नाशिक व्हावी क्रीडानगरी
 महा एमटीबी  07-Nov-2017
 

 
नाशिक शहर झपाट्याने विकसित होत आहे. कला-क्रीडा क्षेत्रातही शहराने आपले नामांकन नोंदविले आहे. या यशस्वी परिस्थितीसाठी नाशिकमधील अनेक व्यक्तींनी, संस्थांनी, स्वतः पायाचा दगड बनत, नाशिकच्या कलाक्रीडेला कळसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अशा संस्थांमध्ये ‘क्रीडाभारती’चे नाव असणारच, यात काही संशय नाही. तसेच खेळ, खेळ आणि खेळ असे एकमेव उद्दिष्ट ठेवणार्‍या साहेबराव पाटलांचे नावही ओघाने समोर येते.
 
दिंडोरीच्या पंढरीनाथ पाटील आणि सत्यभामा पाटील यांचे सुपुत्र साहेबराव पाटील. शिवछत्रपती क्रीडा मंडळ, सातपूरचे नेताजी सुभाष क्रीडामंडळ, नाशिक जिल्हा हँडबॉल असोसिएशन या आणि अशा शेकडो क्रीडासंस्थांशी संबंधित असलेले साहेबराव स्वतः अनेक खेळप्रकारात पारंगत आहेत. कुस्ती, खोखो, डॉचबॉल, हँडबॉल यात तर विशेष प्राविण्य. ‘क्रीडाभारती’च्या विविध पदांवर कार्यरत असताना ‘खेळातून चारित्र्य, चारित्र्यातून राष्ट्रनिर्माण’ या मंत्राचा जागर करत साहेबरावांनी स्थानिक स्तरावर क्रीडा संस्था कशा उभ्या राहतील, यासाठी जंगजंग पछाडले. त्यांनी कोणत्याही खेळाचे पद्धतशीर शिक्षण घेतले नाही, पण ते खेळत असलेल्या प्रत्येक खेळाचे ते गुरुजी झाले. नाशिकमध्ये क्रीडा संस्था उभ्या करणे तसे सोपे कामनव्हते. कारण, आता सत्तांतर झाले असले तरी पण काही वर्षांपूर्वी राज्य आणि केंद्रात दुसरे सरकार होते. ’जिसके हात लठ, उसकी भैस’ असेच समीकरण. त्यामुळे ‘क्रीडाभारती’चे साहेबराव मुलांना खेळ शिकवण्यापूर्वी ’वेदमंत्राहूनही प्रिय आम्हा वंदे मातरम्’ असे गीत गातात आणि खेळ शिकवून झाल्यानंतर ’वंदे मातरम्’चा जयघोष करतात, म्हणजे ते विशिष्ट विचारधारेचे पाईक आहेत. या एकाच कारणामुळे त्यांना कित्येक ठिकाणी क्रीडा संस्था उभ्या करण्यास मज्जाव करण्यात आला. पण साहेबरावांनी हिंमत सोडली नाही. नाशिक आणि महाराष्ट्रात शेकडो क्रीडा संस्था त्यांनी उभ्या केल्या. एक कुशल क्रीडा संघटक म्हणून त्यांचे नाव होऊ लागले. त्यांच्या हाताखालून हजारो विद्यार्थ्यांनी खेळाची दीक्षा घेतली. त्यांच्या निःस्वार्थी कामाची पोचपावती म्हणून १९९६ साली साहेबरावांना ’शिवछत्रपती राज्य क्रीडा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहेबराव म्हणतात, ’’माझे वडील उत्तमकुस्तीपटू होते, पण ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना संधी, प्रशिक्षण मिळण्यासाठी अनंत अडचणी आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या खेळगुणांना संधी मिळावी म्हणूनच कामकरण्यासाठी ग्रामीण भाग निवडला. सध्या गिरनार आणि परिसरातील ३३ वनवासी पाड्यांमध्ये कामसुरू आहे. क्रीडाक्षेत्रात नाशिकच्या मुलींना योग्य संधी मिळावी यासाठीही कामकरणे गरजेचे आहे. उदाहरणच देतो, खेळ जागृती संदर्भात प्रवास करत असताना असे कळले की, अंकिता काकड नावाच्या मुलीला आंतरराष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवडले होते, पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिचे स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजे मलेशियाला जाणे, खेळात सहभागी होणे जवळजवळ नाही असेच ठरले. हे कळताच आपल्या सहकार्‍यांच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करत अंकिताला योग्य ते सहकार्य केले. ती मलेशियाला हँडबॉल स्पर्धेत खेळली. हे जे आहे ना, ते मनाला समाधान देते. गुणी खेळाडूंना संधी मिळाली पाहिजेच. क्रीडा संस्था आणि खेळाला मनापासून मानणार्‍या व्यक्ती उभ्या राहिल्या पाहिजेत. माझा आणि संबंधित सर्वच संस्थांचा हाच प्रयत्न असतो.’’
 
साहेबरावांच्या शिष्यांनीही क्रीडाक्षेत्रात नाव कमावले आहे. डॉ. सुनील मोरे, सतीश धोंडगे, हेमंत पाटील या व इतरही त्यांच्या शिष्यांना ’शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ मिळाला आहे. नाशिक शहराचे शासकीय क्रीडा अधिकारी रवी नाईक हे देखील साहेबरावांचे विद्यार्थीच. आपल्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना साहेबरावांचा आवाज भरून येतो. ते म्हणतात, ’’या विद्यार्थ्यांनी आपल्यासारखे कितीतरी गुणी खेळाडू तयार केले आहेत. आम्हा सर्वांचे स्वप्न आहे की, नाशिकनगरी खेळांचे माहेरघर व्हावे.’’ ग्रामीण भागातून येऊन, सर्व नकारात्मक परिस्थितीशी सामना करत नाशिकमध्ये खेळांचे जग निर्माण करणारे साहेबराव.. नाशिक क्रीडा क्षेत्रातला एक या समहा संघटक...
 
-योगिता साळवी