काळा पैसाविरोधी दिवस विरुद्ध काळा दिवस!
 महा एमटीबी  29-Nov-2017

 

काय गंमत आहे बघा. भारतात लोकशाही आहे याचा अर्थ कुणी कसेही वागावे असा होत नाही. लोकशाही मार्गाने देश चालविण्यासाठी संविधान तयार करून ते लागू करण्यात आले आणि ते आजतागायत लागू आहे. कुणी किती पैसा कमवावा याला काहीही मर्यादा नसली, तरी तो कोणत्या मार्गाने कमवावा आणि कमावलेल्या उत्पन्नावर कर किती भरावा, याचे काही नियम तयार करण्यात आले आहेत. वैध मार्गाने तुम्ही कितीही पैसा कमावू शकता आणि त्यावर कर भरून उरलेला पैसा पांढरा म्हणून बाळगू शकता. त्याला संविधानाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण, तुम्ही ज्ञात स्रोतापेक्षा अधिकचा पैसा गोळा केला आहे, याचा अर्थ तो बेहिशेबी आहे आणि बेहिशेबी आहे याचाच अर्थ तो काळा आहे, हे स्पष्ट आहे. असा काळा पैसा सरकारी तिजोरीत आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे.

 

दिवाळी नुकतीच आटोपली होती. मोठ्या प्रमाणात फुटलेल्या फटाक्यांनी ध्वनी आणि वायू प्रदूषण केले होते. सुतळी बॉम्बच्या कानठळ्या बसविणार्‍या आवाजांनी कान बधिर झाले होते. आता कुठे आकाशातला धूर संपत आला होता आणि ध्वनिप्रदूषण पूर्ण थांबले होते. सगळ्यांची दिवाळी आनंदात साजरी झाली होती. फराळाचे आणि गोडाधोडाचे खाऊन झाले होते. अनेक जण सुट्या असल्याने फिरायला गेले होते. आपले गृहराज्य सोडून अनेक लोक परराज्यांत आणि परदेशातही पर्यटनासाठी गेले होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच दिवाळीत फोडायचे राहिलेले सगळे फटाके एकदम फुटावेत आणि प्रचंड आवाज व्हावा तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द कानी पडले. आज मध्यरात्री नंतर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत आहेत, या सगळ्या नोटा नागरिकांनी बँकांमध्ये जमा कराव्यात आणि त्याबदल्यात नव्या नोटा घेऊन जाव्यात, त्यासाठी 50 दिवसांची मुदत दिली जात आहे, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. दिवाळीतल्या फटाक्यांपेक्षाही मोठा धमाका या घोषणेने केला होता. अर्थात, ज्यांच्याकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांची असं‘य बेहिशेबी बंडलं होती, त्यांच्यासाठीच हा धमाका होता. या देशातल्या सर्वसामान्य जनतेला या घोषणेचा त्रास जरूर झाला, पण त्यांच्यासाठी हा निर्णय आनंददायीच होता.

 

पंतप्रधानांनी घोषणा करताच देशभर ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. अनेकांचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आपण ऐकतो आहोत ते खरे आहे काय, हे जाणून घेण्यासाठी आप्तांना आणि मित्रांना फोन लावले जात होते. बाहेर असलेल्यांनी घराकडे धाव घेत टीव्ही ऑन केला आणि स्वत:च्या डोळ्यांनी टीव्हीवरील बातमी पाहिली आणि ऐकलीही. पंतप्रधान नेमके काय म्हणाले, हेही सगळ्यांनी टीव्हीवर ऐकले अन् मग सगळ्यांची खात्री झाली. ज्यांच्याकडे काळा म्हणजेच बेहिशेबी पैसा होता आणि तो या मोठ्या नोटांच्या स्वरूपात होता, त्यांची तर झोपच उडाली. या लोकांनी रात्र कशीबशी काढली आणि दुसर्‍या दिवशी सकाळपासूनच हे लोक काळा पैसा पांढरा कसा करता येईल, नोटा कशा बदलवून घेता येतील, या कामी लागले. चार्टर्ड अकाऊंटंट्सची कार्यालये गर्दीने फुलून गेलीत. 50 दिवसांची मुदत असल्याने तशी भीती नव्हती, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील पैसा पांढरा कसा करायचा, याची चिंता होतीच.

 

नोटबंदीबाबतची माहिती सोशल मीडियावर आली, त्या वेळी आधी असे वाटले की, ही गंमत असेल. अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याकडे एक विनोद म्हणून पाहिले. पण, नंतर जेव्हा सगळ्यांची खात्री झाली, तेव्हा डोळे खाडकन उघडले अन् आता पुढे काय करायचे, याचा विचार करू लागले. आठवा ती आठ नोव्हेंबरची रात्र अन् रात्री आठ वाजताची वेळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक टीव्हीच्या पडद्यावर आले आणि राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण सुरू केले. भ‘ष्टाचार, दहशतवाद आणि काळा पैसा यांचा परस्परसंबंध जोडत त्यांनी या तीनही बाबींवर जोरदार प्रहार केले आणि आज मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या जात आहेत, असे स्पष्ट केले. आज मध्यरात्रीनंतर या नोटा म्हणजे कागदाचे केवळ रद्दी तुकडे असतील, असे घोषित केले. ही घोषणा तुम्ही ऐकली त्या वेळी तुम्ही काय करत होतात? जरा डोळे बंद करा आणि आठवा. शांतपणे आठवा की तुमची पहिली प्रतिकि‘या काय होती? मोदींनी मोठ्या नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकने काळा पैसावाले हादरले होते. ज्यांना काळ्या पैशांवर निवडणुका जिंकण्याची सवय झाली होती, त्या राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. अशा लोकांनी मग सामान्य लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवत सरकारवर टीका सुरू केली अन् सरकारचा निर्णय कसा चुकलेला आहे, सामान्य माणूस कसा भरडला जाणार आहे, देशाची अर्थव्यवस्था कशी कोलमडणार आहे, हे सांगत सरकारवर प्रहार सुरू केले. सरकारविरुद्ध जनआक‘ोश वाढविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण, आज वर्षभरानंतर आपण जे चित्र पाहतो आहोत, ते समाधानकारक आहे, हे निश्चित. नोटाबंदीने सामान्य माणसाला त्रास झाला असला तरी त्याच्या अर्थकारणावर फार विपरीत परिणाम झालेला नाही, ही आनंदाची बाब म्हटली पाहिजे.

 

उद्या आठ नोव्हेंबर रोजी नोटबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून सरकारने हा दिवस काळा पैसाविरोधी दिवस म्हणून साजरा करायचे ठरविले आहे, तर काँग‘ेस काळा दिवस पाळणार आहे. सरकारची भूमिका आपण समजू शकतो. सरकारला सगळा बेहिशेबी पैसा तिजोरीत आणून तो सामान्य जनतेच्या हितासाठी वापरायचा आहे, देशाच्या विकासकामांवर खर्च करायचा आहे. प्रत्येकाने जो पैसा कमावला आहे, तो वैध मार्गानेच कमावला आहे, याची खात्री करायची आहे. त्यामुळेच सरकार उद्या काळा पैसाविरोधी दिवस साजरा करणार आहे. याउलट काँग‘ेस आणि अन्य विरोधी पक्षांची भूमिका आहे. मोठ्या नोटा चलनातून बाद करून मोदी सरकारने गेल्या वर्षी काळापैसाधारकांच्या मुळावरच घाव घातला होता. ज्यांना सगळे धंदे वाम मार्गानेच करायची सवय जडली होती, त्यांच्यासाठी नोटबंदी एक मोठा हादरा होता. अन्यथा, नोटबंदी केल्याने या मंडळीला काही फरकच पडायला नको होता.

नरेंद्र मोदींनी नोटबंदी करताना या लोकांच्या काही अडचणी लक्षात घ्यायला हव्या होत्या. या लोकांना विश्वासात घेऊन निर्णय करायला पाहिजे होता. पण, मोदींनी तसे काही केले नाही. एकट्यानेच निर्णय घेतला. अवैध कामे करवून घेण्यासाठी द्यायला पैसा नगदी लागतो, नंबर दोनची खरेदी करायला नगदी पैसा लागतो, करचुकवेगिरी करायला रोख पैसा लागतो, हवालासाठी रोकडच गरजेची असते, खंडणी मागणारे नगदीतच मागतात, अवैध सट्टेबाजीसाठीही नगदीचाच व्यवहार चालतो, बेहिशेबी खर्चासाठीही रोख रक्कम लागते, काळा पैसा हा रोख स्वरूपातच जमा करावा लागतो, बेनामी संपत्ती गोळा करण्यासाठीही रोख रकमेचीच गरज असते, भ‘ष्ट लोकांना प्रोत्साहन देणे नगदीमुळेच शक्य होते. गुन्हेगारी कृत्यात रोकडच वापरली जाते (सुपारी किलिंग), राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी रोकड भरूनच थैल्या द्याव्या लागतात, सोन्या-चांदीच्या व्यवहारातही रोकडीचीच गरज असते, रियल इस्टेटमध्येही नगदीचाच बोलबाला असतो, दहशतवाद रोख रकमेवरच फोफावतो, बनावट नोटा बदलवण्यासाठीही रोख रक्कमच लागते, राजकीय पक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही रोकडच उपयोगात आणली जाते, निवडणुका जिंकण्यासाठीही रोकडच लागते. या सगळ्या बाबींचा कसलाही विचार आमच्या पंतप्रधानांनी केला नाही अन् करून टाकली नोटबंदी! भ‘ष्ट लोकांचा आवाज बंद करून पंतप्रधानांनी त्यांच्यावर अन्याय करायला नको होता, एवढेच!

डॉ. वाय. मोहितकुमार राव

9545847799