​याचसाठी केला होता अट्टाहास !
 महा एमटीबी  03-Nov-2017

 

एक नितांतसुंदर बोधकथा मागे वाचण्यात आली होती. सत्तरीतले एक आजोबा समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी निघालेले असतात. समुद्राच्या ओहोटी दरम्यान हजारो स्टारफिश किनाऱ्यावर वाहत आलेले असून एक शाळकरी मुलगा आपल्या छोट्याशा हातांनी हे स्टारफ़िश समुद्रात फेकत असल्याचे दृश्य या आजोबांना दिसते. या स्टारफिशना वाचवण्याची या मुलाची धडपड पाहून या आजोबांना कौतुक वाटते आणि या मुलाजवळ जाऊन आजोबा त्याला विचारतात, ’बाळ, तुझी धडपड कौतुकास्पद आहे, पण इथे किनाऱ्यावर हजारो स्टारफ़िश पडले आहेत. त्यातले कितीसे वाचवू शकणार तू ?’ यावर आपले हातातले काम अजिबात न थांबवता तो मुलगा चटकन उत्तर देतो, ’..पण मी समुद्रात टाकत असलेले स्टारफ़िश तर शंभर टक्के वाचतील ना !’ या उत्तराने आजोबा अंतर्मुख होतात आणि स्वत: देखील त्याला मदत करु लागतात.


रक्त तपासणीचं अत्याधुनिक असं नॅट (nucleic acid testing) तंत्रज्ञान अंगिकारताना जनकल्याण रक्तपेढीच्या भावनाही काहीशा या गोष्टीतल्या मुलासारख्याच होत्या. म्हणजे असं – रुग्णाला दिलं जाणारं रक्त ही आहे दुधारी तलवार. अर्थात संकलित केलेल्या रक्ताच्या तपासणीत जर तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे काही उणीव राहिली तर जे रक्त जीवनाचं वरदान देऊ शकतं तेच एच. आय. व्ही., कावीळ यांसारख्या संसर्गांचा शापही रुग्णाला देऊ शकतं. रक्ताच्या संक्रमणातून असा घातक संसर्ग झाला तर त्यातून एखादे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. मग हे सर्व टाळण्यासाठी तंत्रज्ञान जर आपल्याला मदत करीत असेल तर अशा तंत्रज्ञानाचा अंगिकार हे आपले केवळ नैतिक कर्तव्यच नव्हे तर सामाजिक दायित्वही आहे. हाच विचार जनकल्याण रक्तपेढीने केला आणि नॅटसारखं जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान रक्तपेढीमध्ये आणलं.


मानवी आयुष्यात तंत्रज्ञान कसं उपकारक ठरु शकतं, याचे ’नॅट’ हे साक्षात एक प्रमाणच आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. हे तंत्रज्ञान येण्यापूर्वी रक्त तपासलं जात नव्हतं असं नव्हे किंवा ज्या रक्तपेढ्यांमध्ये नॅट उपलब्ध नाही त्यांच्यात काही फ़ार मोठी उणीव आहे असेही नव्हे. कारण प्रगत देशांमध्ये स्थिर झालेलं किंवा रुजलेलं हे तंत्रज्ञान भारतात यायला जर अलीकडेच सुरुवात झाली असेल तर याला कोणाचा काय इलाज आहे ? त्यामुळे सर्वच रक्तपेढ्यांमधील रक्ततपासणी ही एलायजा (ELISA) या तंत्रानेच केली जाणे आणि सरकार दरबारीदेखील केवळ हीच चाचणी बंधनकारक असणे यात अस्वाभाविक असे काहीच नाही. एलायजा हे तंत्रदेखील रक्तातील एच. आय. व्ही., कावीळ वगैरे घातक संसर्गांचा शोध घेतेच, फ़क्त एक महत्वाचा फ़रक इतकाच आहे की या तंत्राव्दारे शोध घेतला जातो तो या विषाणूं विरुद्ध लढण्यास शरीराने तयार केलेल्या प्रतिकारकांचा, थेट विषाणूंचा नव्हे. पण नॅट मात्र थेट विषाणूंचाच शोध घेत असल्याने शरीरात प्रतिकारके तयार होईपर्यंतचा महत्वाचा वेळ वाचतो व विषाणूचे अस्तित्व लवकर लक्षात येते.


या पार्श्वभूमीवर अलिकडच्या काळात भारतातील काही निवडक रक्तपेढ्यांनी रक्तसुरक्षिततेसाठी नॅटसाठी पुढाकार घेणे, हे निश्चितच कालसुसंगत आहे आणि या निवडक रक्तपेढ्यांमध्ये ’जनकल्याण’चे नाव असणे हे आमच्याकरिता अभिमानास्पदही आहे. अर्थात असं असलं तरी २०१३ मध्ये रक्तपेढीत नॅट प्रयोगशाळा उभी राहिल्यानंतर यासंबंधी प्रबोधन करताना आमची अक्षरश: दमछाक झाली. कारण बऱ्याचशा डॉक्टर्सनादेखील यासंबंधी विशेष माहिती नाही असे लक्षात येत होते. शिवाय नॅटने तपासलेल्या रक्ताचे प्रक्रिया शुल्कसुद्धा वाढत होते, त्यामुळे स्वस्ताकडे सर्वांचा स्वाभाविक ओढा. अशा स्थितीत नॅट हे अंतिमत: रुग्णहिताचेच असल्याचे एखाद्यास पटवून देणे हे खरोखरीच जिकिरीचे काम होते. पण काही ठिकाणचे अनुभव मात्र खूप चांगले होते.


मला आठवते, पुण्यातील एका रुग्णालयाच्या मुख्य डॉक्टरांना आम्ही भेटायला गेलो होतो. ’नॅटची सुविधा रक्तपेढीत उपलब्ध असून तिचा लाभ आपल्या रुग्णालयांतील रुग्णांना व्हावा’ असाच प्रामुख्याने बोलण्याचा विषय असणार होता. या डॉक्टर मंडळींना भेटुन काही विषय सांगायचा असल्यास खूप कमी वेळात नेमकेपणाने बोलण्याचे कौशल्य अंगी असणे खूप महत्वाचे असते. नॅटच्या निमित्ताने हे कौशल्य खऱ्या अर्थाने पणाला लागत होते. तर, या डॉक्टरांची भेट ठरल्याप्रमाणे झाली. बोलायला सुरुवात करताच साधारण विषयाचा अंदाज घेऊन संवाद मध्येच तोडत हे डॉक्टर महोदय म्हणाले, ’अच्छा ! म्हणजे नॅटची सुविधा जनकल्याणमध्ये आलीय तर. ठीक आहे. मी काय करु तेवढे सांगा.’ नेहमीच्या अनुभवांपेक्षा हा अनुभव थोडा वेगळा होता. कारण नॅटचे महत्व लक्षात येऊनही या रक्ताचे शुल्क थोडे अधिक असण्यावरच बऱ्याच जणांची गाडी अडत होती. आम्ही या डॉक्टरांना म्हटलं, ’आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना नॅटने तपासलेले रक्त वापरण्यासाठी आपणच सांगितले तर त्यातील गांभीर्य त्यांच्या अधिक लक्षात येऊ शकेल, त्यामुळे यासाठी आपण पुढाकार घ्यावा इतकीच अपेक्षा आहे.’ यावर अत्यंत आग्रही स्वरात ते डॉक्टर म्हणाले, ’निश्चितच ! रुग्ण सुरक्षिततेसाठी ’आजपासून या रुग्णालयात नॅटने तपासलेले रक्तच वापरण्यात येईल’ असा धोरणात्मक निर्णयच आम्ही घेऊन टाकतो. मग तर झाले ?’ ही आमच्यासाठी फ़ारच सकारात्मक बाब होती. इतक्या चटकन असा निर्णय ते कसा काय घेऊ शकले अशी विचारणा करता त्यांनी फ़ार छान उत्तर दिलं. ते म्हणाले, ’माझा जनकल्याणवर पूर्ण भरवसा आहे. जर एखादी गोष्ट जनकल्याणने ठरवली असेल तर ती समाजहिताचीच असणार, अशी माझी खात्री आहे. शिवाय स्वत:चा काही आर्थिक लाभ होण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी असे पाऊल उचलेल, हीदेखील शक्यता शून्य आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. मग असा निर्णय घेण्यात चूक ती काय ? राहता राहिला प्रबोधनाचा विषय. हे प्रबोधन वेगवेगळ्या मार्गाने आपण दोघे मिळून करु या. काय ?’ आपण करत असलेल्या कामावरचा विश्वास अधिक दृढ करणारा हा अनुभव होता.


नॅटची खरी उपयुक्तता काय आहे, हे मला आणखी एका प्रसंगातून पुरेपूर समजले. औंधमधील एका प्रसिद्ध रुग्णालयामध्ये नॅटच्याच संदर्भात तेथे वैद्यकीय प्रशासक असणाऱ्या एका महिला डॉक्टरांशी भेट ठरली होती. फ़ोनवर आधी बोलणे झालेले असल्यामुळे माझे येण्याचे प्रयोजन त्यांना माहिती होतेच. तिथे गेल्या गेल्या, मी काही म्हणायच्या आत त्याच मला म्हणाल्या, ’सर, ही नॅटची सुविधा आणून तुम्ही खूप मोठे काम केले आहे.’ ’म्हणजे या बाईंना नॅटची माहिती आहे तर’ असा विचार करत मी म्हणालो, ’मला वाटते, तुमच्या बोलण्याला कुठला तरी संदर्भ आहे.’ यावर त्या उत्तरल्या, ’ हो. निश्चितच. आमच्याच रुग्णालयात घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगते.’ आणि एक दुर्दैवी घटना त्यांनी कथन केली. आमच्या या भेटीच्या सुमारे दोन/तीन वर्षे आधी, म्हणजे साधारण २०१० सालात या रुग्णालयामध्ये एक ८८ वर्षांच्या आजी रुग्ण म्हणून दाखल झाल्या. दाखल होताना रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे या आजींच्या काही आवश्यक तपासण्या करुन घेण्यात आल्या. आश्चर्य म्हणजे या तपासण्यांमध्ये ’ या आजी एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह आहेत’ असं लक्षात आलं. सर्वजण अक्षरश: चक्रावून गेले. शेवटी अधिक माहिती घेता असं लक्षात आलं की दोनच वर्षांपूर्वी या आजींना अन्य एका रुग्णालयात रक्त दिलं गेलेलं आहे आणि या रक्तावाटे एच.आय.व्ही.सारख्या घातक संसर्गाने आजींच्या शरीरात प्रवेश केला होता. दुर्दैवाने या संसर्गामुळे होऊ शकणाऱ्या सर्व त्रासाला या वयात त्यांना तोंड द्यावे लागणार होते. हा प्रसंग स्वत:च्या डोळ्यासमोर पाहिल्याने या डॉक्टरांना नॅटबद्दल इतकी आत्मीयता वाटावी, यात नवल काही नव्हते.


अर्थात असे असले तरी सामान्य रुग्णाला नॅट रक्तघटकांचे महत्व सांगताना आम्हाला ’रक्त’ आटविण्याखेरीज पर्याय नव्हता. किंबहुना प्रत्येक रुग्णाचे प्रबोधन करुन मगच त्याच्या इच्छेप्रमाणे नॅटने तपासलेले अथवा केवळ एलायजा तंत्राने तपासलेले रक्तघटक त्याला द्यायचे असे धोरण आम्हीच हेतुत: ठेवले होते. यावर ’why to offer Menu-card to the patients ? Just make NAT compulsory for their safety !’ असे आमचेच प्रबोधनही एका ज्येष्ठ डॉक्टरांनी केले होते. अर्थात, यामागे त्यांची सदिच्छाच होती, पण तरीदेखील प्रत्येक रुग्णाला – म्हणजेच त्यांच्या नातलगांना नॅट समजावून सांगणे आणि मग त्यांनाच याबाबतचा निर्णय घेऊ देणे हाच क्रम आम्ही चालु ठेवला. हे ’जनकल्याण’च्या संस्कृतीला साजेसेच होते, कारण रक्तसुरक्षिततेबरोबरच ’आमच्यावर हे काहीतरी थोपले जात आहे’ असाही रुग्णांचा ग्रह होऊन चालणार नव्हते. प्रबोधनाच्या या पद्धतीचा मात्र खूपच उपयोग झाला, कारण अल्पावधीतच रुग्णांचे नातलग आपण होऊन नॅटने तपासलेल्या रक्तघटकांची मागणी करु लागले. ’जनकल्याणवरील विश्वास’ हा यातला एक महत्वाचा भाग असला तरी आपल्या रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी ’जे उत्तम गुणवत्तेचे असेल तेच वापरले पाहिजे’ ही शुद्ध प्रेमाची भावनादेखील मोठेच काम करुन गेली. अर्थात दुसऱ्या बाजुला नॅट-रक्तघटक असले तरी रुग्णांना ते अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाले पाहिजेत आणि गरजूंना त्यावर सवलतीही मिळाल्या पाहिजेत याची काळजीही पहिल्यापासून रक्तपेढीने घेतलीच.


नॅट तंत्रज्ञानाच्या उभारणीतून आर्थिक लाभ अथवा व्यवसायवृद्धी असा व्यावसायिक विचार आम्ही अजिबात केलेला नसला तरी या नवीन तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेची समिक्षा झालीच नाही असेही नाही. कारण साधारण दीड ते दोन हजार रक्तनमुने तपासल्यानंतर एक किंवा दोन रक्तनमुने संसर्गित असल्याचे सांख्यिकी सांगत होती. त्यामुळे ’पहाड खोदके चूहा निकालनेवाली बात’ अशी हेटाळणीही काही विद्वानांकडून झालीच. पण हजारामागे एक जरी संसर्गित रक्तनमुना सापडला तरी तीन कुटुंबांचे या संसर्गापासून रक्षण होणार आहे, ही बाब मात्र दुर्दैवाने हे विद्वज्जन लक्षात घेऊ इच्छित नव्हते. शेवटी किनाऱ्यावर तडफ़डणाऱ्या हजारो स्टारफ़िशपैकी एक/दोनच पुन्हा समुद्रात जाऊ शकणार असले तरी त्यांना मात्र शंभर टक्के जीवदान मिळणार आहे, ही छोटी बाब मोठ्या-मोठ्यांच्या लक्षात येत नव्हती. अर्थात इतकी छोटी बाब लक्षात यायला काळीज हवे ते मात्र लहान मुलाचेच. प्रत्येक ठिकाणी केवळ विद्वत्ता काम करु शकतेच असे नाही, तर सोबत मनात शुद्ध भावही असण्याची नितांत गरज असते. एका छोट्याशा स्टारफ़िशचेही दु:ख कळु शकते ते या भावनेमुळे, विद्वत्तेमुळे नव्हे. त्यामुळे नॅट तपासणीने एक जरी संसर्ग आपल्याला रोखता आला तर ते एक मोठे यश आहे, हीच आमची भावना आहे. किंबहुना याचसाठी हा अट्टाहास केला आहे.

 

- महेंद्र वाघ