त्याने ओळखले ‘त्या’ धोक्याचे संकेत
 महा एमटीबी  03-Nov-2017

 
 
 
ताब्येतीने अगदी धडधाकट असलेल्या, आरोग्याच्यासंदर्भात कोणतीही तक्रार उद्भवली नसताना अचानकपणे आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ’त्याचा’ मृत्यू झाला. अशा घटना, बातम्या वरचेवर कानावर पडतात आणि एकाएकी आपल्या पायाखालची जमीन सरकते. अचानकपणे ’ती’ व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर ‘असं कसं झालं’ हा विचार मनाला अस्वस्थ करुन जातो. आपल्या कुटुंबातील, मित्र-परिवारापैकी कोणाच्याही बाबतीत अशी घटना घडली की, आपल्या जवळच्या व्यक्तींचे चेहरे नकळतपणे डोळ्यांसमोर येतात. हृदयविकाराचा झटका अचानक येत असला तरी त्याची काही लक्षणे असतात. पण बरेचदा होतं असं की, आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नसते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन तामिळनाडूमध्ये राहणार्‍या १५ वर्षीय आकाश मनोज या विद्यार्थ्याने एक उपाय शोधून काढला. त्यातून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा किती धोका असू शकतो, याचा अंदाज घेता येऊ शकतो. आकाशला तशी लहानपणापासूनच वैद्यकीय साहित्यामध्ये रूची...

आकाशने आठवीत असताना बंगळुरू इथल्या ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ला भेट दिली. आकाशच्या कुटुंबीयांनी त्याची आवड जपण्यासाठी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्याने शाळेच्या ग्रंथालयाला भेट देत या संदर्भातील अनेक पुस्तके पालथी घातली आणि आपला ज्ञानसंचय वाढविला. सगळं काही एकदमसुरळीत सुरू असताना एक अनपेक्षित घटना घडली. आकाशच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या आजोबांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. अचानकपणे झालेल्या आजोबांच्या मृत्यूने आकाशच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला होता. या दुर्देवी घटनेनंतर या सौम्य हृदयविकाराचे संकेत ओळखण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असा निश्चय आकाशने केला. त्वचेला कोणतेही नुकसान न पोहोचवता आकाशने निर्माण केलेले उपकरण मनगटावर किंवा कानामागे लावण्याची व्यवस्था असून या उपकरणामुळे हृदयविकाराचे झटके येणार असल्यास त्याचे सौम्य संकेत मिळतात. आकाशने बनविलेले हे उपकरण हजारो भारतीयांसाठी एक वरदान ठरु शकते. आहे. आकाशला तसा लहानपणापासूनच वैद्यकीय विषयांमध्ये रस होता. सध्या आकाशचे दहावीचे वर्ष असल्यामुळे त्याचे कुटुंब त्याला आता अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देत असले तरी आकाशने शैक्षणिक अभ्यास आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास याचे एक वेळापत्रक तयार केले आहे.

आकाश म्हणतो की, ’’गेल्या काही वर्षांपासून सौम्य हृदयविकारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अचानकपणे आलेल्या या सौम्य हृदयविकारामुळे घाबरायला होतं. नेमके काय करावे, हे सुचत नाही. अशा वेळेस योग्य उपचार मिळाले नाही, तर त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.’’ तसेच सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्र्वास घ्यायला त्रास होतो आणि हृदयावर प्रचंड प्रमाणात दाब आल्यासारखे वाटत असल्यामुळे अस्वस्थ होते. इतक्या कमी वयामध्ये केलेल्या आकाशच्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून त्याला ’इनोवेशन स्कॉलर्स इन रेसिडन्स प्रोग्राम’साठी आमंत्रित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आकाशचे स्वतचे व्हिजिटिंग कार्डही आहे बरं का... तो त्याच्या या यंत्राविषयी आणि अशाच इतर अनेक वैद्यकीस संशोधनांविषयी अगदी तासन्‌तास भाषण देऊ शकतो, हे विशेष. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ‘कार्डिओलॉजी’ विषयाचा अभ्यास करण्याची आकाशची इच्छा आहे. तेव्हा, आकाशचे स्वप्नांना शुभेच्छा आणि आकाशने बनवलेल्या या यंत्रामुळे हृदयविकाराचा धोका निश्चितच टळू शकेल आणि लाखोंचे प्राण वाचतील, अशी आशा करायला हरकत नाही. 

-सोनाली रासकर