मानवी मूल्यांचा पाया
 महा एमटीबी  06-Nov-2017

 
 चॉंद का ख्वाब नसीब नही
 जिंदगी का मक्सद ही रोटी है

आजही जगभरात बहुसंख्य लोकांचे  एकवेळच्या अन्नप्राप्तीचेही वांधे आहेत. इंटरनॅशनल पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूूटने जगभरातल्या ११९ देशाच्या भूकग्रस्तांबाबत सर्वेक्षण केले. त्यात भारताचा १०० वा क्रमांक होता. जगातल्या भूकग्रस्त लोकांपैकी २५ टक्के जनता भारतात राहते. आता कुर्त्याच्या बाह्या सरसावत गुजरातच्या नवसर्जन यात्रेत पंजा चिन्हाकडून विचारले जाईल, ’’भय्या हेच का ते अच्छे दिन?’’ महाराष्ट्रात आदर्शाचा आदर्श निर्माण करणारे जनआक्रोश मोर्चातही जनाची मनाची गुंडाळत सरकारला धारेवर धरतील. इथे मुंबईतही ’कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’चे पालपुदही हळूच सुरू होईल. हळू यासाठी की आता वाघ शिकार करू शकत नाही म्हणजे राष्ट्रधर्माचे स्पिरीट उरलेच नाही. त्याने मनीमावशीची ममता स्वीकारली आहे. असो, विषयांतर झाले. तर मुद्दा असा आहे की, भारताचा भूकग्रस्तांमध्ये १०० वा क्रमांक आहे, असे म्हटल्यावर ही सगळी मंडळी भलतीच तावात येतील.

पण हेही नमूद करायला हवे की, २०१४ पूर्वी  केलेल्या सर्वेक्षणात भारताचे स्थान ११४ वे होते म्हणजे भारताने भूकबळी समस्येवर गंभीरपणे इलाज करायला सुरुवात केली आहे. जागतिक सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले आहे की, भारताच्या भूकग्रस्त समस्येला समाजाच्या, लोकांच्या सवयी जबाबदार आहेत.  संयुक्त राष्ट्राच्या सर्वेक्षण आकडेवारीनुसार देशात  साडे एकोणीस कोटी लोक भुकेने व्याकुळ असताना ४० टक्के अन्नाची नासधूस होते. या ४० टक्के अन्नाची किंमत ५० कोटी होते. 

आता तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू झाली. श्रीमंतीचे, पदश्रेष्ठतेचे प्रदर्शन करण्याचे एक सोवळे व्यासपीठ म्हणजे भपकेदार विवाहसोहळा हेे खेदाने म्हणता येईल.  विवाह, वाढदिवस किंवा तत्सम सोहळ्यांमध्ये मोजताही येणार नाहीत इतक्या अन्नपदार्थांचे काऊंटर असतात. सोहळा संपल्यानंतर त्या उरलेल्या अन्नाची वासलात लावण्याचाही एक कार्यक्रम गुपचूप होतो. भुकेने तडफडणार्‍यांच्या मुखी घास जाण्याऐवजी ते अन्न गटारात, कचराकुंडीत फेकले जाते. तसा आपला समाज पापभिरू आहे. जाणूनबुजून पाप करण्याच्या फंदात पडत नाही आणि आयते पुण्यही सोडत नाही. मग, अन्न वाया घालवण्याचे पाप बंद करायला हवे. भारतीय माणसाचा धर्म म्हणून आपण अन्न वाया घालवणे टाळूया. हाच आपल्या मानवी मूल्यांचा पाया समजू.
 
 -------------------------------------
 पठारावर फुटाणे .....

सध्याचे सरकार कसे गळचेपी करते, असे मगरीचे अश्रू ढाळत बोलणारे तालुका, जिल्हा किंवा गल्ली स्तरावरचे स्वघोषित साहित्यिक पैशाला पासरी आहेत. अर्थात त्यांनी खरडलेल्या लिखाणाला साहित्यिक मूल्य किती हा विषय अलहिदा. पण तरीही एक प्रश्‍न उरतोच की, जर सरकारच्या विरोधात बोलल्यावर सरकार गळा दाबतं म्हणजे आवाज बंद करते तर  मग हे लोक इतके कंठशोष करून कसे काय बरळत असतात? सरकारने त्यांचाही गळा म्हणजे आवाज दाबला असता ना? पण असेच असते गल्लीत कुणी विचारत नाही आणि स्वप्न दिल्लीची पडणार्‍या साहित्यिक राजकारण्यांना मी पण जिवंत आहे बरं का? माझी तेवढी थोडी तरी दखल घ्या हो.. असं सांगण्याची नामी संधी गमवायची नसते. त्यामुळे कुठल्याही स्तरावरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले की, ही मंडळी सुसाट सुटतात. त्यांच्या सुटण्याला नैतिक अधिष्ठान नसते की साहित्यिक संघर्ष, सृजनशीलतेचे परिमाण नसते.

ही मंडळी साहित्यदेवतेची सेवा करण्याऐवजी राजकारणावर घसरतात. बोलायला मिळाले ना, घ्या हात धुवून म्हणत, असे लोक  ’बालिश बहु बायकांत बडबडला’चे आरसपानी दर्शन लोकांना घडवतात. अर्थात रसिकजन त्यांना गंभीरपणे घेतच नाहीत. कारण रसिकांना माहिती असते की, याच मंडळींना सरकारी सवलत, पुरस्कार, समिती वगैरेचा मलिदा मिळाला तर यांची भाषा गळेदाबू सरकारवरून मायबाप सरकारवर येईल. 

गेल्या वर्षीही असहिष्णुता शब्द ज्यांना बोलताही येतो की नाही, अशा शंका वाटणार्‍या व्यक्तींनी त्यांचे साहित्यिक पुरस्कार परत केले. त्यानिमित्ताने त्यांचे फोटो, बातम्यांचे कव्हरेज झाले, पण देशातल्या करोडो लोकांना एकच प्रश्‍न पडला की, यांना साहित्यिक पुरस्कार मिळाला होता? हे लोक लिहितात? यांची पुस्तके प्रसिद्ध झालीत? बरं, मानवी मूल्यांचा उद्घोष करणारे साहित्यिक कोण आणि राजकीय चिखलफेकीतून वैयक्तिक हितसंबंधांचे तूप ओढणारे तथाकथित स्वयंघोषित साहित्यिक कोण? याची ओळख साहित्यप्रेमी सुजाणांना आहे. त्यामुळे स्वतःला साहित्यिक म्हणविणार्‍यांनी काळ-वेळ-सत्य यांचा लेखाजोखा ठेऊन वागायला हवे. कारण जनता हुशार आहे. तुमच्या स्वप्नातल्या साहित्यिक नंदनवनात रोटीवर तूप टाकण्याऐवजी जनता वास्तवात तुमच्याकडे पाठ फिरवून तुम्हाला पठारावर फुटाणे खायला पाठवू शकते.