सेल्फी ...! "ती आणि ही "
 महा एमटीबी  08-Nov-2017


 

कधीकाळी आपल्या देशात कुटुंबव्यवस्था महिलांच्या हाती होती. कालांतराने त्यात बदल झाले. कुटुंब व्यवस्थेतून राजकीय व्यवस्थेत महिला पुढे आलेल्या आहे. काही वर्षांपूर्वी महिलांना राजकारणात गौण स्थान दिले जात असे. परंतु सध्या महिला लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या क्षमतेवर स्वत:चे स्थान बनविले आहे. काही महिलांना पिढीजात राजकीय वारसा मिळाला तर काहींनी तो निर्माण केला. राजकारणात महिलांच्या दृष्टिकोनाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच महिला खासदार राजकारणाकडे कोणत्यादृष्टीने पाहतात यातूनच समाज घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांना प्रचंड मोठा राजकीय वारसा आहे. तसाच वारसा भाजपाच्या खा.रक्षा खडसे यांच्याकडे आहे. परंतु दोन्हींचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाहिल्यास महिलांमध्ये राजकारणाचे विविध अंग लपलेले असल्याचे दिसून येते.


खा.सुप्रिया सुळे यांचे वडील खा.शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांना देशाच्या राजकारणातील दिग्गज म्हटले जाते. केंद्रात युपीएची सत्ता असतांना शरद पवार हे केंद्रीय मंत्री होते तर सुप्रिया सुळे या लोकसभेच्या सदस्या होत्या, आजही आहेत. ‘जाणता राजा ‘ अशी उपमा दिली गेलेल्या शरद पवार यांच्या कन्या सध्या राज्यातील रस्त्यांवरील खड्डयांचा शोध घेत त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यास व्यस्त आहेत. सोशल मिडीयावर आपण तसे त्यांचे फोटो पाहू शकतो. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री खड्डे बुजविण्याची अल्टीमेट दिल्या नंतर खा.सुळे यांचे हे फोटो प्रसारारीत व्हायला लागले आहेत. राज्यात १५ वर्षे आघाडीची सत्ता होती तर केंद्रात सलग १० वर्षे होती. तरी ही रस्त्यांची स्थिती होती तशीच आहे. थोडाफार फरक पडला असेल तर असेल. आघाडी सरकारच्या काळात खराब रस्त्यांमुळे लाखो अपघात झाले आणि हजारोंचा बळी गेला. परंतु सत्तेत राहण्याची सवय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसणे पचनी पडत नसल्याने मिळेल त्या मार्गाने सत्ताधाऱ्यांना विरोध करायचा हा त्यांचा अजेंडा दिसून येतो. खा. सुळेंना केंद्रात देश चालविण्यासाठी पाठविण्यात आले आहे, परंतु तार्इंचा मोह राज्याच्या राजकारणावरच दिसतो. देशातील प्रश्न हाताळण्यापेक्षा राज्यशासनाला अडचणीत कसे आणता येईल एवढाच प्रयत्न त्या करतांना दिसतात.


याउलट रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे यांचे सासरे माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांची राज्याच्या राजकारणावर चांगली पकड आहे. रक्षा खडसे या जि.प.च्या शिक्षण समितीच्या सभापती होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर जिल्हयाचे व रावेर लोकसभा क्षेत्राचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. नव्याने तयार झालेला रावेर लोकसभा मतदारसंघ हा देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आदिवासी भागसुध्दा समाविष्ट आहे. यातील काही आदिवासी पाडे दुर्गम भागात आहेत. तेथे कोणतेही वाहन पोहचू शकत नाही. १५ ते २० कि.मी. पायपीट करावी लागले. पहिल्यांदाच रुईखेड, माथन व साकदेव या गावांना खा.खडसे यांनी भेट दिली.त्यांच्या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच खासदार आले होते. त्यांनी पहिल्यांदा खासदार पाहिला. खा.खडसे यांनी केंद्र सरकारच्या योजना अशा दुर्गम भागात पोहचवून खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचे काम कोणते आहे हे पटवून दिले. त्यांच्या या कामाचा आंनद आदिवासीबांधवांच्या चेह­यावर दिसून येत होता. सध्या सेल्फी फिवर असल्याने खासदार खडसेंनीसुध्दा या आदिवासीं बांधवांसोबत सेल्फी काढून घेतला.


खा.खडसे यांनी आपल्या पहिल्याच पंचवार्षिकमध्ये मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावून दुर्गम भागात जावून नागरिकांना सरकार त्यांच्यासाठी काय करत आहे हे सांगीतले. नागरिकांचा आनंद टिपण्यासाठी सेल्फी घेतला तर दुसरीकडे सतत सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना तळागाळातील लोकांचा विकास होण्यापेक्षा सरकार अडचणीत कसे येईल याचाच शोध घेण्यात अधिक वेळ घालवण्यात आंनद मिळत असल्याचे दिसते. भाजपाच्या खा.रक्षा खडसे यांच्या कृतीतून ‘सबका साथ सबका विकास' हीच संकल्पना ठळक पणे दिसून येते. शेवटी सेल्फीच्या माध्यमातूनच ज्याचे-त्याचे अंतरंग समोर येवू लागले आहे.

- निलेश वाणी