वय लहान, पण कीर्ती महान!
 महा एमटीबी  08-Nov-2017


 

वय वर्ष फक्त अकरा, पण ती इतकी हुशार की भले-भले तोंडात बोटं घालून बघत बसतील. होय, गीतांजली राव. दोन वर्षांपासून उत्तर अमेरिकेमधील मिशीगनमध्ये फ्लिटं पाणी संकट आले होते आणि त्याने गीतांजलीची जणू झोपच उडवली होती. त्यावर तोडगा म्हणून तिने पाण्यातील शिसाचे प्रमाण मोजण्याचे कमी खर्चाचे एक यंत्रच बनवले. या शोधासाठी तिला अमेरिकेमध्ये नुकतेच ’यंग सायंटिस्ट चॅलेंज’ या स्पर्धेची विजेती म्हणून सन्मानित करण्यात आले. गीतांजली सध्या स्टेम स्कूल हायलँड रांच या शाळेत शिकत आहे. २०१४ मध्ये फ्लिटं पाणी संकट सुरू झाले, तेव्हा शहरातील सांडपाणी, प्रदूषित, प्रकिया केलेले दूषित पाणी फ्लिटं नदीत सोडण्यात आले. तेव्हा पाण्यातील या अशुद्धीमुळे सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्याचवेळी गीतांजलीला वाटले की, या समस्येचा सामना करणारी फ्लिटं ही एकमेव नदी नाही, तर त्यासोबत इतर जलस्त्रोतदेखील प्रदूषित असणार. त्यानुसार तिने संशोधन करायला सुरुवात केली आणि तिच्या संशोधनानुसार उत्तर अमेरिकेत असे पाच हजार जलस्त्रोत आढळून आले, जे शिशामुळे दूषित होते. त्यामुळे तिने पाण्यातील शिशाचे प्रमाण मोजणाऱ्या  यंत्राचा प्रयोग सुरु केला. हे संशोधन तिने कोलोरॅडोच्या तिच्या घरातील प्रयोगशाळेसारख्या छोट्याशा खोलीत केले.

 

त्याच दरम्यान तिने ‘डिस्कवरी एज्युकेशन ३ एम यंग सायंटिस्ट चॅलेंज’ बद्दल ऐकले. ही एक अशी स्पर्धा होती, जी दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या  मानवी समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी होती. गीतांजलीच्या प्रदूषित जलस्त्रोतांतून शिसे शोधण्याच्या या अनोक्या यंत्राला या स्पर्धेत जिंकून दिले आणि तिला २५ हजार डॉलर्सचा निधीही पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आला. गीतांजलीने सांगितले की, ‘‘हे यंत्र निर्माण करण्याची कल्पना खरं तर माझ्या आई-वडिलांकडून मिळाली. कारण, ते इंजिनिअर असून त्यांच्या कामाकरिता पाण्यातील शिसाचे परीक्षण करत होते.’’ असे हे ‘टेथिस’ नामक यंत्र बनविण्यासाठी गीतांजलीला अवघ्या पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. या यंत्रामध्ये शिसे ओळखण्यासाठी कार्बन नॅनोट्यूबचा वापर केला गेला. या यंत्राचे एकूण चार मुख्य भाग आहेत. एक मुख्य उपकरण, एक ब्लू टुथसोबत एक प्रोसेसर, एक नऊ व्होल्टची बॅटरी आणि एक पाण्यातील शिसे आत शिरण्यासाठी एक जागा आणि हे सर्व एका स्मार्टफोनशी जोडलेले.

 

गीतांजलीचे संशोधन एवढ्यावर थांबले नाही, तर तिला पुढे या संशोधनावर अधिकाधिक काम करून लोकांचे जीवन सुधारायचे आहे. भविष्यात तिला रोग परिस्थितीतज्ज्ञ (एपिडेमियोलॉजिस्ट) किंवा अनुवंशशास्त्रज्ञ  म्हणून काम करण्याची इच्छा आहे. या सर्वांसोबतच गीतांजली पियानो वाजवणे, पोहणे, नाचणे या सगळ्यातही आघाडीवर आहे.

याबद्दल सांगताना गीतांजलीने सांगते की, ’’प्रयत्न करताना कधीही मागेपुढे पाहू नये. मलाही माझे हे परीक्षण करताना कितीतरी वेळा अपयश आले. मात्र, नंतर नंतर सगळं छान जुळून आले आणि यश मिळालेच. मला माहिती आहे की, मला आलेले सर्व अपयश हे माझे प्रशिक्षण अधिक उत्तम करण्यासाठी मला नेहमीच मदत करणार आहेत.’’ शिवाय, तिच्या या उत्तम कार्याबद्दल तिच्या शाळेतील शिक्षकही तिचे खूप कौतुक करीत आहेत. जेनिफर हार्टसेल स्टॉकडेल यांनी सांगितले की, ’’तिला खरोखरच जग बदलण्याची इच्छा आहे. तिच्यामध्ये काहीही शिकण्याची बौद्धिक क्षमता आहे. त्याचबरोबर हाती घेतलेले कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्यावरच ती शांत बसते.’’ अशा शब्दांत तिचे कौतुक केले. तेव्हा, गीतांजलीने ‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ हा वाक्प्रचार खरोखरच सार्थ ठरवला आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

 

- पूजा सराफ