‘मॅजिक फ्रिज’ ठरला दिलासादायक
 महा एमटीबी  06-Nov-2017


 

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा मानल्या जातात, परंतु काळानुसार या गरजांच्या यादीमध्ये वाढ होत चालली आहे.  त्यामुळेच पूर्वी ’चैनीच्या वस्तू’ म्हणून ओळखली जाणारी साधने, उपकरणे आता गरजेच्या वस्तू झाल्या आहेत. अर्थात या गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची आर्थिक क्षमता गरीब, दाारिद्य्ररेषेखाली येणार्‍या गटाकडे नसते. त्यामुळे नाईलाजाने त्या गरजेच्या वस्तूंपासून त्यांना वंचित राहावे लागते. त्या आवश्यक असल्या तरी त्याचा लाभ त्यांना काही घेता येत नाही परंतु त्या वस्तूंची, साधनांची वाढती गरज लक्षात घेऊन ती साधने, उपकरणे गरीबांच्या खिशाला परवडतील अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न एका १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने केला आहे. नवी दिल्लीमध्ये राहणार्‍या दीक्षिता खुल्लरने विजेशिवाय चालणार्‍या ’मॅजिक फ्रिज’चा शोध लावला आहे. 

खरंतर आज अवकाळी पडणारा पाऊस, सततच्या बदलत्या तापमानाचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होतो. तसाच त्याचा परिणाम अन्नपदार्थ, भाज्या, फळांवर होत असतो. शहरी भागात अन्नपदार्थ, नाशवंत पदार्थ, भाज्या खराब  होऊ नये, त्या ताज्यातवान्या राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात,परंतु ग्रामीण भागात, शेतीच्या उत्पन्नावर घर चालणार्‍या शेतकर्‍यांना, दारिद्य्ररेषेखाली येणाऱ्या  घटकांना फ्रिज घेणे आार्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यातच ग्रामीण भागामध्ये वीजेची समस्या असल्याने आणि फ्रिज हे उपकरण वीजेवरच चालणारे असल्यामुळे विजेच्या अभावामुळे ते घेऊनही फारसा फायदा होत नाही. परिणामी अनेक शेतकर्‍यांनी  पिकवलेल्या भाज्या,फळे, खराब होतात. त्यामुळे त्यांचे आार्थिक  नुकसान होते. एका सरकारी अभ्यासानुसार, भारतात  दरवर्षी ६७ दशलक्ष टन तो वाया जाते. या समस्येवर मात करण्यासाठी १२ वीमध्ये शिकणार्‍या दीक्षिता खुल्लर या विद्यार्थिनीने नामी युक्ती शोधून काढली आहे.  विजेशिवाय चालणार्‍या ’मॅजिक फ्रिज’ची निर्मिती तिने केली. दीक्षिताला पर्यावरण आणि त्यांच्याशी संबंधित समस्यांमध्ये खास रूची होती. त्यामुळेच पर्यावरणविषयक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा ती सातत्याने प्रयत्न करत असते. दीक्षिताने बनवलेल्या या ’मॅजिक फ्रिज’ला ’ब्रिक कूल स्टोर’असे नाव दिले आहे. दीक्षिताच्या फार्म हाऊसमध्ये असलेली फळे, भाज्या खराब होत असल्याचे तिच्या लक्षात आले. भाज्या, फळे खराब झाल्यामुळे होणार्‍या नुकसानाचा फटका गरीब शेतकर्‍यांना बसत असल्याचे तिला जाणवले. यासंदर्भात तिने अभ्यास केला असता तिच्या असे लक्षात आले की, आफ्रिकेतील नायजेरियामध्ये फळे, भाज्या टिकवून देण्यासाठी सोप्पी आणि कमी खर्च येईल, अशी पद्धत वापरली जाते. 

सर्वप्रथम तिने हा प्रयोग आपल्या फार्म हाऊसमध्ये  करून बघितला आणि त्याचा चांगला  परिणाम झाल्याचा अनुभव तिने घेतला. त्यानंतर तिने ’मॅजिक फ्रिज’ बनवून गरीब  शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. हा ’मॅजिक फ्रिज’ बनविण्यासाठी विटांपासून लहान भिंत बनवली जाते. मधली जागा मोकळी सोडून त्यांच्यावर वाळू ठेवली जाते. या विटांपासून बनवलेली भिंत साधारणपणे तीने ते चार फूट उंचीची ठेवली जाते. तसेच त्यावर बांबूपासून बनवलेले कुंपण  लावले जाते. आतमध्ये वाळूच्या वर एका कॅरेटमध्ये भाज्या, फळे ठेवल्या जातात. या मॅजिक फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या, फळे आठवडाभर ताज्या राहू शकतात. या मॅजिक फ्रिजचा वापर तमाम शेतकऱ्यांनी केला तर त्यांचे संभाव्य नुकसान टळू शकेल. त्याचबरोबर अन्नाच्या  होणार्‍या नासाडीवर नियंत्रण मिळवता येईल.दीक्षिताने या मॅजिक फ्रिजची माहिती इतरांना कळावी, यासाठी हरियाणामध्ये एक सेमिनार घेतले होते. विशेष म्हणजे सध्या गुरुग्राम तसेच आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांनी या मॅजिक फ्रिजचा प्रत्यक्षात उपयोग सुरू केला आहे. मॅजिक ङ्ग्रिजचा वापर जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी करावा, असा सल्ला दीक्षिता देत आहे.

 

- सोनाली रासकर