लक्ष्यभेदी शिवानी
 महा एमटीबी  04-Nov-2017


उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले...

डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही

या कोणा एका कवीच्या काव्यपंक्ती ‘त्या’ चिमुकलीसाठी अगदी योग्य वाटतात. वय वर्ष केवळ पाच. पण वयाच्या अगदी तिसऱ्या वर्षापासूनच तिने देशभरात आपले नाव मोठे करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अशी ही चिमुकली म्हणजे शिवानी चेरूकुरी. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी शिवानीने ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ मध्ये जागा मिळवत भविष्यातील तिरंदाजांच्या यादीत आपले नाव उज्ज्वल करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दि. २४ मार्च २०१५ रोजी शिवानीने आपल्या नावे एक अनोखा विक्रम नोंदवत तिरंदाजी खेळावर आपली छाप सोडली. तिला पाच आणि सात मीटर रिकर्व तिरंदाजी स्पर्धेत २०० गुणांची आवश्यकता असताना तिने ३८८ अंकांची कमाई करत उत्तम खेळाचा नमुना दाखवून दिला. यावेळी तिला २४ प्रयत्नांमध्ये ७५ बाण डागायचे होते. प्रत्येक तिरंदाजाला एका प्रयत्नासाठी दोन मिनिटे लागतात. मात्र, शिवानीचे प्रशिक्षक चंद्रशेखर लाजुरी यांना तिच्यावर असलेला विश्वास सर्व काही सांगून जातो. प्रशिक्षणादरम्यानच त्या चिमुकलीने ४०० अंक मिळवत आपली या खेळाबद्दल असलेली आत्मियता दाखवून दिली होती, तर यावर्षीही तिने तिरंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावे केला. खेळाप्रती असलेली तिची ओढ तिच्या खेळातून आणि सरावादरम्यान घेत असलेल्या मेहनतीतून दिसून येते. अॅकॅडमीमध्ये सराव करण्यासाठी येणाऱ्या मोठ्या खेळाडूंप्रमाणेच शिवानीचा अॅकॅडमीमध्ये वावर असतो. कोणत्याही ठिकाणी जाताना लहान मुलांना रंगीबेरंगी कपड्यांची ओढ असते. मात्र, सरावादरम्यान ती चिमुरडी कायमच आवश्यक गणवेशातच दिसते. 

 

आपले बाण, धनुष्य कोणाच्याही मदतीशिवाय ती चिमुरडी उचलताना दिसते. एकाग्रतेने खेळताना तिला पाहून या खेळाप्रती तिची ओढ पाहण्यासारखी असते. विजयवाड्याला तिरंदाजीची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. या ठिकाणी अर्जुनाला भगवान शंकराकडून पाशुपतास्त्र मिळाल्याचे सांगितले जाते. अशा ठिकाणी असलेल्या या अॅकॅडमीने आज अनेक तिरंदाज देशाला दिले आहेत. वेन्नमज्योति सुरेखा, चित्तिबूमा जिगनस, रितुल चटर्जी, मंगल सिंह चंपिया यांसारख्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेबरोबरच अन्य स्पर्धांमध्येही पदकांची कमाई केली आहे. शिवानीचा खेळ पाहता प्रत्येक महिन्याला ती पार करत असलेल्या लक्ष्याला दोन मीटरने वाढविण्यात येत असल्याचे अॅकॅडमीचे अध्यक्ष आणि शिवानीचे वडील सूर्यनारायण सांगतात. २०२० पर्यंत शिवानी राष्ट्रीय संघात तर सहभागी होईलच, पण ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही देशाचे नाव मोठे करेल, असा विश्वासही ते व्यक्त करतात. चेरूकुरी यांच्या मुलाचे २०१० मध्ये दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांनंतर एका दुर्घटनेत निधन झाले होते. त्यापूर्वी २००४ मध्ये त्यांच्या मुलीचे देखील निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी शिवानीचा जन्म झाला. शिवानीच्या जन्मापूर्वी आपल्याला होणाऱ्या अपत्याची ओढ तिरंदाजीकडे असावी, अशी इच्छा त्यांच्या मनात होती. यासाठी त्यांनी पोलंडवरून ऑप्टिकल फायबरचे वजनाने हलके असलेले धनुष्यदेखील मागवून ठेवले होते. २ एप्रिल २०१२ रोजी शिवानीचा जन्म झाला. सध्या शिवानी २०२४ साली होणाऱ्या ऑलिम्पिक खेळासाठी मेहनत घेत आहे. तिरंदाजी हा खेळ तिच्या रक्तात आणि नसानसांमध्ये भिनला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

 

- जयदीप दाभोळकर