शिवकालीन युद्धपट मांडणाऱ्या 'फर्जंद'चे पोस्टर प्रदर्शित
 महा एमटीबी  07-Nov-2017

  
मराठी मध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवरील आशयघन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आणि त्याला रसिकांचा प्रतिसादही चांगला मिळतो आहे. त्यामुळेच नवतरुण या क्षेत्रात वेगळं काहीतरी करण्याचं धाडस सातत्याने करताना दिसतात. वरुण नार्वेकर, निपुण धर्माधिकारी यांच्या नंतर आता दिग्पाल लांजेकर या तरुणाने दिग्दर्शनात आपले नशीब आजमाविण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे पदार्पणातच त्याने 'पिरॉडिक फिल्म' स्वरूपातील विषयाची निवड केली. दिग्पालच्या पहिल्या वहिल्या 'फर्जंद' या मराठी चित्रपटाचे आज पोस्टर प्रदर्शित झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पोस्टर प्रदर्शित झाले असल्याचे दिसून येत आहे. 
 

सोशल मीडिया वर या चित्रपटाची लगेचच सर्वत्र चर्चा सुरु झाली असून, पोस्टरला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. फर्जंद या चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये शिवाजी महाराजांची छबी आपल्याला पाहायला मिळत असून एका डोंगरावर त्यांचा एक मावळा दिसत आहे. या मावळ्याच्या एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल आहे. या चित्रपटाचे लेखन देखील दिग्पालनेच केले आहे. हा चित्रपट एक शिवकालीन युद्धपट असून मे २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 
सखी तसेच अस्मिता या मालिकांमध्ये दिग्पालने काम केले असून 'तू माझा सांगाती' या मालिकेची कथा त्याने लिहिली होती. ''फर्जंद'मध्ये गीतकाराच्या रूपाने सहभागी होता आलं याचं समाधान प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन याने सोशल मीडियावरून व्यक्त केलं आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोण असणार याची अजून उकल झालेली नाही.