जिसका हौसला हो बुलंद...
 महा एमटीबी  01-Dec-2017
 
 
 
उडने के लिए पर जरूरी नही,
जरूरी होता है उँचा मनोबल
उँचा वही उठ सकता है
जिसका हौसला हो बुलंद |
 
घरची परिस्थिती अगदी बिकट. मात्र, डोळ्यात मोठं काहीतरी करण्याचे स्वप्न. याचाच मागोवा घेत घेत अपराजिता राय सिक्कीमच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरल्या. अपराजिता यांनी २००९ मध्ये कोलकाताच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ज्युरिडीकल सायन्समधून बीए एलएलबीची पदवी संपादित केली. त्यात त्यांनी सुवर्णपदकही मिळविले होते. अपराजिताला अभ्यासासारखाच संगीत-नृत्यामध्ये ही तेवढ्याच प्रमाणात रस आहे. सामान्यपणे पहिली महिला आयपीएस अधिकारी म्हटले की, आपल्या डोळ्यांपुढे अभिमानाने नाव येते ते म्हणजे किरण बेदी यांचे. त्यांच्या हुशारी, बहादुरीचे किस्से आपण ऐकले आहेतच. आता त्यातच आणखी एका नावाची भर पडली आहे ती केवळ २८ वर्षीय अपराजिता राय यांची. सध्या अपराजिता पश्चिम बंगालमधील हुगळीमध्ये तैनात आहेत. यूपीएससीची परीक्षा त्यांनी २०१० आणि २०११ या दोन्ही वर्षी दिली. मात्र, २०१०च्या परीक्षेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. म्हणून पुन्हा २०११ मध्ये अपराजिताने परीक्षा दिली. त्यात त्यांना ३५८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे, ‘ट्राय ट्राय बट् डू नॉट क्राय.’ या सुविचारानुसार, अपराजिता आपल्या पहिल्या प्रयत्नात असफल ठरल्या असल्या तरी त्यांनी न डगमगता दुस-यांदा जिद्दीने परीक्षा देऊन यश मिळविलेच. अपराजिता सिक्कीममध्ये सर्वात जास्त गुण मिळविणा-या परीक्षार्थी ठरल्या.
 
ज्यामुळे आयपीएस कॅडरमध्ये त्यांना नियुक्ती मिळाली. तिथे पहिल्या प्रयत्नात त्यांचे स्थान ७६८ वे होते. आपल्या क्षमतेवर त्यांनी भरपूर पदके मिळवली. प्रशिक्षणाच्या दरम्यान, ‘बेस्ट लेडी आऊटडोर’ ही ट्रॉफी त्यांनी आपल्या नावे केली. १९५८च्या बॅचच्या आयपीएस अधिका-यांची ’श्री उमेश चंद्र’ ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अपराजिता सांगतात की, ‘‘त्यांच्या घरच्यांची त्यांना नेहमीच सोबत झाली. त्यांना विश्वास होता की, आपली मुलगी भविष्यात नक्कीच काहीतरी करेल.’’ अपराजिताचे वडील वनविभागामध्ये विभागीय अधिकारी होते आणि आई एका शाळेत शिक्षिका होती. मात्र, अपराजिताच्या वयाच्या आठव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
त्यानंतर जेव्हा अपराजिताच्या लक्षात आले की, सरकारी कर्मचारी जनतेशी नीट वागत नाहीत, ते बघूनच त्यांनी सिव्हिल क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत अपराजिता सांगतात की, “कोणतेही ध्येय गाठायचे म्हणजे त्यासाठी स्वतःमध्ये एक दृढविश्वास असायला हवा. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर जगातील अशक्यप्राय ध्येयापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता.’’ या सगळ्यांबरोबरच अपराजिताला गिटार वाजवणे, एरोबिक्स करायला खूप आवडते. त्यासोबतच त्या भरतनाट्यमच्या नर्तिका आहेत. शाळेत असतानाही अपराजिता एक हुशार विद्यार्थिनी होती. २००४ मध्ये १२ वीच्या परीक्षेत त्यांनी ९५ टक्के मिळवून राज्यात टॉप-३ मध्ये स्थान मिळविले होते. बोर्डामध्ये यश संपादन केल्यामुळे अपराजिताला ताशी नामग्याल अकादमीमध्ये ‘बेस्ट गर्ल ऑलराऊंडर श्रीमती रत्ना प्रधान मेमोरियल’ ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला होता. अपराजिताच्या मते, ‘‘सिक्कीममधील तरुणांमध्ये जागरूकतेची कमी आहे. ते बाहेर जाऊन प्रतिस्पर्धा करायला तयार नसतात. ते फक्त एक नोकरी पकडतात आणि स्वतःसाठी सीमित असलेले आयुष्य जगतात.’’ अपराजिता यांच्या नावामध्येच ‘पराजय न होणारी’ असा अर्थ दडलेला असताना ती नक्कीच आपले नाव सार्थ ठरवील आणि उत्तोरोत्तर असेच यश संपादन करेल, याची खात्री वाटते.
 
- पूजा सराफ