दिव्यांगांचा दिवा
 महा एमटीबी  08-Nov-2017


 

नरेश माळी नावाचा एक अंध मुलगा कोकणात राहत होता. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. तरी त्याला नोकरी मिळत नव्हती. मग त्याने मुंबईची वाट धरली. तो राष्ट्रीय अंध संघटनेत दाखल झाला. पुढे त्याला ‘सार्थक’ या दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेची माहिती मिळाली आणि तिथे नरेशने रितसर बीपीओ (कॉल सेंटर) संदर्भातील प्रशिक्षण पूर्ण केले.अंध आणि दहावी पासनरेश सध्या एका बीपीओ कंपनीत महिना आठ हजार पगार घेऊन काम करतो. नरेश हे फक्त उदाहरण आहे. अशीच काहीशी स्थिती प्रणाली फाळके, स्मिता चव्हाण यांचीही होती. आपल्या अपंगत्वावर मात करत ‘सार्थक’ संघटनेची मदत घेत ख-या अर्थाने आपल्या पायावर ते उभे आहेत. पण ‘सार्थक’ची सुरुवात नेमकी केली कुणी ?

 

आपल्याकडे दिव्यांग लोकांकडे फक्त सहानुभूतीने पाहण्याची सवय आहे. जमेल तशी आपण त्यांना मदतसुद्धा करतो. पण हे करताना आपल्या मनात एक उपकाराची भावना निर्माणहोते. या सहानुभूतीच्या आणि उपकाराच्या ओझ्याखाली दिव्यांगांची कुचंबणासुद्धा होत असते, याची आपल्याला जाणीव नसते. शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तीकडेसुद्धा क्षमता असते,हे आपण विसरतोच. म्हणून त्यांच्यातील अंगभूतक्षमतांचा वापर न  झाल्याने त्यांचे आणि समाजाचेसुद्धा नुकसान होते. डॉ. जितेंद्र अग्रवाल हे दंतवैद्य. त्यांचे दंतवैद्यकीय काम सुरळीत चालू होते. पण, मध्येच त्यांच्या डोळ्यांना ‘मॅक्युलर डीजनरशेन’ ही व्याधी जडली आणि त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला. दंतवैद्य असल्याने डोळ्यांच्या व्याधीमुळे त्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला. नंतर लोकांच्या सहानुभूतीपूर्वक वागणुकीचा त्यांना अनुभव आला. मग सुरुवात झाली ‘सार्थक’ शैक्षणिक संस्थेची. दिव्यांगांसाठी योजना  अनेक आहेत, पण त्यांच्या क्षमतेचा वापर करून त्यांना अर्थार्जन करण्यासाठी कार्यक्रमांचा अभाव आहे. हीच गोष्ट ओळखून अग्रवाल यांनी सार्थक शैक्षणिक संस्थेच्या  माध्यमातून १८ ते ३० वयोगटातील दिव्यांगासाठी एका कोर्सची आखणी केली. हा कोर्स १ ते ३ महिन्यांचा असतो. यात माहिती-तंत्रज्ञानाचे धडे, संवाद कौशल्य, इंग्रजीवर प्रभुत्वाचे धडे दिले जातात. ही कौशल्ये शिकल्यानंतर दिव्यांगांना सेवा क्षेत्रात काममिळवणे सुलभ झाले. आतापर्यंत ‘सार्थक’ संस्थेने दहा हजार दिव्यांगांना नोकरी मिळवून दिली आहे. कौशल्य विकास हा महत्त्वाचा घटकअग्रवाल यांनी संस्थेच्या केंद्रस्थानी ठेवला. सार्थक संस्था कौशल विकास केंद्राच्या माध्यमातून लखनौ, लुधियाना, जयपूर, हैद्राबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, चंदीगड या शहरात कौशल्यविकासाचे धडे दिव्यांगांना दिले गेले. कौशल्य विकास का महत्त्वाचे आहे याचे कारण देताना अग्रवाल म्हणतात की, ‘‘सुशिक्षित दिव्यांगांकडे पाहण्याची लोकांची दृष्टी ही सहानुभूतीचीअसते. म्हणून ज्याच्याकडे शिक्षणासह कौशल्य असेल, तोच स्पर्धेत टिकतो.’’

 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अग्रवाल यांनी सरकारच्या साहाय्याने शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवा देण्याससुरुवात केली. तसेच समावेशक वर्ग ही  संकल्पना राबवली गेली. साधारण वर्गात जे शिक्षण दिले जाते, तेच शिक्षण वेगळ्या रूपाने समावेशक वर्गात दिव्यांग विद्यार्थ्यांना दिले जाते. एवढ्यावरच न थांबता अग्रवाल दरवर्षी एक राष्ट्रीय परिषद आयोजित करतात. या परिषदेत दिव्यांगांचे जीवन अजून कसे चांगले होईल, याचा  आढावा घेतला जातो. ९ नोव्हेंबर रोजी या परिषदेचे आयोजन दिल्लीत करण्यात आले असून यंदाचे हे चौथे वर्ष आहे. दिव्यांगांचा प्रश्न हा फक्त भारतापुरता मर्यादित न राहता याला  जागतिक स्वरूप देण्याची मनिषा अग्रवालयांची आहे. ते म्हणतात ना, एक दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याच दिव्याने दुसरा दिवाही प्रज्वलित करता येतो. अशाच एका प्रकाशमान दिव्यारुपी नरेश अग्रवाल यांची दिव्यांगांच्या सेवेतील हे ज्योत अखंत तेवत राहो, ही सदिच्छा...

 

- तुषार ओव्हाळ