रक्तपेढीतला विनोद
 महा एमटीबी  01-Dec-2017रक्त
, रक्तपेढी . शब्दांचा नुसता उच्चार केला तरी वातावरण अगदी गंभीर होऊन जाते. आजुबाजुला रक्ताच्या पिशव्या, सुया, पांढऱ्या डगल्यातले गंभीर चेहेऱ्यांचे तंत्रज्ञ आणि डॉक्टर्स वगैरे दृश्ये दिसायला लागतात. रक्तपेढीमध्ये प्रत्यक्ष येण्याची वेळ ज्या ज्या व्यक्तींवर येते त्यांना इथले गंभीर आणि काहीसे तणावपूर्ण वातावरण निश्चितच अनुभवयाला मिळते. अर्थात असे वातावरण असणे स्वाभाविकही आहे, कारण एकंदरीतच रक्तसंकलन, रक्तप्रक्रिया आणि रक्तवितरण या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक करण्याच्या आहेत. यात कुठेही जरादेखील गडबड झाली तरी एखाद्याच्या जीवाशीच गाठ. त्यामुळे रक्तपेढीतील नित्याचे काम आणि गांभीर्य या दोहोंचाही अगदी जवळचा संबंध आहे, हे खरेच आहे. पण याचा अर्थ रक्तपेढी कधी हसतच नाही असे मात्र मुळीच नाही. रक्तपेढीतील गंभीर काम करत असताना, रक्तदान शिबिरांमध्ये अथवा रुग्णालयांमध्येही भरपूर गमती-जमती होत असतातच.

रक्तपेढीया शब्दाबाबतच बऱ्याच जणांचा गोंधळ कायम पहायला मिळतो. ’काय म्हणतेय तुमची पतपेढी’ ?’ हा तर आम्हाला नेहमी ऐकावा लागणारा प्रश्न. ’हे पतपेढीत काम करतातअसा इतरत्र आपला परिचय करुन दिला जाणे आम्हाला काही नवीन नाही. एकंदरीतच पतपेढीतील पत रक्ताला अजून आली नाही म्हणायची. ’पेढीही इंग्रजी भाषेत बॅंक असल्याने बॅंकेचेही काही रूढ गुणविशेष रक्तपेढीला येऊन चिकटतात, म्हणजेच आरोपित होतात. ’रक्तपेढीत दिलेलं एक बाटली रक्त किती वर्षं ठेवता येऊ शकतं ?’ यांसारखे प्रश्न ही बॅंक आहेहे गृहीत धरुन विचारणारेही काही कमी नाहीत. ’शिबिरांत संकलित केलेले रक्त त्यांच्या गटांनुसार साठवून ठेवायला मोठमोठ्या टाक्या लागत असतील ना ?’ असा प्रश्न विचारुन असेच एका नवरक्तदात्याने आमच्या डॉक्टरांचे डोके चांगलेच गरगरवले होते. रक्तपेढीची तांत्रिक परिभाषा नीट समजल्यामुळे काय मग ? गेल्या महिन्यात किती लिटर रक्त जमा झालं ?’ असा प्रश्न एका सामाजिक कार्यकर्त्यानेच मला विचारला होता.

रक्त संकलनानंतर रक्तावर कोणकोणत्या प्रक्रिया होतात, हे पाहणे, समजावून घेणे हा एक विलक्षण अनुभव असतो. आपले रक्त सुरक्षितपणे रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो हे प्रत्यक्ष पाहणेदेखील एखाद्या व्यक्तीस रक्तदानासाठी प्रेरित करु शकते. माझी जवळची नातेवाईक असलेली एक तरुण मुलगी खास रक्तदान करण्यासाठी रक्तपेढीत आली तेव्हा याच विचाराने मी तिला म्हटलं, ’चल, आधी तुला रक्तपेढीची प्रयोगशाळा दाखवतो.’ यावर तीही मोठ्या उत्साहाने माझ्याबरोबर रक्तपेढी पहायला आली. सगळी प्रयोगशाळा फ़िरुन झाल्यावर परिणाम इतकाच झाला की रक्तदान वगैरेच्या भानगडीत पडता बाईसाहेब फ़क्त कॉफ़ी पिऊन निघून गेल्या. कारण प्रयोगशाळेत रक्ताच्या भरपूर पिशव्या बघून म्हणे तिला घाबरायला झालं. स्वत:च्याच कपाळावर हात मारुन घेण्याखेरीज मला काहीही करता आलं नाही. नाही म्हणायला, कुणालाही रक्तपेढी दाखवण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या स्वभावाचा नीट अंदाज घ्यावा, हा धडा मात्र यातून शिकायला मिळाला.

जनकल्याण रक्तपेढीची स्थापना १९८३ साली तत्कालीन संघकार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केली. स्वाभाविकपणे दीर्घकाळ अनेक संघकार्यकर्त्यांनी आपले जीवनध्येय मानून रक्तपेढी वसवली आणि वाढवलीही. आता काळानुसार नवीन पिढीतीलही बरेच जण रक्तपेढीशी जोडले गेले आहेत आणि जोडले जातही आहेत. एकदा संघाचे अखिल भारतीय सेवाप्रमुख सुहासराव हिरेमठ यांनी रक्तपेढीस भेट दिली. सर्व रक्तपेढी पाहून झाल्यानंतर समाधान व्यक्त करीत सुहासरावांनी एक मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले, ’पूर्वी या रक्तपेढीत भरपूर काकालोक दिसायचे आता पुतण्यांचीसंख्याही वाढल्याचे बघून आनंद वाटला.’ नवीन पिढीने हा वारसा पुढे चालवणे महत्वाचे आहे असा एक मोठा संदेश सुहासरावांच्या या एका वाक्यात आम्हाला सहज मिळून गेला आणि तोही अगदी हसत हसत.

महाराष्ट्र, गोवा, गुजरात अशा राज्यांमध्ये संघकामासाठी कार्यरत असणारे ज्येष्ठ संघप्रचारक रवीजी किरकोळे यांच्याही एका रक्तपेढी भेटीत अशीच गंमत झाली. रवीजी त्यांच्या पुणे प्रवासात आवर्जून रक्तदान करायला रक्तपेढीत येत असतात. अशाच एका प्रसंगी रक्तदान करुन झाल्यानंतर खाटेवर पडल्या पडल्याच रवीजी माझ्याशी बोलत होते. रक्तदानानंतरचे तांत्रिक उपचार करण्यासाठी आलेली एक नवोदित तंत्रज्ञ मुलगीही तिथे होती. आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक असलेल्या या मुलीने आपले काम करता करताच रवीजींना रक्तदान झाल्यानंतर काय काळजी घ्यायची असते’, यासंबंधी सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता ती म्हणाली, सर, आता चोवीस तास नो ड्रिंकिंग, नो स्मोकिंग.’ संघाच्या एका पूर्णवेळ प्रचारकाला तिने असे म्हटल्याबरोबर माझीच छाती धडधडु लागली. पण रवीजींच्या चेहेऱ्यावर मात्र मंद स्मितच होते. अर्थात या तंत्रज्ञ मुलीनेही आपले काम चोख बजावले होते. ही मुलगी तिथून गेल्यानंतर मात्र रवीजी मिश्कीलपणे मला म्हणाले, ’या मुलीने अवघडच काम सांगितलं की रे ! आता पुढचे चोवीस तास कसं होणार माझ्यासारख्याचं ?’ आणि आम्ही दोघेही जोरजोरात हसु लागलो.

रुग्णासाठी वितरित केलेले रक्तघटक रुग्णालयांमध्ये योग्य पद्धतीने वापरले जावे, याकरिता जनकल्याण रक्तपेढी रुग्णालयांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेते. सर्व परिचारिका आणि डॉक्टर्स मंडळी या प्रशिक्षणासाठी अपेक्षित असतात. अशाच एका रुग्णालयात रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी बर्वे उपस्थितांसमोर रक्तपिशवी रुग्णाला संक्रमित करण्यापूर्वी ती कक्ष तापमानाला आणण्याची म्हणजेच वॉर्मिंग करण्याची मूळीच आवश्यकता नसतेहा मुद्दा समजावून सांगत होत्या. डॉ. बर्वे या डॉक्टर असण्याबरोबरच उत्तम प्राध्यापिकाही आहेत. त्यामुळे त्या प्रशिक्षणार्थींना सहसा स्वस्थ बसु देत नाहीत. सातत्याने प्रश्न विचारुन सर्वांना विचारप्रवृत्त करण्याचं एक विलक्षण कसब त्यांच्याकडे आहे. अर्थात या प्रश्नांना उत्तरे देत असताना अनेकांची दांडी मात्र गुल होते. वरील विषय शिकवताना त्यांनी सहज प्रश्न विचारला, ’रक्ताची पिशवी रुग्णाला संक्रमित करण्यापूर्वी तुम्ही काय करता ?’ यावर आम्ही ती पिलोकव्हर किंवा बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवतोअसे उत्तर आले. पूर्णत: तांत्रिक (technical) अशा प्रशिक्षणामध्ये असे तद्दन अतांत्रिक (nontechnical) उत्तर ऐकून डॉ. बर्वे एकदम चक्रावल्या आणि अगदी आक्रमक स्वरात त्यांनी उत्तर देणाऱ्या परिचारिकेला विचारलं, ’कुणी सांगितलं हे असं करायला ?’ यावर क्षणाचाही विलंब लावता त्या परिचारिकेने तिथेच बसलेल्या एका डॉक्टरांकडे बोट दाखवलं. आता मात्र (’काय म्हणावे या दैवाला ?’ या अर्थाने) निरुत्तर होण्याची पाळी होती डॉ. बर्वे यांचीच !

मराठी भाषेशी चांगले मैत्र असल्यामुळे म्हणा किंवा जनकल्याण रक्तपेढीहा शब्द बऱ्याचदा वापरावा लागत असल्याने म्हणा रक्तपेढीच्या नावात काही अवघड आहे असे मला तरी कधी वाटले नाही. हे मुद्दाम आठवण्याचे कारण म्हणजे - असाच एक गमतीशीर अनुभव; एका नामांकित रुग्णालयात एका मोठ्या डॉक्टरांबरोबर भेट ठरली होती. योग्य वेळेत मी रुग्णालयाच्या स्वागतकक्षाशी पोहोचलो. ’वेळ ठरली आहे का ? कशासंबंधी बोलायचे आहे ?’ अशा सलग दोन-चार प्रश्नांच्या सरबत्तीमुळे स्वागतिका अस्सल पुणेरी असल्याचे ध्यानात आले. वेळ नक्की ठरली आहे, याची खात्री करत या स्वागतिकेने माझ्या व्हिजिटींग कार्डची मागणी केली. मी ते देताच तिने इंटरकॉमवरुन त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला. माझे व्हिजिटींग कार्ड आपल्या डोळ्यांपुढे धरत पुणेरी शुद्ध भाषेचा वारसा मिरवणारी ही भगिनी म्हणाली, ’सर, ’जनपेढी रक्तकल्याणमधूनएक गृहस्थ आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत.’ क्षणभर मला बोधच होईना. शब्द तर ओळखीचे वाटताहेत पण ते अशी आपली जागा सोडून का पळताहेत ? मग उमगले की या स्वागतिका महोदयांनी आपल्या शब्दांतून जनांची पेढी उघडली असून रक्ताचे कल्याण केले आहे. गंमत म्हणजे इतके स्पष्ट (आणि चुकीचे) वाचूनही आपण काही चुकीचा उच्चार केला आहेयाची जाणिवच या बाईसाहेबांना झालेली नव्हती.

रक्तपेढीची परिभाषा मूळातच क्लिष्ट. त्यामुळे रक्तप्रक्रियेसंबंधी किंवा रक्तदान-प्रबोधनासंबंधी माहितीचे आदान-प्रदान योग्य स्वरुपात होण्यासाठी लोकांनी खास वातावरणात यावे लागते. अशा हेतुपूर्वक तयार केलेल्या वातावरणात येऊन जर चुकीची माहिती प्रसृत झाली तर मात्र गमती होतात. रक्तदात्यांच्या एका मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असलेल्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी बोलताना अशीच धमाल केली. उत्साहाच्या भरात ते म्हणाले, ’रक्तदान तीन महिन्यांनी केलं पाहिजे, हे ठीक आहे. पण मी स्वत: तरुण असताना काहीवेळा एकेक महिन्यानंतरही रक्तदान केले आहे.’ झालं ! समोरचा श्रोतृवर्ग एकदम गोंधळात. खरोखरच सगळेजण गोंधळात पडतील असाच स्ट्रोक या ज्येष्ठ डॉक्टरांनी मारला होता. अर्थात या भाषणानंतर सभेचे संकेत मोडून रक्तपेढी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी पुन्हा माईकसमोर आले आणि सौम्यपणे हसत त्यांनी सर्वांना सांगितलं, ’आत्ता डॉक्टरांनी सांगितलेली घटना आपात्कालीन म्हणून त्या विशिष्ट काळात झाली असेलही, पण रक्तपेढी विज्ञानाने प्रमाणित केल्यानुसार एकदा रक्तदान केल्यानंतर तीन महिन्याच्या आत रक्तदान करण्याची परवानगी कोणालाही देता येऊ शकत नाही, हे मी अधिकृतपणे आपणाला सांगु इच्छितो.’ प्रमुख अतिथींचा योग्य आदर राखण्याबरोबरच चुकीची माहिती सर्वांपुढे जाऊ देणं या दोहोंचा समतोल डॉ. कुलकर्णींनी साधला आणि काही वेळापुरता झालेला श्रोत्यांचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आला.

हजारो समर्पित रक्तदात्यांकडून आणि शिबिर संयोजकांकडूनच रक्तपेढी खऱ्या अर्थाने चालवली जाते, हे खरेच आहे. पण तरी केवळ कॉफ़ी/बिस्किट्स आणि थोडी विश्रांती इतक्याच अपेक्षेने रक्तपेढीची पायरी चढणाऱ्या प्रामाणिक’ (!) रक्तदात्यापासून ते रक्तपेढीचा कर्मचारी म्हणजे यांना रक्तदान कंपल्सरीच असणारअसा प्रामाणिक विचार करुन आम्हासारख्यांकडे दयाबुद्धीने पाहणाऱ्या दयाळू’ (!) हितचिंतकांचाही एक वर्ग आहेच. रक्तपेढीची विशिष्ट परिभाषा नीट लक्षात आल्याने बाहेरील लोकांच्या बाबतीत किंवा रक्तपेढीच्याच चष्म्यातून बाह्य जगाकडे पाहिल्याने रक्तपेढीतील लोकांच्या बाबतीत अशा निरनिराळ्या गमतीजमती या घडतच असतात. अशा घटना रक्तपेढीच्या गंभीर वातावरणात हास्य उत्पन्न करतात. अर्थात, कधीही झोप घेणाऱ्या रक्तपेढीच्या विश्वात घडणारे असे छोटे प्रसंगही रक्तपेढीची कार्यक्षमता वाढविणाऱ्या उर्जेचेच काम करतात, हे मात्र निश्चित !

- महेंद्र वाघ