गुजरातमध्ये ‘मोदी वलय’ कायम
 महा एमटीबी  04-Nov-2017
रवींद्र दाणी
हिमाचल प्रदेशात भाजपाने प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करून योग्य निर्णय घेतला. वास्तविक हा निर्णय घेण्यास भाजपा नेतृत्वाने काहीसा विलंब केला. हिमाचल प्रदेशात 9 तारखेला मतदान होत असून, राज्याचे 83 वर्षीय मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी भाजपाने मु‘यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नसल्याची टर उडविणे सुरू केले होते. भाजपा विवाहाची तयारी तर करीत आहे, मात्र त्यांना अद्याप ‘दुल्हा’ ठरविता आलेला नाही, असा त्यांचा प्रचार होता. एकीकडे वीरभद्रसिंग यांचा हा प्रचार तर दुसरीकडे भाजपाकडून निर्णय घेण्यात होत असलेला विलंब याने भाजपा कार्यकर्ते व जनता दोन्ही ठिकाणी गोंधळाची स्थिती तयार होत होती. शिवाय हिमाचल प्रदेशात ठाकूर मतदार सर्वाधिक म्हणजे 28 टक्के आहेत. भाजपाने उमेदवार घोषित केला नसता तर यातील बहुतेक मते वीरभद्रसिंग यांच्याकडे जाण्याची शक्यता होती. भाजपाने प्रेमकुमार धुमल यांचे नाव घोषित करून एकप्रकारे हिमाचल प्रदेश जिंकण्यावर शिक्कामोर्तब केले आहे, असे मानले जात आहे. हिमाचल प्रदेशात साधारणत: एकदा भाजपा व एकदा काँग्रेस असे होत आलेले आहे. राज्यात पाच वर्षांपासून काँग्रेस सरकार आहे. सरकारच्या विरोधात स्वाभाविक नाराजी आहे. मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत. त्यांना जमानत मिळाली असल्याने ते बाहेर आहेत. पण, तरीही जनतेत त्यांची चांगली पकड आहे.
जबर आत्मविश्वास
वीरभद्रसिंग यांनी आपली परंपरागत जागा आपल्या मुलासाठी सोडली आहे तर ते स्वत: भाजपा प्रभावाच्या मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. वीरभद्रसिंग यांना स्वत:वर किती विश्वास आहे याचा हा दाखला मानला जातो. आपल्या मतदारसंघावर भाजपाची पकड असली तरी आपला विजय निश्चित असल्याचे ते सांगत आहेत. वीरभद्रसिंग यांनी जुगार खेळला आहे असे काहींना वाटते. 68 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाला 40 जागा मिळतील असा एक अंदाज वर्तविला जात आहे.
पराभवाचा अंदाज
हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा पराभव होईल याचा अंदाज बहुधा काँग्रेस नेत्यांनाही आलेला आहे. राज्यात काँग्रेसच्या प्रचाराची सारी धुरा वीरभद्रसिंग यांच्यावर सोपवून काँग्रेस नेते मोकळे झाले आहेत. राहुल गांधी वगळता एकही काँग्रेस नेता हिमाचल प्रदेशाकडे फिरकलेला नाही.
‘लक्ष्य’ गुजरात
काँग्रेस नेते व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले सारे लक्ष गुजरातवर केंद्रित केले आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना निवडणूक प्रभारी नेमले आहे. गहलोत हे माळी समाजाचे असून, ते राजस्थानात जननेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुजरातमध्ये राहुल गांधींच्या दौर्‍यांना मिळत असलेल्या प्रतिसादाने काँग्रेस नेते उत्साहित असले तरी राज्यात काँग्रेसचा मुकाबला मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याशी नाही हे लक्षात घेतले पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत आल्यावर श्रीमती आनंदीबेन पटेल राज्याच्या मु‘यमंंत्री झाल्या. नंतर विजय रुपानी हे मुख्यमंत्री झाले. रुपानी हे जैन समाजाचे आहेत. त्यांचा प्रशासनाचा फारसा अनुभव नसला तरी त्यांनी बर्‍यापैकी सरकार चालविले आहे. मात्र, मोदी यांच्या शासनकाळाशी तुलना करता त्यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य नव्हते. राज्यात कॉंग्रेस विरुद्ध विजय रुपानी अशी लढत झाल्यास कॉंग्रेसला चांगले यश मिळू शकते. मात्र राज्यातील लढत कॉंग्रेस विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच होणार आहे. मोदींना गुजरातमधील प्रत्येक जिल्हा-तालुका माहीत आहे. जनतेत त्यांच्याबद्दल आदर आहे. मोदी यांनी गुजरातसाठी भरपूर काम केले आहे याची जनतेला जाणीव आहे. मोदी पंतप्रधान असताना, त्यांचा पराभव, गुजरातचा पराभव ठरेल याची जाण जनतेला आहे. त्यामुळे आज राहुल गांधींच्या सभांना गर्दी करणारा मतदार शेवटी मतदान मात्र भाजपालाच करील असे भाजपाला वाटते.
त्रिमूर्तीचा उदय
गुजरातमध्ये आरक्षण आंदोलनाचा एक इतिहास आहे. त्याच आंदोलनातून हार्दिक पटेलचा उदय झाला. राज्यात पटेल समाजावर अन्याय होत असल्याची एक भावना तयार करण्यात हार्दिक यशस्वी झाला आहे. हार्दिक पटेल हा पटेल समाजाचा चेहरा म्हणून समोर आला आहे तर कल्पेश ठाकूर याने ओबीसी समाजाला एकत्र केले आहे. जिग्नेश मेवाणीने दलित समाजाला एकजूट केले आहे. या तिघांनीही सध्या भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हे तिघेही युवा आहेत. त्यांचा युवा मतदारांवर किती परिणाम होतो व तो किती प्रमाणात मतदानात रूपांतरित होतो याचा अंदाज कुणालाही करता आलेला नाही. एकदा उमेदवारी अर्ज भरला जाऊन प्रचार सुरू झाल्यावर तो अंदाज करता येईल. मात्र तरीही मोदी यांची जादू या तिघांवर भारी पडेल असा विश्वास भाजपाला वाटत आहे.
नाराज व्यापारी
जीएसटीमुळे गुजरातमधील व्यापारी नाराज असल्याचे मानले जाते. गुजरात हे देशातील व्यापाराचे एक मु‘य केंद्र असून, जीएसटीबद्दल देशात आढळणार्‍या नाराजीची खरी तीव‘ता गुजरातमध्ये असल्याचे मानले जाते. मागील काही दिवसांत केंद्र सरकारने जीएसटीमध्ये काही बदल केले असून, त्याने ही नाराजी बर्‍याच प्रमाणात दूर झाली आहे असे भाजपाला वाटत आहे. व्यापार्‍यांची नाराजी आहे हे खरे असले तरी मतदान करताना व्यापारी वर्ग मोदींच्या विरोधात मतदान करणार नाही अशी खात्री भाजपाला वाटत आहे. व्यापारी वर्गाने आजवर आम्हाला पाठिंबा दिला आहे. जीएसटीमुळे तो आम्हाला सोडून जाणारा नाही, असा विश्वास भाजपाला वाटत आहे.
चुरशीची निवडणूक
कॉंग्रेसने आपली सारी ताकद गुजरातमध्ये लावण्याचा घेतलेला निर्णय व स्थानिक घटक याने गुजरातमधील निवडणूक चुरशीची झाली आहे. दोन्ही पक्षांनी गुजरात जिंकण्याची तयारी चालविली आहे. मोदी असेपर्यंत कॉंग्रेसला गुजरातमध्ये फार काही करता आलेले नाही. या वेळी मात्र कॉंग्रेसने गुजरातवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसने आपले राज्यसभा खासदार अहमद पटेल यांना बाजूला सारले आहे. राहुल गांधींच्या सभांमध्ये अहमद पटेल यांची उपस्थिती दिसत असली तरी ती फक्त दिसण्यापुरती आहे. राहुल गांधी व अहमद पटेल यांच्यात तसेही मतभेद आहेत. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीपासूनही राहुल गांधी यांनी स्वत:ला वेगळे ठेवले होते. आता या निवडणुकीची सारी सूत्रे त्यांनी अशोक गहलोत यांच्याकडे सोपवली आहेत.
नवा बदल
कॉंग्रेसच्या प्रचारात या वेळी एक नवा बदल दिसून येत आहे. राहुल गांधींच्या प्रचाराचा प्रत्येक दिवस एखाद्या मंदिरापासून सुरू होतो. कॉंग्रेसची प्रतिमा हिंदूविरोधी झाली होती. ती बदलण्यासाठी राहुल गांधी असे करत असल्याचे समजते. याच व्यूहरचनेतून त्यांनी अहमद पटेल यांना बाजूला केले असल्याचे समजते. धार्मिक धृवीकरण झाल्यास त्याचा फायदा भाजपाला होतो हे कॉंग्रेसच्या लक्षात आले असल्याने काँग‘ेसने अगदी ठरवून, रोजगार, किसान, व्यापारी, हे मुद्दे उपस्थित करण्याचे ठरविले असल्याचे पक्षातून सांगितले जाते.
गुजरातमध्ये सोशल मीडियावर कॉंग्रेसला सक्रीय करण्यात राहुल गांधींना यश मिळाले आहे असे त्यांच्या समर्थकांना वाटते. गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याचाही परिणाम गुजरातवर होईल असा कॉंग्रेस नेत्यांचा अंदाज आहे. भाजपा व कॉंग्रेस यांना आजवर मिळत असलेल्या मतांमध्ये 10 टक्के मतांचा फरक आहे. भाजपाला 48-49 टक्के मते मिळत आली आहेत तर कॉंग्रेसला 38 टक्के मते मिळत आली आहेत. भाजपाची 5 टक्के मते कमी होणे व कॉंग्रेसला 6 टक्के अधिक मते मिळणे ही किमया राहुल गांधींना करून दाखवायची आहे आणि ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही.