यात झालेल्या उत्खननाच्या वेळी पुरातत्वशास्त्रज्ञांना तिथे अनेक प्रकारच्या बासर्‍या आणि संगीतासाठी वापरली जाणारी तंतुवाद्ये आढळली. शास्त्रीय गायन हे तेव्हा प्रचलित व प्रसिद्ध होते. १६ व १७ व्या शतकात तीन तारा असणारी सतार खूप लोकप्रिय होती. आधुनिक काळात कर्नाटकी संगीत, लोकसंगीत, ठुमरी, सूफी संगीत, कव्वाली अशा विविध प्रकारच्या संगीताचा भारतीय पुरेपूर आस्वाद घेताहेत.

पुरातत्व खात्याला उत्खननादरम्यान आणखी एक गोष्ट आढळली ती म्हणजे नृत्याच्या मुद्रेतील एक मूर्ती. त्याकाळी मनोरंजनाकरिता किंवा आपल्या आराध्य देवतेला प्रसन्न करण्यासाठी बहुधा नृत्य करीत असावेत. प्राचीन इतिहासातील नोंदीनुसार विविध सणांच्या निमित्ताने अथवा एखाद्या विशिष्ट सोहळ्यावेळी तिथे भलेमोठे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असत आणि नर्तकांचे विविधरंगी पोषाख व त्यांचे विलोभनीय नृत्य पाहण्यासाठी लोक एकत्र जमत असत. भारतात प्रत्येक प्रदेशाची स्वतःची अशी नृत्यशैली आहे. त्यात आदिवासी लोकनृत्याबरोबरच कुचिपुडी, भरतनाट्यम, कथ्थकली अशी शास्त्रोक्त नृत्ये तर आहेतच पण त्याचबरोबर लोकजागृतीसाठी नृत्याच्या स्वरूपात मांडली जाणारी वगनाट्ये, घटकाभर करमणुकीसाठी तमाशा, लावणी हे देखील नृत्यप्रकार प्रसिद्ध आहेत.
आपली खाद्यसंस्कृतीही इथल्या प्रदेशांनुसार भिन्न तरीही एकमेकांना बांधणारी म्हणूनच तर भारतात फिरणार्‍या प्रत्येक पर्यटकाला 'अतिथी देवो भव!' चा अनुभव येतो. भारतीय संस्कृतीचा पर्यटकांना आकर्षित करणारा स्नेहार्द धागा म्हणजे भारतीयांची खाण्याची आणि खिलवण्याची आवड. इथे प्रत्येक प्रदेशाला त्याच्या हवामानानुसार मिळालेली धान्याची समृद्धी त्याच्या नित्याच्या खाद्यसंस्कृतीत प्रकर्षाने जाणवते. ज्वारी-बाजरीची भाकरी-पिठलं त्याबरोबर मिळणारा मिरचीचा ठेचा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मिळणारा लोकप्रिय प्रकार. भारतात प्रत्येत राज्याची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहे. दिल्ली चाट, विविध प्रकारचे कबाब, बिर्याणी, छोले-भटुरेसाठी प्रसिद्ध तर पंजाब मक्के की रोटी, सरसों का साग, लस्सी, दाल मखनीसाठी नावाजलेला. रंगीला राजस्थानची तर बातच न्यारी. तिथल्या पेहेरावासारखेच तिथले पदार्थही रंगीबेरंगी आणि जिव्हा तृप्त करणारे. दाल बाटी चोरमा, राजस्थानी कढी, मिरची वडा, चोरमा लड्डू, गट्टे का पुलाव, गुजिया आणि लाल मास, बंजारी गोष्त यासारख्या विविध प्रकारच्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल राजस्थानात पाहायला मिळते. मुंबईचा वडापाव तर अबालवृद्धांपासून सर्वांच्या आवडीचा. पण त्याचबरोबर चौपाटीवर मिळणारी पाणीपुरी, पावभाजी आणि चाटचे अनेकविध प्रकार मुंबईकरांनाच नव्हे तर पर्यटकांनाही भुरळ घालणारे आहेत. तांबडा-पांढरा रस्सा, गोळा बिर्याणी, मटण रस्सा आणि झणझणीत मिसळ खावी ती कोल्हापूरचीच. अशी ही विविधतेने नटलेली, पारंपरिक आणि आधुनिक विचारशैली आत्मसात केलेली, समृद्ध असली तरीही विनम्रतेने जगभरातल्या लोकांना आपलेसे करणार्‍या भारतीय संस्कृतीने पाश्चात्त्यांनाही आपल्या प्रेमात पाडले आहे, हे नक्की !

रश्मी मर्चंडे