विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ४२
 महा एमटीबी  03-Nov-2017

 

अवंती: मेधाकाकू...मागच्या धड्यात...संपूर्ण कुटुंबाच्या सवयी किंवा कुटुंबाची आर्थिक व्यवहाराची पद्धत यावर केलेल्या सहज टीका-टिप्पणी एकदम सही आहे...!!...खरे म्हणजे त्यात अशा प्रवृत्तींवर स्पष्ट आणि छान जाणीव जागृती केलीली दिसत्ये मला... पण तू अजूनही खूप सांगायचं बाकी आहे असे म्हणत होतीस त्यादिवशी...!!..

 

मेधाकाकू: अवंती...आळस, अहंकार, आसक्ती, क्रोध, लोभी वृत्ती, मत्सर अशा नकारात्मक प्रवृत्ती आणि प्रेम, आपुलकी, उत्साह, श्रद्धा, भक्तीभाव, निश्चयी वृत्ती, समरसता, धैर्य, कणखरता अशा होकारात्मक प्रवृत्तींचा उल्लेख खूप सहजपणे येतोय या लोकसाहित्यातून आणि लोकश्रुतीतून सुद्धा...!!..एखादी गृहिणी अगदी हळूबाई असते किंवा तिचे घरातले व्यवहार मंद गतीने होताना अनेकवेळा दिसतात...!!..

 

पाहुणा जा कि रहा, दाळी शीज कि भीज

 

अवंती...आपल्या घरातल्या गृहिणीचा असा छान परिचय करून देणारा हा वाकप्रचार, अतिशयोक्ती अलंकाराने सिद्ध आहे आणि तो सगळे कसे स्पष्ट सांगतो आपल्याला...!!..यातला ‘दाळी’ हा शब्द ‘डाळ’ या अर्थाने घ्यायचा आहे. हि गृहिणी किती मंद आणि उदासीन आहे कि घरात आलेला पै-पाहुणा केंव्हा घरी आलाय, किती दिवस राहतोय आणि त्याने निरोप केंव्हा घेतलाय हे तिच्या खिजगणतीत नाही...!!..ती इतकी तटस्थ असावी कि भांड्यातली डाळ भिजत टाकल्ये कि शिजायला ठेवल्ये याचेही भान तिला नाही...!!..अशा मंद व्यक्तिमत्वाचा या समाजाने सखोल अभ्यास केला होता ताची खात्रीच पटते...!!..

 

अवंती: मेधाकाकू...किती सूक्ष्म निरीक्षण मांडले आहे यात...मात्र कुठेही राग अथवा निंदा, आक्षेप किंवा रोष मात्र इथे व्यक्त होत नाही...इतके सहज वर्णन...!!..

 

मेधाकाकू: अरे व्वा...अवंती, तुला खूप छान जाण आल्ये आता आणि स्पष्टीकरण सुद्धा एकदम सही...!!.. आता हा वाकप्रचार फारच गमतीचा आहे बघ...!!..

 

पोहर्यास चर्हाट बोळवण

 

यामधला ‘पोर्हा’ किंवा ‘पोहरा’ म्हणजे...विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी अर्थात पाणी काढण्यासाठी वापरले जाणारे धातूचे मोठे भांडे, जे नेहमी रहाटाला किंवा चाऱ्हाटाला बांधलेले असते. बोळवण करणे याचा खरा अर्थ म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला भेटवस्तू देऊन किंवा नवविवाहितेला ओटी भरून आनंदाने निरोप देणे. मात्र आपली गृहिणी थोडीशी अजागळ आणि तीला मंगल व्यवहाराचे ज्ञान नाही...!!..पाहुण्या सुहासिनीला निरोप देतानाच, महिन्याभरासाठी माहेरी रहायला आलेल्या लेकीची अर्थात माहेरवासिनीची सुध्दा ओटी भरते आणि दोघीनाही निरोप देते...!!...रहाटाचे काम कसे करायचे ते माहित नसले कि दोर्याला बांधलेला पोहरा, रहाटासह विहिरीत पडतो...!!..पर्यायोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण, जिथे एखादी गोष्ट अथवा परिस्थिती आडवळणाने सांगितली जाते. इथे पोहरा+चार्हाटाची उपमा वापरून हा वाकप्रचार, या गृहिणीने घातलेल्या गोंधळाचा परिचय करून देतो...!!

 

अवंती: अशा प्रवृत्तीना मस्त खेचायचे ना...त्या काळात सुद्धा...!!..पण मेधाकाकू...तू म्हणत्येस तेच खरे आहे...असा अतिशयोक्ती अलंकारच, याचा योग्य धडा शिकवत असावा...ऐकणाऱ्याला...!!..

 

मेधाकाकू: आता आपल्या स्टोरीमधे छोटेसे ट्वीस्ट आहे...बघ कसे ते...!!.. या वाकप्रचारात आपण उदासीन, अजागळ गृहिणी पाहील्या. यांच्यासारखीच बनेल बायकोसुद्धा आज आपल्याला भेटणार आहे...आणि त्याबरोबर निगुतीने व्यवहार करणारी चतुर आजीसुद्धा, दोघीही एकाच वाक्प्रचारात भेटणार आहेत...!!..नवरा दुपारी जेवायला घरी आला कि बनेल बायको त्याला जेवायला वाढते मात्र नवऱ्याने माझ्याबरोबरच जेव असा आग्रह केला कि हि काही तरी सबब काढून ती भांडण करते आणि तिचे आवडते वाक्य नियमित येते...

 

माझे गेले चुलीत

 

इथेच खर गोम आहे...!!..या बायकोला रोज काही चमचमीत बनवून एकटीला खायची आवड असते. त्यासाठी नवरा घरी यायच्या आधी ती तिच्या एकटीसाठी असे काहीतरी बनवते आणि ते चुलीत लपवून ठेवते. नवऱ्याला सांगताना ती अगदी सत्यच सांगते...’माझे गेले चुलीत’...!!..बनेल बायकोची अशी गम्मत व्याजोक्ती अलंकारच उत्तम रीतीने या वाक्प्रचारात सदर करतो. व्याजोक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देणे...!!..तर  दुसऱ्या  चतुर आजीने, आपल्या लाडक्या तरुण सुनेसाठी थोडी साय आणि थोडे लोणचे, चुलीत लपवून ठेवलेले असते. पुरुष मंडळी जेवायला बसली कि आपले पोटभर जेवतात आणि तरुण सुनेचे आणि घरातल्या अन्य बायकांचे जेवण व्हायचे आहे याचा त्याना विसरच पडतो. अशावेळी चतुर आजीने चुलीत लपवलेले पदार्थ , नंतर जेवणाऱ्या सुनेच्या तोंडी लागतात.

 

अवंती: मेधाकाकू...मराठी भाषेचे असे वैभव आणि तिचे असे अलंकार...फार मस्त वाटत...तुझे सगळे ऐकताना...!!..

 

अरुण फडके