गांधीहत्येमागील सत्यावर प्रकाश पडणे गरजेचे : डॉ. पंकज फडणीस
 महा एमटीबी  06-Nov-2017

 


३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची दिल्लीत हत्या केली. ३० जानेवारी २०१८ रोजी या घटनेला ७० वर्ष पूर्ण होतील. गांधीहत्येच्या गुन्ह्यात नथुराम गोडसे, नारायण आपटे, गोपाळ गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली होती. गांधी हत्येनंतर १५ नोव्हेंबर १९४९ रोजी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. यातून सावरकर निर्दोष सुटले आणि गोपाळ गोडसे यांना १९६४ साली सोडून देण्यात आले आणि पुन्हा अटक करण्यात आली. १९६५ साली त्यांची मुक्तता झाली. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी स्वा. सावरकरांचा मृत्यू झाला. १२ नोव्हेंबर १९६४ रोजी गोपाळ गोडसे, मदनलाल पहावा आणि विष्णू करकरे यांची मुक्तता झाल्याबद्दल पुण्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग.वि. केतकर उपस्थित होते. नथुराम गोडसे यांनी गांधींना मारण्याची कल्पना घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी आपल्याला सांगितली होती, असे केतकर यांनी सांगितले तसेच आपण त्यास विरोध केला आणि ही बातमी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री खेर यांच्याकडे बाळूकाका कानिटकर यांच्यामार्फत पोहोचवली, असे केतकर यांनी नमूद केले. या घटनेची बातमी ‘इंडियन एक्सप्रेस’ या राष्ट्रीय दैनिकाने १४ नोव्हेंबर १९६४ रोजी छापली आणि महाराष्ट्र विधानसभा आणि संसदेत गदारोळ उठला. नेत्यांच्या मागणीमुळे आणि जनमताच्या रेट्यामुळे तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांनी सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी कपूर आयोगाची स्थापना केली. २१ नोव्हेंबर १९६६ ते ३० सप्टेंबर १९६९ या काळात आयोगाने १०१ जणांची साक्ष नोंदवली. यात केतकर, मोरारजी देसाई आदींचा समावेश होता. १९४८ साली गांधीहत्येच्या खटल्यात सावरकरांचे अंगरक्षक अप्पा कासार आणि सचिव गजानन दामले यांना पोलिसांनी मारहाण करून त्यांच्याकडून साक्षी नोंदवून घेतल्या, परंतु त्या साक्षी न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करण्यात आल्या नाहीत. कारण या दोघांनी नंतर कोर्टात साक्ष देण्यास नकार दिला कारण त्यांच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब नोंदविण्यात आला होता. या दोघांच्याही साक्षी प्रत्यक्ष कपूर आयोगात नाहीत, परंतु प्रत्यक्ष पुराव्यामध्ये ज्यांची दखल घेतली गेली नव्हती त्या साक्षींच्या आधारे गांधीहत्येत सावरकरांचा सहभाग असल्याचे कपूर आयोगाच्या अहवालात नोंदवले. हा अहवाल तत्कालीन सरकारने मान्यही केला नाही आणि नाकारलाही नाही. यामुळे गांधीहत्येत सावरकरांचा हात असल्याची टीका करण्याची टीकाकारांना संधी मिळाली. गांधींचा मृत्यू तीन गोळ्या लागून झाला, असा पुरावा सादर केला गेला आणि तशीच नोंद सर्व पुस्तकांमध्ये केली गेली. परंतु गांधींवर चौथी गोळी झाडणारी आणखी कुणीतरी व्यक्ती होती आणि त्यामागे ब्रिटिश सत्ताधा-यांचा हात होता, असा दावा ‘अभिनव भारत’चे विश्वस्त आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी केला आहे. गांधीहत्येची पार्श्वभूमी अमूलाग्रपणे बदलणारा हादावा आहे. त्यांनी याविषयी पुरावे गोळा करून आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मग चौथी गोळी मारणारी व्यक्ती कोण? त्यामागे कोणाची प्रेरणा होती? या संदर्भात नव्याने चौकशी करून यासंबंधातील संभ्रम दूर करावा आणि सावरकरांचे नाव गांधीहत्येशी जोडले जात आहे, त्यासंबंधी निःसंदिग्ध वस्तुस्थिती लोकांसमोर यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात केलेल्या संशोधनाच्या आणि याचिकेसंदर्भात ‘मुंबई तरुण भारत’ ने डॉ. पंकज फडणीस यांच्याशी केलेली खास बातचीत.

 


 

हे सर्व संशोधन करण्याची आणि जनहित याचिका दाखल करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

१९९६ साली मी सावरकर सदनमध्ये राहायला आलो. तिथे राहायला आल्यावर सावरकरांच्या कार्याविषयी माझ्या मनात जिज्ञासा जागृत झाली. मी ११ वीला असताना १९७६ साली ’फ्रीडम ऍट मिडनाईट’ हे पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात सावरकर आणि सदनबद्दल बदनामीकारक उल्लेख होता. म्हणून मला उत्सुकता होती की, ज्या घरात आपण राहतोय तिथे खरंच गांधींच्या खुनाचा कट रचला गेला होता का? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला होता आणि त्यातून यासंबंधातली सत्य परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी १९९६ पासून संशोधन सुरू केले.

 

संशोधन करत असताना काय अडचणी आल्या?

खूप वर्षांपूर्वीची घटना असल्याने प्रत्यक्षदर्शी व्यक्तींशी चर्चा करणे शक्य नाही, असा जो तोटा झाला तसेच बरेच गोपनीय दस्तऐवज आता खुले झालेले आहेत, हा फायदाही झाला.त्यामुळे आजवर जी माहिती मिळाली नव्हती किंवा ज्या माहितीचा विचार केला गेला नव्हता, अशा माहितीच्या आधारे गांधीहत्येच्या प्रसंगात पुन्हा चौकशी करावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

 

मुंबई उच्च न्यायालयाचा काय निर्णय आहे?

मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत असताना ज्या गोष्टीवर सर्वोच्च न्यायालयाने, ’’शिक्कामोर्तब केलेले आहे त्याचा आम्ही पुनर्विचार करण्यास जाऊ इच्छित नाही,’’ असा निर्णय दिला.परंतु वस्तुस्थिती तशी नाही.  नथुरामगोडसेंनी आपल्या निकालावर अपील केले नव्हते परंतु नारायण आपटेंनी त्यावेळी सर्वोच्च न्यायालय नसल्याने प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले होते.सर्वोच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्यांची दखल घेणे आवश्यक होते, परंतु तत्पूर्वीच नारायण आपटेला फाशी  

 

देण्यात आली. त्यामुळे गांधीहत्येतील तथ्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेले आहे, हा उच्च न्यायालयाचा निकाल वस्तुस्थितीशी विसंगत होता. म्हणून या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मी याचिका दाखल केली. त्या याचिकेत म्हटले आहे की, “नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना १५ नोव्हेंबर १९४९ साली फाशी देण्यात आली. आपलं सर्वोच्च न्यायालय २६ जानेवारी १९५० साली स्थापन झालं. म्हणून उच्च न्यायालयाचे म्हणणे बरोबर नाही.’’

 

आपण ही माहिती कुठून मिळवली आणि ती मिळवताना काय काय अडचणी आल्या?

 

मी तीन ठिकाणांहून माहिती मिळवली, एक राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली, दोन पब्लिक रेकॉर्ड ऑफिस इग्लंड आणि National A­rchive  Research A­dministration (N­R­) ­America. अजूनही अमेरिकेतून एक महत्त्वाची तार मिळालेली नाही. ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीतील अमेरिकन दूतावासातून गांधीहत्येबद्दल तीन तारा पाठवल्या गेल्या. पहिली तार ६ वाजता पाठवली गेली व त्यात एवढेच लिहिले होते की, गांधीजींची हत्या झालेली आहे. दुसरी तार ८ वाजता पाठवली गेली व त्यात लिहिले होते, गांधींची हत्या झाली तेव्हा दूतावासातील हर्बट थॉमस रायनर हा गांधींपासून ५ ङ्गुटाच्या अंतरावर उभा होता आणि त्याने गोडसेला पकडले पण गोडसेला रायनरने पकडले, असे आतापर्यंत कुठेही नमूद केलेले नाही.ही तार ८ वाजता केली होती. तोपर्यंत रायनर दूतावासात आलेला नव्हता. दूतावासात आल्यावर १०-११ वाजता त्याने आणखी एक तार करून घटना विस्तृतपणे सांगितली. ही तार अजूनही अमेरिका गोपनीय ठेवत आहे. आपल्याकडे जसा माहितीचा अधिकार आहे तसा अमेरिकेत Freedom of Information (FOI­)  ही चा कायदा आहे. या कायद्यानुसार मी माहिती मागवली, पण तेथील माहीतगाराच्या म्हणण्यानुसार ही माहिती मिळायला बरीच वर्षे लागतील. त्यांना मी विचारले, ‘‘बरीच वर्षे लागण्याचे काय कारण आहे?’’ मग त्यांनी सांगितले की, ‘‘यात आमचे Vital A­merican National Interest गुंतलेले आहे.’’ गोडसे भारतीय होते, गांधी भारतीय होते, हत्या भारतात झाली, हत्या करणारा भारतीय होता, तर यात अमेरिकेच्या हितसंबंधांचा प्रश्न कुठे येतो? १९६३ साली अमेरिकेत त्यांचे राष्ट्राध्यक्ष केनेडींची हत्या झाली. तो तिथे अजून मोठा संवेदनशील विषय आहे. तरी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे खुली केली गेली. स्वतःच्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येची कागदपत्रे अमेरिका खुली करते मग गांधींबद्दलची कागदपत्रे गोपनीय ठेवण्याचे काय कारण? हा सर्वात मोठा अडचणीचा विषय आहे. तो सोडविण्यात लोकांनी आणि शासनाने माझी मदत करावी, अशी माझी रास्त अपेक्षा आहे. लॉरेन्स दे साल्वादेर या गोव्यात जन्मलेल्या आणि नंतर पोर्तुगालमध्ये स्थायिक झालेल्या लेखकाच्या ’हू किल्ड गांधी’ या पुस्तकावर बंदी आहे. या पुस्तकात काही संदर्भ आहेत. हे पुस्तक मिळवताना अडचणी येत आहेत.

 

कपूर आयोगाच्या निष्कर्षाबद्दल आपले आक्षेप कोणते आहेत?

 कपूर आयोगाने काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत. त्यांच्यासमोर ज्या साक्षी आल्या त्या त्यांनी चांगल्या प्रकारे नोंद केल्यामुळे घडलेल्या घटनेवर अधिक प्रकाश पडणे शक्य झाले आहे. ज्या तीन साक्षी त्यांच्या समोर झाल्या त्यामध्ये मनुबेन गांधींची साक्ष आहे. मनूबेन गांधी त्या दिवशी गांधींसोबत असल्याने त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या साक्षीनुसार ३० जानेवारीला गोडसे दुपारी आला होता आणि गांधींच्या अगदी जवळ उभा होता. त्याला गांधींना मारणे सहज शक्य होते. त्यावेळी त्यांनी का मारलं नाही, हे कळायला मार्ग नाही. त्यानंतर राजस्थानमधील अल्वर येथील पोलिसांच्या नोंदीत असे आढळून आले की, एका विदेशी साधूने गांधी हत्येची सायक्लोस्टाईलची पत्रकं ३ वाजताच वाटली होती. ही पत्रके बनवायला तास दीड तास तरी लागला असणार म्हणजे ज्यावेळी ही पत्रकं तयार केली म्हणजे या साधूला पूर्वसूचना होती. याचा अर्थ असा निघतो की, दुपारीच गांधीहत्या करण्याचे कोणीतरी ठरवले असावे, परंतु कोणत्या तरी कारणामुळे त्यावेळी ते घडले नाही. मनूबेन गांधींची साक्ष आणि अल्वरमधील पोलिसांच्या नोंदी यातून हाच अर्थ निघतो. तिसरी महत्त्वाची साक्ष होती पुण्याचे कलेक्टर स. गो. बर्वे यांच्या पत्नी सरला बर्वेंची. सरला बर्वेंनी साक्ष दिली की, २७-२८ जानेवारीला साठे नावाचे एक गृहस्थ आले. त्यांना कलेक्टरना भेटायचं होतं, पण ते घरी नव्हते. साठेंनी सरला बर्वेंना असे सांगितले की, “दोन-तीन लोक पुण्याहून गांधींना मारायला दिल्लीला गेले आहेत आणि पुण्यातील काही गुंड लोक ब्राह्मणांची घरं जाळण्याची तयारी करत आहेत. म्हणजे गांधी हत्या आणि त्यानंतर ब्राह्मणांविरोधातील झालेल्या दंगली हा आधीच ठरलेला पूर्वनियोजित कट होता. म्हणजेच मनूबेन गांधींची साक्ष, अल्वर पोलिसांच्या नोंदी आणि सरला बर्वेंच्या साक्षीवरून हे लक्षात येतं की, कुणीतरी एक मोठा कट रचला होता. वास्तविक या साक्षी कपूर आयोगाने नमूद केल्यानंतर याचा तपास व्हायला हवा होता. कपूर आयोगात सर्वात मोठी त्रुटी अशी की, आयोगात सावरकरांवर आरोप केला आहे. तो आरोप त्यांनी निरीक्षणामध्ये (Observation) केला आहे. निष्कर्षामध्ये (Findings) केलेला नाही,परंतु निष्कर्षात मराठी समाजाविषयी आपला आकस कपूर आयोगाने नमूद केलेला आहे. कपूर आयोगात कपूर म्हणतात की, “यु. एच. राणा पुण्याचे डी.आय.जी सीआयडी होते. दिल्लीत असताना त्यांना २४ जानेवारीला कळविण्यात आले की, गांधींना मारण्याचा कट रचण्यात आला आहे तर २४ तारखेला या गृहस्थाने पुण्याला फोन करायचा. त्यांनी तो केला नाही. ते मुंबईला विमानाने येऊ शकले असते, पण ते आले नाही. हा माणूस दिल्लीहून ट्रेनमध्ये बसला तेव्हाही आणि आजही दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी अलाहाबादला जाण्याची गरजच नाही.त्यांच्या वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी ते अलाहबादला गेले. ते सगळं करून ते मुंबईला आले. त्यांनी हा जो काही हलगर्जीपणा केला त्या हलगर्जीपणाबद्दल कपूर लिहितात, “२० तारखेला हल्ला झाल्यानंतर हे लोक एवढ्या चपळाईने हालचाल करतील, असे पोलिसांना वाटले नव्हते आणि अशी चपळाई तर मराठी फौज करायची.’’ आता मराठी फौजेचा यात काय संबंध?म्हणजे या माणसाला मराठी माणसाबद्दल द्वेष, पूर्वग्रह होता आणि निष्कर्षात ही सर्वात मोठी त्रुटी आहे.

 

गांधीहत्येमध्ये चार गोळ्यांचा वापर झाला, असा दावा आपण करत आहात. त्याला कोणता आधार आहे?

माझ्या याचिकेत तो पुरावा सविस्तरपणे दिलेला आहे. ‘डॉन’ हे वर्तमानपत्र आता कराचीतून प्रकाशित होतं. पूर्वी ते दिल्लीहून प्रकाशित होत असे. त्यात स्पष्टपणे ४ गोळ्यांचा उल्लेख आहे. ’टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिले आहे की ‘four shots fired', लोकसत्तेच्या बातमीत ४ गोळ्यांचा संदर्भ आहे. तत्कालीन मोठ्या वृत्तपत्रांत ४ गोळ्यांचा उल्लेख आहे. गांधी हत्येच्या आदल्या रात्री ते बिर्ला हाऊसमध्ये राहिले. तेथील गांधी स्मृतीमध्ये विन्सेट शीनच्या डायरीतील नोंद उद्धृत केली आहे. त्या नोंदीत त्याने चार गोळ्यांचा आवाज ऐकल्याचा उल्लेख केलेला आहे. जर चार गोळ्यांचा दावा खोटा असेल तर ती उद्धृत केलेली नोंद काढून टाकावी लागेल. ‘हिंदू’ या वृत्तपत्राने फोटो छापला होता. त्यात ४ गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत आणि तो सरकारी फोटो आहे. त्याचे नाव आहे ’PIBMG2626' . त्याची निगेटिव्ह आजही उपलब्ध असेल. त्याचे फॉरेन्सिक एक्झामिनेशन करता येईल. हे झालं वृत्तपत्रातलं आणि प्रत्यक्ष लोकांनी पाहिलेलं किंवा फोटोचं. दुसर महत्त्वाचं असं की, पुराव्यांमध्ये तीन गोळ्यांचा उल्लेख असला तरी महात्मा गांधींच्या मृतदेहाचं अधिकृत शवविच्छेदन झालेलं नाही. तनेजा नावाच्या एका कर्नलने साक्षीनुसार ३१ जानेवारीला गांधींच्या शरीराची तपासणी केली. ३१ तारखेला सकाळी ८.३० वाजता लाखो लोक गांधींचे अंत्यदर्शन घेत होते. तेव्हा ही तपासणी कशी शक्य होती? मूळगावकरांचे पुस्तक आहे ’द मेन हू किल्ड गांधी’ या पुस्तकात पोलिसांच्या नोंदी उद्धृत केल्या आहेत. त्यात त्यांनी डीएसपीचे हस्तलिखित प्रकाशित केले आहे. त्यात लिहिले आहे की, ’’मी ६ वाजता तपासणीसाठी गेलो. त्यावेळी मला दोन गोळ्या सापडल्या. गांधींच्या शरीरातून बाहेर पडलेल्या दोन गोळ्या त्यांना सापडल्या आणि एक गोळी शरीरात होती. ती त्यांच्या दहनानंतर मिळाली.’’ असा तीन गोळ्यांचा हिशेब होतो. नथुरामगोडसेंच्या पिस्तुलातूनही तीन गोळ्या झाडल्या गेल्या आणि चार गोळ्या काडतुसामध्ये शिल्लक होत्या. मनुबेन गांधींच्या डायरीत असा उल्लेख आहे की, रात्री गांधींना शेवटची आंघोळ घालताना एक गोळी सापडली. तेव्हा ही चौथी गोळी आली कुठून? म्हणून माझा असा दावा आहे की, गांधीहत्येत चार गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील तीन नथुरामगोडसेंच्या बंदुकीतल्या होत्या आणि चौथी गोळी दुसर्‍या व्यक्तीने झाडली होती. विजयालक्ष्मी पंडित मॉस्कोमध्ये राजदूत म्हणून राहिल्या असताना अनेकांनी गांधींना मारण्यात ब्रिटिश अखेर यशस्वी झाले, असा उल्लेख केला. म्हणजेच या संबंधातील चर्चा आंतरराष्ट्रीय जगातील गुप्तहेर जगतामध्ये होत होती. Head of State गव्हर्नर जनरल माऊंटबॅटन याचा गांधीहत्येत हात होता, असा माझा आरोप आहे. भारतातील कुणाचा हात होता, असा माझा आरोप नाही. याचे कारण तोवर सर्व गुप्तहेर यंत्रणा व तपास यंत्रणेवर गव्हर्नर जनरल या नात्याने माऊंटबॅटन यांचे नियंत्रण होते.

 

गांधीहत्येमागे ब्रिटिशांचा कोणता हेतू होता?

  गांधी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात होते आणि हे संबंध चांगले झाले असते तर ते ब्रिटिशांना घातक होते. आशिया खंडातील या दोन राष्ट्रांतील वैषम्य त्यांचे आर्थिक गणितं बिघडवू पाहत होते. सगळ्यात मोठी गोष्ट अशी की, लोकांना वाटतं की आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तर इंग्रजांचा यात हात कसा काय असू शकतो? २० एप्रिल २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर (PIL 682 of 2005) निर्णय दिला होता की, “भारत सरकारने सांगावे की, पंकज फडणीस म्हणतात ते बरोबर आहे की नाही.’’ माझ्या म्हणण्यानुसार आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी नव्हे तर २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र झालो. त्यामुळे भारत सरकारने याची सूचना काढावी. मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकारला ६ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. आता २०१७ चालू आहे. अजून मला कोणी उत्तर दिलेले नाही. उलट त्यांनी हे मान्य केले की, १९५० पर्यंत British Crown continued to be Sovereign over India until 1950. गृह खात्यात २००५ ची फाईल आहे. त्यात हे नमूद आहे. म्हणून त्यांना काहीही करण्याची मुभा होती आणि त्यांनी ते तसं केलं.चौथी गोळी मारणारा दुसरा एक माणूस होता. चौथी गोळी नथुरामच्या पिस्तुलमधून चालू शकतच नव्हती, असा अहवालही आहे. ब्रिटीश गुप्तहेर खात्याशी संबंधित फोर्स १३६ चा त्यात हात होता. विजयालक्ष्मी पंडित यांच्याजवळ हाच आरोप राजदूतांनी केला होता १९४८ मध्ये. तोच आरोप मी करतोय.


 

गांधीहत्येत सावरकरांचे नाव जोडले जाते त्यासंबंधी काय सांगाल?

सावरकरांचा गांधीहत्येशी सुतरामसंबंध नाही. सावरकरांना आरोपी केले गेले आणि त्या आरोपातून ते निर्दोष मुक्त झाले. त्याविरोधात सरकारने अपील केले नाही. जर सावरकर दोषी होते तर तत्कालीन सरकारने उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती. त्यांनी ती मागितली नाही. तो विषय तिथेच संपला. कपूर आयोगाला त्यावर भाष्य करण्याचा काहीच अधिकार नव्हता. अमेरिकेतील मेरिलॅण्ड नॅशनल अकाईव्हजमध्ये त्यावेळच्या अमेरिकन वकिलातीतील अधिकारी डोनोवन यांनी दि. ८ ऑगस्ट, १९४८ रोजी वॉशिंग्टन येथे अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांना पाठविलेल्या आपल्या अहवालात ही गोष्ट नमूद केली आहे. डोनोवन यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, ’’गांधीहत्येच्या खटल्यातील सरकारचे विशेष वकील सी. के. दफ्तरी यांनी मला सांगितले की, त्यांच्याकडे सावरकरांविरोधात कोणताही सबळ पुरावा नसून जे दावे केले जात आहेत, ते पोकळ असून त्यांच्या मते सावरकरांची सुटका होईल.’’ गांधीहत्येच्या खटल्यात इतक्या लोकांना गोवण्यात सरकारची चूक झाली असून या हत्येत जेवढे प्रत्यक्ष सहभागी झाले होते, त्यांच्यापुरताच हा खटला चालविणे उचित ठरले असते. यापूर्वीही डोनोवन यांनी गांधीहत्येची माहिती देणारी तार अमेरिकन सरकारला पाठविली होती आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी अमेरिकेच्या वतीने पंतप्रधानांना शोकसंदेशही पाठविला होता. यापूर्वी गांधीहत्येत सावरकरांचे वकील असलेले ऍड. भोपटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील आठवण लिहून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी कायदामंत्री होते. त्यांनी ऍड.भोपटकर यांना भेटून सांगितले की, “सावरकरांबाबत सरकारपाशी कोणताही पुरावा नाही परंतु, राजकीय दबावामुळे त्यांच्याविरुद्ध खटला चालविला जात आहे.’’ त्यांनी ही आठवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर लिहिली असल्याने काही विरोधकांनी त्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु, या नव्या पुराव्यामुळे सरकारी पक्षाला सावरकरांच्या विरोधात पुरावे नाहीत, या वस्तुस्थितीची कल्पना होती, याला दुजोरा मिळाला आहे.

पण नथूरामने गांधीची हत्या केली आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली हे सत्यच आहे ना?

ते कोणीच नाकारत नाही. परंतु नारायण आपटेने ही हत्या करायला नथूरामगोडसेला प्रवृत्त केले. नारायण आपटे ब्रिटिश सरकारसाठी कामकरत होता यासंबंधीचा पुरावा मी सादर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात काय भूमिका घेतली आहे?

सर्वोच्च न्यायालयाने न्यायमित्र म्हणून ज्येष्ठ वकील आणि additional solicitor-general ऍड. अमरेंद्र शरन यांची नियुक्ती केलेली आहे. माझ्या याचिकेवर त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे.

या सगळ्यातून काय निष्पन्न होणार?

गांधीहत्येमागे नेमक्या कोणत्या शक्ती होत्या आणि त्यांचा हेतू काय होता? हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वैरभाव कायम राहावा, अशी ब्रिटिशांची इच्छा होती. यातून त्यांनी गांधीहत्या घडवून आणली, ही गोष्ट स्पष्ट झाली. असा वैरभाव असणे चांगली गोष्ट नाही. अशी भावना पाकिस्तानमध्येही निर्माण होईल.