‘आंतरभारती’ ची गरज
 महा एमटीबी  30-Nov-2017 

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असे आपण आपल्या प्रतिज्ञेतच म्हणतो. ही विविधता धार्मिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि भाषिक आहे. भारतीय संविधानाने २२ भाषांना अधिकृत दर्जा दिला आहे. राज्यांचा कारभार हा राज्यांच्या राजभाषेतच होतो. २९ नोव्हेंबर १९६७ रोजी बनारस हिंदू विद्यापीठात देबब्रत मजुमदार या विद्यार्थ्याने अंग्रेजी हटावमोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेला हिंसक वळण लागून पोलिसांच्या गोळीबारात तेव्हा २ विद्यार्थी जखमी झाले होते. मजुमदार हे लोहियांचे शिष्य होते आणि लोहियांचा इंग्रजी विरोध सर्वश्रृत आहे. भारतातील भाषिक चळवळीला मोठा इतिहास आहे. भारतातच नव्हे, जगातसुद्धा भाषेमुळे बंड पेटली. धर्म आणि भाषेच्या या संग्रामात किती हुतात्मा झाले असतील, याची गणतीच नाही. आजही भारतात भाषांचे प्रश्न खदखदत आहेत. देशात इंग्रजी वि. हिंदी’, ‘हिंदी वि. मराठी.’ ‘हिंदी वि. द्रविडी भाषाअसा संघर्ष आपल्याला दिसतो. आपल्या भाषेसाठी आपण आग्रही असणे कदापि चुकीचे नाही. एखाद्याच्या मनातले जाणून घ्यायचे असेल, तर त्याच्याशी त्याच्या मातृभाषेत संवाद साधावा, असे म्हणतात.

 
या संघर्षाच्या काळात गरज आहे ती, साने गुरुजी यांनी सांगितलेली आंतरभारतीसंकल्पना राष्ट्रीय स्तरावर राबविण्याची. १९३० साली साने गुरुजी जेव्हा तामिळनाडूच्या तेव्हाच्या त्रिचिनापल्ली आणि आताच्या तिरुचिरापल्ली कारागृहात होते, तेव्हा त्यांचा संबंध दक्षिणेच्या भाषा अभ्यासकांशी आला आणि त्यांना जाणवले की, भारतीय भाषांच्या समृद्धीविषयी आपण पूर्णपणे ज्ञात नाही. भारतात एवढ्या भाषा आहेत की, त्यांच्यातील ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीही संकल्पना मांडली. भारताला प्रांतवादाचा धोका ओळखून त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनसारखी संस्था उभारण्याचा मानस जाहीर केला होता. या संस्थेत भारतीय भाषांचे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी निधीही गोळा केला होता. साप्ताहिक साधनासुरू केल्यानंतर त्यांनी याविषयी लेखनसुद्धा केले होते. सध्या पुणेस्थित आंतरभारतीही संस्था गुरुजींच्या या संकल्पनेचा वारसा पुढे चालवत आहे. संस्थेकडून मासिक प्रकाशित करून अशा भारतीय भाषांतील ज्ञानाचे आदान प्रदान होते. मराठीतल्या कित्येक भाषांतरकारांनी इतर भाषेतील साहित्य मराठीत आणून ही संकल्पना अप्रत्यक्षरित्या राबवली आहे. ब-याच वेळेला आपल्या भाषेवरील प्रेम हे न्यूनगंडातून आलेले असते. इतर भाषा येत नाही, त्यातून कुचंबणा होते आणि भाषा लादल्याचा ग्रह निर्माण होतो आणि भाषिक संघर्ष निर्माण होतो. आंतरभारतीमुळे या संघर्षाची धार काहीशी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

- तुषार ओव्हाळ