एड्‌स जनजागृती आवश्यक
 महा एमटीबी  30-Nov-2017
 

आज जागतिक एड्‌स दिन. या भयंकर आजाराने माणूस खंगून खंगून मृत्यू पावतो. त्याआधी लोकांच्या मानसिकतेनेच तो अर्धमेला होतो. २०१६ साली १० लाख लोक एचआयव्ही संबंधित आजारांनी मृत्यू पावले, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. १९८१ साली अमेरिकेत या विषाणूचा पहिल्यांदा शोध लागला.

भारतात पहिल्यांदा १९८६ मध्ये चेन्नईमध्ये डॉ. सुनीती सोलोमन आणि डॉ. सेलेप्पन निर्मला यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये एड्‌सचे रुग्ण आढळले. १९९२ साली नॅकोम्हणजेच नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशनची स्थापना केली गेली. एड्‌स रोखण्यासाठी नॅकोने १९९२ ते ११९९ या सात वर्षांसाठी पहिला कार्यक्रम राबवला. संभाव्य अशा शहरी भागात हा कार्यक्रम राबवला गेला आणि नंतर ग्रामीण भागातसुद्धा हा कार्यक्रम राबवला गेला. कदाचित त्यामुळेच भारतात एड्‌सने थैमान घातले नाही. नॅकोने एड्‌सवर उपचार आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतिबंधासाठी उत्तम कार्य केले. उपचारांसाठी नॅकोची २०२ केंद्र आहेत, जिथे उपचारासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. या केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लाखांच्या घरात आहे. ही केंद्रे सर्वाधिक महाराष्ट्रात असून त्यांची संख्या ४३ आहे. भारत सरकार आरोग्याच्या अर्थसंकल्पापैकी ५ टक्के निधी हा एड्सच्या रुग्णांसंबंधी खर्च केला जातो. एड्‌सच्या बाबतीत सर्वाधिक समस्या ही काही आफ्रिकन देशांपुढे आहे. त्यात दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया या देशांचा क्रमसर्वात वरचा आहे. तिथले केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या विद्यमाने तिथे एड्‌ससाठी कार्यक्रम राबवले जातात.

एड्‌सविषयी जेवढे गैरसमज आपल्या समाजात आहेत
, तितक्या इतर कुठल्याही रोगाविषयी नसतील. त्यात या रोगावर अजूनही औषध/लस नसल्याने लोकांमध्ये अजूनही भीती आहेच. एड्‌सग्रस्त रुग्णाला तुच्छतेची वागणूक दिली जाते. यामुळे भारत सरकारने ११ फेब्रुवारी २०१४ रोजी एड्‌सच्या रुग्णाविषयी गुप्तता पाळण्यासंबंधी विधेयक मांडले गेले. ते एचआयव्ही एड्‌स विधेयक या नावाने २१ मार्च २०१७ रोजी राज्यसभेत मंजूर झाले. खरंतर कायदा झाला म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा आपल्या मानसिकतेत सुधारणा करणे आपल्याला गरजेचे आहे. निरोध वापरण्याविषयी जनजागृती तसेच लैंगिक शिक्षणाने हे सहजसाध्य आहे. एड्‌स दिनानमित्त एड्‌सबाबत जनजागृती करण्याचा संकल्प सोडूया.

    - तुषार ओव्हाळ