विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४६
 महा एमटीबी  01-Dec-2017अवंती: मेधाकाकू...परवाच्या अभ्यासात तू एक छान उल्लेख केलास...आपल्या समाजाने कुठल्यातरी सात प्रवृत्ती निषिद्ध मानल्या...!!..म्हणजे नक्की काय ते सांगशिल का...!!..


मेधाकाकू: अरेच्या...यात काहीतरी पाणी मुरतंय...आलय माझ्या लक्षांत...आपल्या समाजाने म्हणजे आमच्या अवंतीने, तिच्या दोन मैत्रीणीना हे पुढे सरकवलय अस दिसतंय...आणि मग कुठेतरी अडकायला झालंय...अवंती बाईना...म्हणून ही खोलांत जाऊन केली जाणारी चौकशी...!!..छान आहे...मी नक्की सांगते...समजावून...!!..अग प्रथम निषिद्ध या शब्दाचा अर्थ समजावून घे...निषिद्ध म्हणजे अयोग्य सवयी-गोष्टी-लकबी-मानसिकता, ज्या त्या व्यक्तीला आणि समाजाला त्रासदायक होऊ शकतात...!!..पहिले उदाहरण ‘आळस’ हि प्रवृत्ती किंवा दुर्गुण...!!..अभ्यासात-कामात-आळस करणारी व्यक्ती ऐतखाऊ बनते...कांगावखोर – बहाणेबाज बनते...येन केन प्रकारे अशा व्यक्तीला काम करणे टाळायचे असते. अशाच एका व्यक्तीचे वर्णन बघ कसे केलय या वाकप्रचारात...!!

सहज जाईन कुपांत चार आणे सुपांत.


हा आळशी माणूस फुशारकी मारतोय...मी फक्त कुंपणापर्यंत चालत गेलो...तरी मला चार आणे प्राप्ती होतील...!!..याला कुठेही जायचे नाहीये...याला काही काम-कौशल्य माहित नाही कारण हा कधी काही शिकलाच नाही...!!..वय वाढायला लागले तसे घरातले आता सांगायला लागले...चार पैसे मिळवायला लाग, काही काम कर...!!..तेंव्हा याच्या बढाया सुरु होतात... ‘सहज जाईन गोठ्यात तर चवल्या-पावल्या ओच्यांत’...किंवा... ‘सहज जाईन सड्यात तर चारा आणीन गाड्यात’... ‘सहज नजर फिरकाविन तर चार आणे टरकाविन’. कुठलेही काम करायचे सोडून...निष्फळ बहाणे आणि वायदे करणाऱ्या अशा आळश्या पासून सावध रहा...!!.. ‘

अवंती: आहा...मस्त...मस्त आळशी माणूस...!!..मेधाकाकू...याचे काय आवडले असेल मला...तू सांगू शकतेस...?!?...अग, याचे बहाणे एकदम मस्त...हा आळशी माणूस...चिल्लर – चार आण्यांच्यावर जाऊच शकलेला नाही...!!..आता नक्की समजले...आळशीपणा का निषिद्ध मनाला गेला...आपल्या समाजात...!!..

मेधाकाकू: अवंती...या एका गोष्टीवर...पैसा...या एका दुर्बिणीतून इतक्या विविध मानवी प्रवृत्ती, आपल्या लोकश्रुतीतून व्यक्त झाल्या...आपल्या पर्यंत पोहोचल्या, त्या ऐकूनच आपण चकीत होतो...!!..

लाख नसावी पण साख असावी.


सतत पैसा-पैसा करताना आपण एक गोष्ट विसरता काम नये...विसरू नये तो...संयम...आत्मसन्मान...विश्वास...!!..आपला वरचा वाकप्रचार असाच ताठ कण्याचा आत्मसन्मान...संयम शिकवतो...!!..खूप धनाची अपेक्षा सगळ्यांनाच असते...मात्र त्याहीपेक्षा आपला आत्मसन्मान, आपली पत, आपल्या बद्दल लोकांच्या मनातील विश्वास फार महत्वाचा...!!..लाखभर रुपये खिशात नसले तरी ‘साख’ म्हणजे समाजातील पत...विश्वास निशाचीतपणे असलाच पाहिजे.

अवंती: सही...मेधाकाकू...एकदम सही सांगितलेस...हा आहे आपला अस्सल मराठी बाणा...!!..काय काय जाणीवा होतायत हे सगळं ऐकताना...मला वर्णन नाही करता येणार त्याचे...!!..

मेधाकाकू: अवंती...सगळी प्रजा जर अशा संयमाने...विवेकाने वागायला लागली तर आपल्या म्हणी आणि वाकप्रचाराना मिळणारे विषयच संपतील कि...!!..म्हणजे असे...कि या समाजात अनेक सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती रहाणारच...!!..आता ‘आसक्ती’...हा एक दुर्गुण आहे आणि तो सुद्धा आपण निषिद्ध मनाला...!!..आसक्ती म्हणजे...संयमाचा अभाव...!!..

लाभ पाचांचा आणि वस्त्र दहाचे.


या व्यक्तीची मिळकत आहे पांच रुपये. त्याचा रुबाब असा कि महागडे कपडे आणि छान छान गोष्टींवर याचा खर्च होतोय दहा रुपये...!!...आवक आणि खर्चाचे व्यस्त प्रमाण. आवक कमी...खर्च त्याच्या दुप्पट. याची हि आसक्ती...व्यक्ती आणि कुटुंबाचे नुकसान करते म्हणून निषिद्ध मानली जाते. एखादी परिस्थिती आड वळणाने सांगितली जाते तेंव्हा... पर्यायोक्ती अलंकाराचे उत्तम लक्षणं या वाकप्रचारात दिसते.

अवंती: आहा...मेधाकाकू...किती मस्त खेचलंय या वाकप्रचारात...अशा खर्चीक व्यक्तीला...!!..तिरकस बोलण्याची आणि ट्रोलिंगची पद्धत तेंव्हापासून प्रचलित आहे तर...!!...

मेधाकाकू: अरे व्वा...अवंती...आता तू हळूहळू अभ्यासाचे विश्लेषण सुद्धा करायला लागलीस कि...!!..तो ट्रोलिंग हा शब्द पटलाय मला...या वाकप्रचार संदर्भात...!!..लोभ हि अशीच एक प्रवृत्ती...!!..लोभी माणूस कसा वागतो आणि या लोभापायी त्याचे काय होते याचे विलक्षण वर्णन या वाकप्रचारात, आर्थिक व्यवहारांच्या अगदी साध्या उदाहरणाने केले आहे...!!..

व्याज दिसे आणि मुद्दल भासे.


हा लोभी माणूस, व्याजाने पैसे कर्जाऊ देण्याचा व्यवसाय करतोय, मात्र हा सावकार नाहीये. गरजू माणसाला दिलेल्या रकमेवर मिळणारे दाम-दुप्पट व्याज याला दिसते आहे आणि त्यातच तो बाकी वास्तव विसरला आहे. एक दिवस कर्जाऊ पैसे घेतलेली व्यक्ती नाहीशी होते आणि कर्जाऊ रकमेचे मूळ मुद्दल भासमान होऊन जाते...!!..दुप्पट व्याजाच्या लोभाने दिलेली मूळ मुद्दलाची रक्कम घेऊन कर्ज घेणारा फसवून गेलेला असतो...!!..याच अर्थाच्या अन्य म्हणी सुद्धा फार रंजक आहेत...व्याज नारायण मुद्दल नारायण. नारायण म्हणजे निर्गुण-निराकार देव...जो फक्त कल्पनेत आहे...लोभापायी फसवले गेल्यानंतर, मूळ मुद्दल आणि व्याज सुद्धा ‘नारायण’ म्हणजे भासमान झाले. व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला, हा सहज सगळे स्पष्ट करणारा दुसरा समानार्थी वाकप्रचार...!!..लोभ या एकाच निषिद्ध प्रवृत्तीवर इतक्या लोकश्रुती असण्याचे कारण...या लोभी वृत्तीचे गांभीर्य समाजाला सतत जाणवत राहावे...इतकेच सहज आहे...!!..

अवंती: मी अचंबित झाल्ये आणि तू अवाक करत्येस...हे वर्णन करतांना...!!..माझ्या मातृभाषेला माझा दंडवत...!!..

अरुण फडके