कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीच
 महा एमटीबी  29-Nov-2017

 

( कोपर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपी : जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे )

 

अहमदनगर : कोपर्डी प्रकरणातील तिन्हीही दोषी आरोपींना अखेरकार अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिन्हीही आरोपींनी अत्यंत घृणास्पद कृत्य केले असून त्यांना माफी दिली जाऊ शकत नाही, असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले असून यासर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


आज सकाळी साडे अकरा वाजता कडक सुरक्षा बंदोबस्तामध्ये सर्व आरोपींना न्यायालयांमध्ये उपस्थित करण्यात आले होते. यावेळी न्यायालय परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तिन्हीही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर थोड्याच वेळात न्यायालयाने आपले निकाल देत, तिन्ही दोषी आरोपींना मृत्यूदंड देण्याचे आदेश दिले.

गेल्या १८ तारखेला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना दोषी ठरवत शिक्षेस पात्र घोषित केले होते. यानंतर २२ तारखेच्या सुनावणीमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या तिन्ही आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यासाठी निकम त्यांनी अनेक युक्तिवाद करत या प्रकरणाची तुलना इंदिरा गांधी यांच्या हत्येशी केली होती. तसेच समाजाचा कल पाहता, या आरोपींना फाशीच दिली जावी, असे म्हटले होते.


निकम यांच्या या युक्तिवादावर विरोधी पक्षातील वकिलांनी देखील आपल्या अशीलाची बाजू मांडत 'कायद्यानुसार सर्वाना माफीचा आणि स्वरक्षणाच्या अधिकार असल्याचे म्हटले होते. तसेच न्यायालयाने आपल्या निर्णयावर कसल्याही प्रकारचे सामाजिक दडपण येता कामा नये, असे म्हटले. व या तिन्ही आरोपींना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु निकम यांनी विरोधी पक्षाचा हा युक्तिवाद देखील खोडून काढत गुन्हेगारांना फाशीच द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने याचा अंतिम निकाल २९ नोव्हेंबरला देण्याचे जाहीर केले होते.