आक्रमकाचे स्मारक
 महा एमटीबी  09-Nov-2017
 

 
 
कोणताही स्वतंत्र आणि सार्वभौम देश आक्रमकांची स्मारके नष्ट करण्याचाच आटोकाट प्रयत्न करतो. समजा असं एखादे स्मारक वास्तुशास्त्रीयदृष्ट्या फार सुंदर असेल तर ते फक्त ऐतिहासिक स्मारक म्हणून शिल्लक ठेवलं जातं. त्यापासून कुणीही कसलीही प्रेरणा वगैरे घेणार नाही, हे कटाक्षाने पाहिलं जातं. त्याला सणसणीत अपवाद अर्थात भारताचा. पण अपवाद तरी कशाला म्हणायचं ? भारत स्वतंत्र आणि सार्वभौम आहे तो फक्त राजकीय दृष्टीने. भारतीय नागरिक मनाने अजूनही गुलामच आहेत. भारताच्या राजधानीत ‘औरंगजेब रोड’ ‘शहाजहान रोड’ असे रस्ते सुखाने नांदू शकतात. भारताच्या आर्थिक राजधानीचं मोठ्या मुश्किलीने ’बॉम्बे’चं ‘मुंबई’ होतं आणि तरीही इथले बहुसंख्य नागरिक ‘बॉम्बे’ असा उच्चार करण्यातच धन्यता मानतात. हिंदू धर्मात नवसाला पावणारे असंख्य देव आणि संत असूनही आमचे लोक प्रतापगडावरच्या अफजलखानाच्या थडग्याला नि जुन्या गोव्यातल्या सेंट झेविअर्सच्या मुडद्याला नवस बोलतात. याला ‘मानसिक गुलामगिरी’ म्हणायचं नाही तर काय?
 
 
आता हंगेरीतल्या टॅपिओसंझेटमेट्रॉन या अगडबंब नावाच्या गावातल्या लोकांनाही हिंदूंसारखे गुलामगिरीचे डोहाळे लागले असावेत, असं दिसतं. तिथल्या लोकांनी आटिला या हूण राजाचा राजवाडा पुन्हा बांधायचा ठरवलं आहे. कोण हा आटिला नि कोण हे हूण ? हूण हे नावं नुसतं उच्चारलं तरी युरोपीय लोकांचा आजही थरकाप होतो. एखाद्याला ‘क्रूरकर्मा’, ‘दुष्ट’ अशी शिवी द्यायची असेल, तर त्याला ’हूण’ म्हटलं जातं.
 
हूणांना मोगलांचे पूर्वज म्हणायला हरकत नाही. मोगल हे वंशाचे तुर्क होते हूण वंशाने कोण होते कोणास ठाऊक ? आजच्या कझाकिस्तानातल्या अरल समुद्रापासून पश्चिम सैबेरियातील मैदानी प्रदेशांपर्यंत स्टेप्स नावाचा गवताळ प्रदेश आहे. तो हूणांचा मूळ प्रदेश.
 
 
हूण कमालीचे क्रूर होते. हजारो हूण स्त्री-पुरुष घोड्यावर स्वार होऊन एखाद्या टोळधाडीप्रमाणे शत्रूप्रदेशावर तुटून पडत. माणसं मारणं हा त्यांचा छंद होता. जे म्हणून सुंदर, भव्य, उदात्त, त्याचा पुरता विद्ध्वंस करून टाकणं याची त्यांना अनिवार आवड होती. समोर दिसेल त्याला ठार मारणं, गावं साफ उद्ध्वस्त करून ती पेटवून देणं, शत्रूच्या मुंडक्यांचे ढीग रचणं आणि लढाई संपल्यावर शत्रूच्या कवटीतून मद्य पिणे, हा त्यांचा रिवाज होता.
 
 
हूणांच्या लढाईचं एक विशिष्ट तंत्र होतं. चहूबाजूंनी मुंग्यांच्या रांगेप्रमाणे एकापाठी एक अशा रचनेत ते शत्रूवर झडप घालत. पिशाच्चाप्रमाणे कर्कश किंकाळ्या आणि डरकाळ्या फोडीत धावत सुटत. हूणांनी पूर्वेला पहिला तडाखा चीनला दिला. चीनचे प्रांतच्या प्रांत हूणांच्या पाशवी आक्रमणांनी अक्षरशः ओस पडले. हूणांच्या स्वार्‍यांपासून आपल्या देशाचा बचाव करण्यासाठीच तर चीनच्या सम्राटाने आपल्या सरहद्दीवर ती सुप्रसिद्ध भिंत बांधली, जी आजही पाहायला मिळते. अर्थात, भिंत बांधून फारसा उपयोग झालाच नाही. हूण भिंत ओलांडून स्वार्‍या करू लागले. कोट छातीचे करायचे असतात, मातीचे नव्हे, हे चिनी सम्राट विसरला तर ते असो. पश्चिमेकडे तर हूणांना अख्खा युरोपचं मोकळा होता. ते इसवी सनाचं पाचवं शतक होतं. हूणांना आटिला नावाचा एक अत्यंत जहॉंबाज सेनापती मिळाला. उरक पर्वताच्या रांगा नि व्होल्गासारख्या नद्या ओलांडत हूणांची टोळधाड जी रशियात घुसली ती पोलंड, प्रशिया इत्यादी देश तुडवत, चेचत पश्र्चिमेला थेट अटलांटिक समुद्रावर जाऊन पोहोचली. मग ते दक्षिणेकडे वळले. रोमनांचं प्रचंड, प्रबळ आणि वैभवशाली साम्राज्य त्यांच्या प्रतिकारासाठी उभं होतं. हूणांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या. त्यांच्या तलवारींना नवं भक्ष्य सापडलं होतं. लढायांमागून लढाया झडू लागल्या आणि रोमनांच्या सैन्यांमागून सैन्याचा फज्जा उडू लागला. हूणांच्या जबरदस्त दणक्यांनी प्रबळ रोमन साम्राज्य साफ खिळखिळंं होऊन गेलं. मृत्यूपंथाला लागलं. हूणांना रणांगणावरील विजयापेक्षा विद्ध्वंसात अधिक आनंद मिळत असे. रोमन साम्राज्यातली अनेक सुंदर सुंदर शहरं त्यांनी जाळून पोळून उद्ध्वस्त करून टाकली. संपूर्ण युरोप खंड जाळपोळ, लुटालूट, कत्तली नि रक्तपात यांनी गांजून गेलं. युरोपच्या या भीषण दुर्दशेचा अधिक तपशील एडवर्ड गिबनच्या ‘डिक्लाईन ऍण्ड फॉल ऑफ दि रोमन एम्पायर’ या प्रख्यात ग्रंथात मिळेल.
 
 
असा हा क्रूरकर्मा आटिला हंगेरीतल्या टॅपिओसंझेटमेट्रॉन या गावी राजवाडा बांधून राहिलेला होता. तिथंच तो मेला. कदाचित त्यावेळी ते साधं गाव नसून हूणांची राजधानीसुद्धा असू शकेल. तत्कालीन ऐतिहासिक उल्लेखांनुसार आटिलाला एका नदीच्या पात्रात पुरण्यात आले. त्याच्याबरोबर अनेक नोकरांना जिवंत पुरण्यात आले. फार मोठा खजिनाही त्याला परलोकात उपयोगी पडावा म्हणून पुरण्यात आला. आज या गोष्टीला तब्बल पंधराशे वर्षे उलटली आहेत आणि तरीही अनेक संशोधक अजूनही तो खजिना शोधण्याचा प्रयत्न करीत असतात.
 
 
याच कालखंडात भारतावरही हूणांची धाड कोसळली होती, पण प्रथममगध सम्राट स्कंदगुप्त आणि नंतर उज्जयिनीच्या महाराज यशोधम्यनि हूणांचा साफ उच्छेद केला. उरल्यासुरल्या हूणांना हिंदू धर्मात पचवून टाकण्यात आलं. पण तो वेगळा विषय आहे.
 
 
आटिलाच्या मृत्यूनंतर हूणांची सद्दी हळूहळू संपुष्टात आली. आज तर स्टेप्स प्रदेशात हूणाचं नावनिशाणही नाही.लगेचच पुढच्या शतकात म्हणजे सहाव्या शतकात अरबस्तानात इस्लामचा जन्म झाला आणि हूणांचंच कार्य त्यांनी नेटाने पुढे चालू ठेवलं. याला योगायोग म्हणावं काय ?
 
 
१९ व्या शतकात हंगेरीत एर्नो व्लास्कोविच नावाचा एक धनाढ्य इसम होऊन गेला. त्याला इतिहासाची फार आवड होती. त्याने खूप संशोधन करून आटिलाचा राजवाडा कुठे होता ती जागा शोधून काढली. ते ठिकाण टॅपिओसंझेटमेट्रॉन  गावानजीक आहे. जानोस कोस्की नावाच्या एका उद्योगपतीच्या पुढाकाराने आता तो राजवाडा पुन्हा उभारण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे साडेसात लाख डॉलर्स लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. तो आटिला लेकाचा कबरीतल्या कबरीत नुसता खुश होऊन गेला असेल!
 
 
जपानी सावधानता
 
छत्रपती शिवराय हा एक अत्यंत सावध राजा होता. दिल्लीकर मोगल, विजापूरकर आदिलशहा आणि जंजिरेकर सिद्दी या मुसलमानी सत्तांकडे त्यांची जितकी सावध नि जागरूक नजर असे तितकीच किंबहुना कांकणभर अधिकच सावधानता ते गोवेकर फिरंगी म्हणजे पोर्तुगीज नि सुरतेचे टोपीकर इंग्रज यांच्याबाबत बाळगत. व्यापाराच्या मिषाने भारतात शिरलेले हे युरोपीय लोक किती लुच्चे, लबाड आणि लोभी आहेत याबद्दल शिवराय आपल्या ठिकठिकाणच्या सरदारांना, अधिकार्‍यांना पत्राद्वारे सावध करताना दिसतात.
 
आपलं राज्य, आपला धर्म आणि आपला देश यांच्याबद्दल स्वाभिमान असलेला कोणताही राजा असा सावध राहणारच. सुमारे पाऊणशे-शंभर वर्षांपूर्वीची कथा. ख्रिश्चन मिशनर्‍यांनी भरलेलं एक जहाज जपानच्या किनार्‍याला लागलं. पाद्र्यांनी जपानी सम्राटाला भेटण्याची इच्छा दर्शवली. भेटीत त्यांनी सम्राटाला सांगितलं,’’आपल्या देशातल्या महारोग्यांची सेवा करण्याची आमची इच्छा आहे. महारोग्यांची सेवा हीच ईशसेवा, अशी आमची श्रद्धा आहे. तरी सम्राटांनी कृपावंत होऊन आम्हाला सेवेची संधी द्यावी.’’
 
सम्राट म्हणाला, ’’ठीक आहे, मी मंत्रिमंडळाशी चर्चा करून आजपासून तिसर्‍या दिवशी निर्णय सांगतो.’’
 
कसा पटवला सम्राटाला, अशी खुशीची गाजरं खात पाद्री मंडळी मुक्कामावर परतली नि बरोबर तिसर्‍या दिवशी पुन्हा दरबारात हजर झाली. सम्राट म्हणाला, ’’तुमचा उदात्त हेतू ऐकून मी आणि माझं मंत्रिमंडळ भारावून गेलो आहोत. आमच्या देशात येण्याची बुद्धी तुम्हाला झाली, हा आमच्यावर परमेश्वराचा मोठाच अनुग्रह झाला, असं आम्ही समजतो. मात्र, त्यावेळी आम्हाला या गोष्टीचं फार दुःख होतं की, तुमच्या या भव्यदिव्य कार्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या देशातला एखादा भूभाग देऊ शकत नाही. तेव्हा आपण असं करू की, आम्ही आमच्या देशातले एक जहाज भरुन महारोगी तुमच्याकडे पाठवतो. ते बरे होऊन परतले की, दुसरं जहाज पाठवू मग बोला, केव्हा पाठवू पाहिलं जहाजं ?’’
 
अशा सम्राटामुळे जपान आजही बुद्धानुयायीच आहे आणि हजारो मुळाक्षरे असलेली जपानी भाषा सहजपणे संगणकांवर वापरली जाऊ शकते, इंग्रजीचा द्वेष न करता! आमच्याकडे मात्र शिवाजीनंतर असे राजे न झाल्यामुळे देशभर हजारो पाद्री झक्कास पैकी ‘सेवा’ करतायत. 
 
 
प्रलयाचा प्रारंभ
 
पृथ्वीवर अधर्म अतोनात बळावला, पापाचा भार पृथ्वीला असह्य झाला. तिने भगवान विष्णूची विनवणी केली, तेव्हा मग भगवंताने कृष्णावतार घेऊन प्रचंड संहार घडवून अधर्माचा नाश केला आणि धर्मसंस्थापना केली. असा कथाभाग श्रीमद्भागवतात येतो. अनेक पुराण, लोककथा, इतिहास यांमध्येही अशाच प्रकारच्या कथा आहेत. फक्त युगानुरूप त्यात थोडा-थोडा फरक असतो. सध्याच्या काळात अवतार अस्तित्वात आहे किंवा भावी काळात होणार आहे किंवा काय याची कल्पना नाही. मात्र, आपल्याच पत्राच्या भाराखाली मानवजात चिरडून जाणार, अशी लक्षणं स्पष्टपणे दिसत आहेत. अमेरिका-सोव्हिएत शीतयुद्ध ऐन भरात असताना अण्वस्त्रांच्या मार्‍याने पृथ्वी भस्मसात होईल, असे भय वाटत होते. आता ती भीती पूर्णपणे नाहीशी झाली नसली तरी खूपशी कमी झालेली आहे. पण एक नवीच भीती आपलं विक्राळ मुख पसरून मानवजातीचा घास घ्यायला सज्ज झालेली आहे. तिचं नाव आहे एड्‌स! स्वैराचाराचा, मुक्त स्त्री-पुरुष संबंधाचा पुरस्कार करून माणसानेच स्वतःवर ओढवून घेतलेला काळ! प्लेगसारख्या भयंकर घातक रोगांनी एकेकाळी धुमाकूळ घातला होता. त्यावेळी वैद्यकीय विज्ञान फारसं पुढारलेलं नव्हतं, पण आज वैद्यकीय विज्ञान त्याच्या परमोच्च शिखरावर पोहोचलेलं असतानाही एड्‌स जो हाहाकार लवकर उडवणार आहे तो उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्याशिवाय माणसाच्या हाती काहीही नाही. हे अगदी नजीकच्या भविष्यकाळात घडणार आहे. गंमत ही आहे की, समोर सर्वनाश दिसत असूनही वैज्ञानिक एड्‌सवर प्रतिबंधक लस शोधताहेत, पण मुळातच प्रतिबंध व्हावा म्हणून माणसाने नीतिमान आयुष्य जगावं, असा उपदेश मात्र कुणीही करू इच्छित नाहीत, वैज्ञानिकही नाहीत वा विचारवंत समाजशास्त्रही नाहीत. तर ते असो. धान्य दळणार्‍या दगडी जालामध्ये सर्वांचंच पीठ होतं. फक्त खुंट्याच्या आधारे राहणारं धान्य शाबूत राहतं. तसं येऊ घातलेल्या प्रलयात जे अध्यात्मप्रवण जीवन जगतील, ते टिकतील, बाकीच्यांचं काय व्हायचं ते होईल. इथे मुद्दा आहे तो हा की, या सर्वभक्षक दगडी जालाची म्हणजे एड्‌सची सुरुवात झाली तरी कशी? कॅलिफोर्नियातील सान दिएगो विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ जेम्स मूर यांच्या मते ही सुरुवात मध्य आफ्रिकेत १९३० च्या सुमारास झाली. त्यावेळी मध्य आफ्रिकेत अनेक युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती होत्या. स्थानिक काळ्या रहिवाशांना रबराचे मळे लावायला उद्युक्त करायचे आणि त्यांच्याकडून सारा म्हणून पैशाऐवजी रबर घ्यायचं, असा वसाहतीच्या गोर्‍या अधिकार्‍यांचा खाक्या होता. एकदा एक काळा शेतकरी सारा भरू न शकल्यामुळे जंगलात पळून गेला. रबराच्या झाडांवर रोग पडला होता. गावातलं कुणीच सारा भरू शकणार नव्हतं, पण वसुली करणार्‍यांना त्याचं सोयरसुतक नव्हतं. त्यांनी गावातल्या अनेकांना गोळ्या घातल्या. गाव पेटवून दिलं. कुटुंब आणि गाव उद्ध्वस्त झालेला हा शेतकरी जंगलात ङ्गिरत होता. पोटाची भूक शमवायला त्याने एका चिंपाझी वानराला ठार मारलं, पण मरताना तो वानर त्या शेतकर्‍याला कडकडून चावला. मांसासाठी त्याला फाडत असताना त्याला स्वतःलाही स्वतःच्याच हत्याराच्या जखमा झाल्या. त्या जखमांमधून वानराच्या रक्ताबरोबरच त्याच्या शरीरात प्रवेशले सिमियन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस - एस.आय.व्ही. म्हणजे एच.आय.व्ही.चे पूर्वज!
 
 
नंतर रेल्वेरूळ बांधणीसाठी काळे वेठबिगार पकडणार्‍या एका गोर्‍या सैनिकी टोळीने त्या शेतकर्‍याला पकडलं आणि बांधकामावर जुंपलं. दिवसभर मरमर काम आणि तुटपुंजं अन्न अशा स्थितीत एस.आय.व्ही.ने त्याच्या शरीरात चांगलंच बस्तान बांधलं. अशा भयंकर स्थितीत राहणार्‍या मजुराचा विसावा म्हणजे बांधकामाच्या आसपास घरठाव करून राहणार्‍या भुरट्या वेश्या. आणि तिथून एस.आय.व्ही. झपाट्याने सवत्रर् पसरत गेला. आता अमेरिकेच्या ‘मुक्त’ जीवनशैलीत त्याने एच. आय. व्ही. हे बाळसेदार रूप धारण केलं आहे.
 
- मल्हार कृष्ण गोखले