पु. ल - एक प्रवास  
 महा एमटीबी  08-Nov-2017


 

आज आठ नोव्हेंबर, पु. ल. देशपांडे ह्या अफलातून माणसाचा आज जन्मदिवस. लेखक, संगीतकार, अभिनेते, उत्तम दूरचित्रवाणी कार्यक्रम सातत्याने देणारे निर्माते, एक अतिशय चांगले हार्मोनियम वादक, रसिक वाचक आणि समाजाला भरभरून देणारे उदारहस्त व्यक्तिमत्व ही अनेक लेबले लेऊन पुलंचं बहुआयामी व्यक्तित्व खुललं. 

 

पु. ल. मध्यमवर्गीय महाराष्ट्राच्या भावविश्वाचा एक अविभाज्य भाग होते. किशोरी आमोणकर आणि भीमसेन जोशी ह्यांचं गाणं ऐकणारा, घरात ज्ञानेश्वरी ठेवणारा आणि पु. ल वाचणारा तो मराठी मध्यमवर्गीय माणूस अशी जवळजवळ व्याख्याच बनलेली होती. पण पुलंचा वाचकवर्ग फार मोठा होता. त्यांनीच एका लेखात म्हटले होते की भारत-चीन युद्धाच्या वेळी प्रतिकूल परिस्थितीमुळे हताश झालेल्या, सीमेवर थंडीने काकडणाऱ्या एका मराठी सैनिकाने शेकोटीत घालण्यासाठी म्हणून हाती लागेल त्या पुस्तकाची पाने फाडायला घेतली. तो नेमका एक दिवाळी अंक निघाला, ज्यात पुलंचा 'माझे खाद्यजीवन' हा लेख प्रसिद्ध झाला होता. हाती आला म्हणून त्या सैनिकाने तो लेख वाचला आणि 'हे सगळे पदार्थ चाखून पाहायला तरी मला जगलेच पाहिजे' असा स्वतःशीच निश्चय केला. पुलंचे वाचक असे समाजातल्या सगळ्या वर्गात पसरलेले होते. पुलंचं गारुड महाराष्ट्राच्या समाजमनावर अजूनही आहे. आजकालची इंग्रजी माध्यमात शिकणारी मराठी तरुणांची पिढी कदाचित पुलंची पुस्तकं पहिल्यासारखी वाचत नसेल, पण पुलंचं कथाकथन आयपॉडवर ऐकत खदाखदा असताना मी अश्या मुलांना बघितलेलं आहे.

 

मी जेमतेम आठ-दहा वर्षांची होते तेव्हा माझ्या हातात पु. ल. देशपांडेंचं पहिलं पुस्तक पडलं - पु. ल. एक साठवण. माझ्या काकांनी ते माझ्या आजोबांना भेट म्हणून दिलं होतं. तेव्हा मी नुकतीच 'जादूची अंगठी आणि सुलभ पंचतंत्र' वगैरे पुस्तकांची यत्ता ओलांडून फास्टर फेणे आणि वि. वि. बोकीलांचा वसंता वाचायला लागले होते. ह्या दोन्ही लेखकांच्या पुस्तकांमधून विनोद बऱ्यापैकी पेरलेला असायचा. पण पु. ल. एक साठवण ह्या पुस्तकाने मला एकटीनेच खुदुखुदू हसायला शिकवलं. पुलंच्या विनोदातले सगळे न्युआन्सस कळायचं वय नव्हतं ते, पण त्यांचा शब्दप्रधान विनोद बऱ्यापैकी कळायचा. त्यातल्या न-नाट्य मधल्या इंग्रजीच्या 'इंटू मराठी' अनुवादाला खूप हसले होते मी. अंगुस्तान विद्यापीठ, सदू आणि दादू हे त्या पुस्तकातले मला खूप आवडलेले काही लेख. चाळ मधली संगीतिका आवडली होती पण शेवटचं स्वगत मुळीच आवडलं नव्हतं. ते कळायचं वयच नव्हतं ते. पुलंचा नॉस्टॅल्जिया कळायला पुढे फार वर्षे जावी लागली. साठवणची तेव्हा मी अक्षरशः पारायणे केली. आजही ते सर्वांगाने खिळखिळं झालेलं पुस्तक माझ्या संग्रही आहे.    

 

त्यानंतर मी पुलंची पुस्तके शोधून शोधून वाचायला लागले. तेव्हा गोव्यात मराठी पुस्तके सहज मिळत नसत म्हणून जवळच्या गावातल्या सरकारी वाचनालयाची वर्गणीदार झाले. माझ्या गावापासून पाच किलोमीटर वर ती लायब्ररी होती. कधी बसने, तर कधी चालत मी तिथे जायची आणि पु लंची पुस्तके शोधायला तिथली कपाटे पालथी घालायची. त्या लायब्ररीत तेव्हा कुमुदिनी रांगणेकर, योगिनी जोगळेकर, बाबा कदम वगैरे 'लोकप्रिय' कादंबरीकारांचीच जास्त भरती होती, तरीही मला तिथे पुलंची तीन-चार पुस्तके मिळाली, असा मी असामी, बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली मी तिथूनच मिळवून वाचली. पुढे माध्यमिक शाळेत गेल्यानंतर विविध स्पर्धांमधून भाग घ्यायला लागले. तिथे क्वचित रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळायची. ती रक्कम साठवून साठवून मी पुलंची पुस्तके विकत घायला लागले. आज पुलंची जवळ जवळ सगळीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. कधी कधी मी कल्पनाचित्रेही रंगवायची, की मी पुण्याला पुलंच्या घरी जाऊन धडकलेय आणि त्यांना गटणेच्या आविर्भावात विचारतेय, 'आपल्या प्रतिभासाधनेत व्यत्यय तर आणत नाही ना मी'? 

 

जसजशी पु. ल वाचत गेले तसतसा मला त्यांचा मोठेपणा कळत गेला. हा माणूस नुसता लेखक नव्हता, तर थोर नट होता, संगीतकार होता, अभ्यासू, डोळस, रसिक होता, गुणग्राहक होता, व्यासंगी होता आणि समाजाचे आपण काही देणे लागतो असे मानणारा उदारहृदयी दाताही होता! फक्त विनोदी लेखक हे त्यांना लावले जाणारे लेबल किती क्षुद्र आणि तोकडे आहे हे मला जाणवायला लागले. तरुण, होतकरू लेखकांची पुलंनी भरभरून केलेली स्तुती, नवीन पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना, 'एक शून्य मी' सारख्या पुस्तकातलं त्यांना जाणवत असलेलं समाजाचं अधःपतन आणि त्यामुळे त्यांना आलेली सुन्न विफलता, सगळंच मला आतून, खोलवर भिडत गेलं. पुलंची प्रवासवर्णनं वाचताना तर त्यांच्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व अजूनच प्रकर्षाने जाणवायचं. एखाद्या नवीन ठिकाणी जाताना केवळ तिथली प्रेक्षणीय ठिकाणं ना बघता, तिथली माणसं वाचायची असतात, तिथल्या कला, संस्कृती, संगीत, पाककला ह्यांचा मनःपूर्वक आस्वाद घ्यायचा असतो हे मी पुलंकडून शिकले. पर्यटक आणि प्रवासी ह्यांच्यामध्ये फरक असतो हा धडा मी पहिल्यांदा गिरवला तो पुलंच्या लिखाणातून. पुढे मी पुलंनी वर्णन केलेल्या बऱ्याचश्या देशांमधून प्रवास केला. प्रत्येक जागेचा अनुभव घेताना कुठेतरी पुलंचे शब्द मनात रेंगाळत होतेच. पुलंनीच आपल्या 'नाथा कामत' ह्या व्यक्तिचित्रात असं लिहिलं होतं की ' ह्या उर्दू कवीनींच नाथाच्या प्रेमभंगाच्या तसबिरींना महिरपींसारख्या त्यांच्या कवितेच्या ओळी पुरवल्या होत्या'. माझ्या बाबतीत माझ्या प्रवासाच्या तसबिरींना पुलंनी त्यांचे शब्द चौकटीसारखे पुरवले होते. बालीमध्ये केचक नृत्य बघत असताना माझ्या मनात डोकावत होती ती पुलंनी वर्णन केलेली त्यांनी बघितलेल्या केचक नृत्यातली विरहिणी सीता! इटलीत फिरताना मला भेटायचं होतं ते 'शंकराचार्य हे माझे ह्या जन्मीचे गुरु आहेत' म्हणणाऱ्या तपस्वी इतालियन डॉक्टरांना.  

 

गोवा हिंदू असोसिएशन च्या स्नेहमंदिर ह्या वृद्धाश्रमाच्या पायाभरणीला पु. ल गोव्याला येणार होते. मी माझ्या वडिलांच्या मागे लागून गोवा हिंदूच्या असोसिएशनच्या रामकृष्ण नायकना भेटून त्या समारंभाला हजर राहायचं आमंत्रण मिळवलं. त्या कार्यक्रम पु. ल आणि कुसुमाग्रज असे दोन्हीही मराठी साहित्यसृष्टीतले दिग्गज येणार होते. मी जेव्हा कार्यक्रमस्थळी पोचले तेव्हा माझे पायच लटपटत होते. अकरावीला वगैरे असेन मी तेव्हा. हिंमत करून पुलंची स्वाक्षरी घ्यायला गेले. गटणेच झाला होता माझा. 'आपण आणि साने गुरुजी माझे आदर्श लेखक आहात' असं म्हणायचं होतं, पण तोंडातून शब्दच फुटेना. पुलंनीच मला कोकणीतून विचारलं, 'काय शिकतेस, कुठं राहतेस'? मस्त कारवारी हेल होता त्यांच्या कोकणीला. तेव्हढ्यात तिथला फोटोग्राफर आला. त्याला पु. ल आणि कुसुमाग्रजांचा फोटो हवा होता. मी संकोचून बाजूला होणार तेव्हढ्यात पु. ल कोकणीत म्हणाले, 'तू उब्बे राव गो फोटोक' आणि मी ही फोटो साठी उभी राहिले. दुर्दैवाने पु. ल आणि कुसुमाग्रज ह्या दोन फार मोठ्या माणसांसोबत काढलेला तो फोटो मला कधी बघायलाच मिळाला नाही कारण त्या फोटोसाठी कुणाला विचारावं हे मला माहितीच नव्हतं. पण ह्या दोघांचीही अनमोल स्वाक्षरी मात्र माझ्या संग्रही आहे. 

 

काही वर्षांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी मी पुण्याला आले. तेव्हाही पु. लंना भेटायचं हा ध्यास मनात होताच. कुठून कुठून विचारून विचारून मी त्यांचा फोन नंबर मिळवला आणि सगळी हिंमत एकवटून त्यांना फोन केला. त्यांनीच उचलला फोन. मला बोलायला शब्द फुटेनात. तरी कसंबसं म्हटलं. 'मी शेफाली वैद्य, गोव्याची आहे. तुम्हाला भेटायचंय', त्यांनी लगेच परत कोकणीतून बोलायला सुरवात केली, खूप मायेने त्यांनी 'काय शिकतेस, कुठे राहतेस, पुणं आवडतंय का, फिश खावंसं वाटतं का' वगैरे सगळी चौकशी केली. मग म्हणाले 'आजकाल माझी तब्येत बरी नसते. कुणाला भेटावंसं वाटत नाही. त्रास होतो. रागावू नकोस. काही महिन्यांनी फोन कर. बरा असलो तर जरूर भेटेन'. पण तो योग काही आलाच नाही, कारण त्यांची प्रकृती पुढे खालावतच गेली. त्यांना कंपवाताने गाठलं होतं. मलाही फोन करण्याचा धीर झाला नाही परत. 

 

त्यानंतर तर मी पुणंही सोडलं. मी मुंबईला राहात होते तेव्हा त्यांना महाराष्ट्रभूषण जाहीर झालं होतं. तो कार्यक्रम प्रभादेवीला रवींद्रमध्ये साजरा झाला. तेव्हा पुलंची तब्येत खूपच खालावली होती. वार्धक्याने, कंपवाताने त्यांचा देह अगदीच आटून गेला होता. त्यांचं भाषणही ते स्वतः करू शकले नव्हते. कार्यक्रम संपला, बरेचसे प्रेक्षक निघून गेले, पण माझ्यासारखे पुलकित झालेले लोक मात्र रंगमंचावरून ज्या दाराने पु. ल बाहेर पडणार होते तिथे जाऊन उभे राहिले. पु. ल व्हीलचेअर मध्ये होते. भक्ती बर्वे ती चेअर स्वतः ढकलत रॅम्पवरून खाली घेऊन आल्या. दाढी वाढवलेले, कृश पु. ल आपल्याच विचारात गढून गेले होते. त्यांना बघायला जमलेल्या गर्दीची त्यांना जाणीवही नव्हती. त्यांना दुसऱ्याच रंगमंचावरची एंट्री खुणावत होती बहुतेक. त्यांची व्हीलचेअर अगदी माझ्या समोरून गेली. मी माझ्याही नकळत डोळे पुसले. 'डोळे भरून पाहून घे त्यांना पोरी. पूढे कधी हा योग्य येईल असं वाटत नाही', माझे भरलेले डोळे पाहून शेजारी उभ्या राहिलेल्या एक साठीच्या काकू म्हणाल्या. त्यांचेही डोळे वाहातच होते, किंबहुना त्या वेळी तिथं उभ्या असलेल्या शंभर-दीडशे माणसांपैकी प्रत्येकालाच भरून आलेलं होतं. ज्या पु. लंनी आम्हा सगळ्यानांच भरभरून आनंद दिलेला त्या पु. लंना अश्या अगतिक अवस्थेत पाहणं खरोखर तापदायक होतं. 

 

पु. ल. गेले तेव्हा मी नुकतंच लग्न होऊन मी दिल्लीला राहायला गेले होते. घरी टीव्ही तेव्हाही नव्हता आणि इंटरनेटचा वापरही तेव्हा कमी होता. मराठी पेपर मी घ्यायची पण ते तीन दिवसानंतर यायचे. त्यामुळे पु. ल. इस्पितळात आहेत, अत्यवस्थ आहेत हे माहिती होतं. हे कधी तरी घडणार आहे हेही माहिती होतं. पण तरीही मन ही वस्तुस्थिती स्विकारायला तयार नव्हतंच. पु.ल. गेले ही बातमी माझ्या वडिलांनी मला फोन करून कळवली तीही नवरा घरी असल्याची खात्री करून घेऊन. माझं पु.ल. प्रेम त्यांना चांगलंच ठाऊक होतं. बातमी ऐकली आणि मुसमुसून रडायलाच लागले. घरातलंच कुणीतरी अत्यंत जवळचं माणूस गेल्यासारखं निराधार वाटत होतं मला. माझ्या नवऱ्याला  कळेना की मी एव्हढी का रडतेय. तो अमराठी असल्यामुळे त्याने पुलंविषयी फक्त ऐकलं होतं. त्या दिवशी मी केलेला सगळा स्वयंपाक तसाच्या तसा बाजूला ठेवून दिला. घश्याखाली घासच उतरेना. त्या दिवशी मी दोन तास खपून मी पापलेटचं कालवण बनवलं होतं. त्या दिवसानंतर जवळ जवळ दोन वर्षे मी पापलेटला हातही लावला नाही. मासळी बाजारात पापलेट दिसलं तरी मला पु. ल. आठवायचे. पु. ल. गेल्यानंतर फक्त माझ्याच घरी नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक घरात हेच वातावरण होतं. 

 

पु. लंनी आम्हाला सगळ्यानांच खूप दिलं. मुक्त हस्ते दिलं. आजही माझ्या मॅजिकबरोबर बोलताना चुकून तोंडातून इंग्रजी आलं की 'यू आर किनई अ व्हेरी व्हेरी नॉटी डॉग, बरं का रे मॅकमिलन, लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर' हे शब्द हमखास आठवतात आणि फिस्सकन हसू येतं. देशाच्या राजकारणातल्या नित्य नवीन कोलांट्या उड्या बघितल्या की 'खिल्ली' ची आठवण होते. इंग्रजी शब्दांना मराठी क्रियापदांची फोडणी देऊन 'अमेरिकन एक्सेंट' मध्ये बोलणारे लोक बघितले की 'मराठीच म्हणजे मला तितकंसं, म्हणजे आय एम नॉट बरं का' म्हणणारी वाऱ्यावरची वरातमधली मिसेस गाssद्रे डोळ्यांसमोर येते आणि जाम हसू येतं. एखाद्या मराठी वर्तमानपत्रात इंग्रजीचं शब्दशः मराठीत भाषांतर करून मायभाषेची लक्तरे फाडलेली दिसतात तेव्हा हमखास 'निमकराच्या खाणावळीतली डुकराच्या मासाची तळलेली भजी' आठवतातच. म्हैस ही कथा म्हणजे तर वाक्यावाक्याला पंचेस असलेली धमाल विनोदी कथा. त्यातला तो जाड जिभेने बोलणारा 'आरडरली', 'एसटीवाल्यास धडा शिकवीन तर नावाचा धर्मा मांडवकर' असं म्हणणारा इरसाल कोकण्या म्हशीचा मालक, पंचनाम्यावर 'नाना फडणवीस' अशी सही करणारे रत्नागिरीच्या मधल्या आळीचे नाव राखणारे बगूनाना, आणि गर्दीतल्या 'सुबक ठेंगणी' कडे बघून भाव खाणारा मधू मलुष्टे, प्रत्येक व्यक्तिरेखा कशी अजूनही डोक्यात कशी फिट बसलीय. आयुष्यात चांगले शिक्षक भेटले तेव्हा हमखास चितळे मास्तर आठवतातच. जुन्या गोष्टी रंगवून सांगणारा एखादा हरितात्या, 'धिस इज दि यू ऑफ दि यू इन दि व्हू ऑफ दि सुप्राकॉन्शसनेस' ह्यासारख्या अगम्य भाषेत पंचतारांकित अध्यात्म सांगणारे गुरुदेव आजही आपल्याला दिसतात आणि 'बेंबट्या, कुंभार हो. गाढवांस तोटा नाही' हा बेंबट्याच्या वडिलांचा उपदेश आजही रेलेव्हंट वाटतो.    

 

असे पु.ल. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. त्यांचे शब्द कधी आमच्यासारख्यां सामान्य लोकांना पिसांसारख्या गुदगुल्या करून हसायला लावतात, एखाद्या चीड आणणाऱ्या प्रसंगाची धार म्हणता म्हणता बोथट करून जातात, तर कधी आम्हाला विचार करायला लावतात. 

 

- शेफाली वैद्य