भाईयुग संपले, भैयायुग सुरू!
 महा एमटीबी  29-Nov-2017


 

भाई आणि भैया हे तसे समानार्थी शब्द असले, तरी काँग्रेस पक्षात या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. ३३ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सुरू असलेले ‘भाईयुग‘ समाप्त होत आहे, तर ‘भैयायुग’ सुरू होत आहे. गुजरात निवडणुकांचा पक्षासाठी हा पहिला संकेत आहे.


१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी तीन संसदीय सचिव नेमले होते. हे सरकारी पद होते व प्रथमच एखाद्या पंतप्रधानाने अशी नियुक्ती केली होती. अहमद पटेल, अरुण सिंह आणि ऑस्कर फर्नांडिस यांना पक्षात विनोदाने अमर, अकबर, अँथोनी म्हटले जात होते. यातील अरुण सिंह राजीव गांधींशी झालेल्या मतभेदानंतर राजकीय वनवासात गेले. ऑस्कर फर्नंडिसांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले. मात्र, राज्य केले ते अहमद पटेल यांनी. मनमोहन सिंग सरकार चालवितात, सोनिया गांधी संघटना चालवितात, तर अहमदभाई देश चालवितात, असे काँग्रेसमध्ये म्हटले जात होते.

प्रभाव वाढला

१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर अहमदभाईचे प्रस्थ अधिक वाढले. त्यांनी सोनिया गांधींचा विश्वास संपादन केला आणि सरकार असो की संघटना, अहमदभाईशिवाय कोणताही निर्णय पक्षात व सरकारात होत नव्हता. मनमोहन सिंग १० वर्षे पंतप्रधान होते. मात्र, राजकीय शक्ती अहमदभाईच्या हाती एकवटलेली होती. राहुल गांधी सक्रिय झाल्यापासून त्यांनी अधूनमधून अहमद पटेल यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. पण, ते सारे धक्के पचवून अहमद पटेल यांची सत्ता शाबूत होती.


एक संयोग म्हणजे अहमद पटेल यांच्या गृहराज्यात- गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना, त्यांच्या युगाचा अस्त झाल्याचे दिसत आहे. राहुलभैयांनी त्यांना पूर्णपणे बाजूला केले आहे. अहमदभाई आमच्या मार्गदर्शक मंडळात गेले आहेत, असे काँग्रेस पक्षात गमतीने म्हटले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांनी बाजी मारल्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मानले जात होते. तसे काहीच झाले नाही. त्यांना फक्त शोभेसाठी अधूनमधून व्यासपीठावर जागा दिली जात आहे.


मोठा बदल

काँग्रेसमध्ये भाईयुगाची समाप्ती व भैयायुगाचा प्रारंभ, हा पक्षासाठी एक मोठा बदल असल्याचे म्हटले जाते. काँग्रेसच्या आजच्या दुरवस्थेला अहमद पटेल यांची धोरणे कारणीभूत असल्याचे अनेकांना वाटते. इंदिरा गांधी हयात असेपर्यंत काँग्रेस पक्षाचे धोरण हिंदुविरोधी कधीच नव्हते. उलट, इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या विरोधात युद्धाचा निर्णय घेतला. याने त्यांची एक प्रतिमा तयार झाली. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर अहमद पटेल हे त्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम करू लागले व काँग्रेसचा र्‍हास सुरू झाला. काँग्रेसची धोरणे मुस्लिम समाजाला खूष करण्यासाठी आहेत, असे चित्र तयार होऊ लागले. यात शहाबानो प्रकरण महत्त्वाचे ठरले. अयोध्या प्रकरणातही राजीव गांधींनी धरसोडीची भूमिका घेतली. त्याचा फटका पक्षाला बसला आणि नंतर तर काँग्रेसने हिंदुविरोधी भूमिका घेणे सुरू केले.


हिंदू दहशतवाद

सार्‍या जगात इस्लामिक दहशतवाद हैदोस घालत असताना, भारतात हिंदू दहशतवादाचे जन्मदाते दोन- अहमद पटेल आणि शरद पवार ! याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचीही घसरण झाली. ही सारी अहमदभाईंच्या धोरणाची किमया आहे, असे पक्षात म्हटले जात होते.

 

एण्टोनी समिती

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी, केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. एण्टोनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला. त्यात अन्य काही कारणांसोबतच पक्षाची हिंदुविरोधी प्रतिमा, पक्षाच्या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण सांगण्यात आले होते. या अहवालावर कारवाई होईल, अशी आशा पक्षनेत्यांना वाटत नव्हती.

 

नवे धोरण

काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती फार ठीक नसल्याने राहुल गांधी यांनी लवकरात लवकर पक्षाची सूत्रे आपल्या हाती घ्यावी असे त्यांना वाटत होते, तर अहमद पटेल याला खोडा घालत होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना डावलून चालणार नाही, असा युक्तिवाद करीत अहमदभाईंनी राहुलचा राज्यभिषेक रोखून धरला होता. काँग्रेसचे धोरण मुस्लिमधार्जिणे असल्याने, हिंदू समाज काँग्रेसपासून दुरावला, असे राहुल गाधींना सांगितले जात होते, असे समजते. एण्टोनी समितीचा अहवाल व काही समजदार नेत्यांचा सल्ला, याचा परिणाम म्हणून राहुल गांधींनी काँग्रेसला पुन्हा पूर्वपदावर नेण्याचे ठरविले असल्याचे समजते.


गुजरातची प्रयोगशाळा

राहुल गांधींनी आपल्या या प्रयोगासाठी गुजरातची निवड केली आहे. गुजरातमध्ये त्यांनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. पण, याचा प्रारंभ झाला तो त्यांच्या केदारनाथ भेटीनंतर. वर्षभरापूर्वी राहुल गांधींनी केदारनाथ मंदिराला भेट दिली होती. तेव्हापासून काँग्रेस हिंदुत्वाकडे वळत असल्याचे म्हटले जात होते. आता गुजरातमध्ये तर त्यांनी पूर्णपणे ‘हिंदू लाईन’ घेतली आहे. याचा फायदा-तोटा काय असेल हे तर निकालानंतर दिसणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या मते, आमचे जे काही नुकसान व्हायचे होते ते होऊन गेले आहे. ‘हिंदू लाईन’ सोडल्याने आमचे नुकसान झाले. मुस्लिम लीगच्या सोबतीला आमची गणती होऊ लागली होती. ती आता होणार नाही. गुजरातची प्रचारमोहीम द्वारकाधीश मंदिरापासून सुरू करण्याचा निर्णय पूर्ण विचारान्ती घेण्यात आला होता. तीच भूमिका आम्ही या निवडणुकीत कायम ठेवणार आहोत.


गुजरातमध्ये आम्हाला किती यश मिळेल याचा अंदाज आम्हाला आलेला नाही, असे सांगताना पक्षाचे एक नेते म्हणाले, आमची हिंदुविरोधी प्रतिमा हे आमच्यासाठी एक फार मोठे ओझे ठरत होते. या प्रतिमेतून आम्ही बाहेर येऊ की नाही, याचीही आम्हाला खात्री नव्हती. मात्र, राहुल गांधींमुळे ते शक्य होत आहे. त्यांनी हे धाडस दाखविले आहे. प्रारंभी आमची खिल्ली उडविली जाईल, याची आम्हाला कल्पना होती. मात्र, येणार्‍या काळात आमची हिंदुविरोधी प्रतिमा दूर करण्यात आम्हाला यश येईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.


अध्यक्षपद लांबणीवर

गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष केले जाईल, असे म्हटले जात होते. ती शक्यता आता मावळली आहे. राहुल गांधींना औपचारिकपणे अध्यक्ष करण्यात आले नसले, तरी आता पक्षाचे सारे निर्णय, सर्व नियुक्त्या त्यांच्या सुचनेनुसार केल्या जात आहेत. काँग्रेसचा एक नेता म्हणाला, काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर भूमिकेला मोडीत काढून, राहुल गांधींनी ‘हिंदू लाईन’ घेतली आहे. यापेक्षा अधिक मोठा बदल कोणता असू शकतो? अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वीच राहुल गांधींनी तो बदल केला आहे. या धोरणात्मक बदलानंतर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारणे वगैरे बाबी फार नाममात्र ठरणार आहेत. पक्षात आता भाईयुगाचा अस्त झाला आहे, तर भैयायुगाचा उदय होत आहे.

- रवींद्र दाणी