'न्यूड'बाबतच्या निर्णयाचा निषेध न नोंदवल्याचे वृत्त धादांत खोटे  
 महा एमटीबी  29-Nov-2017


 
गेल्या आठ दिवसांपासून गोव्यात सुरु असणाऱ्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) काल सांगता झाली. 'इफ्फी' मध्ये निवड न झालेल्या 'न्यूड' या मराठी चित्रपटाच्या बाजूने आम्ही तेथे जाऊन उभं राहू, सरकारच्या निर्णयाचा निषेध करू किंवा किमान नाराजी तरी व्यक्त करू अशी चर्चा  'इफ्फी'त सहभागी झालेल्या नऊ मराठी चित्रपटांचे कलाकार गोव्यात जाण्यापूर्वी करत होते. अशा प्रकारचा कोणताही निषेध अथवा नाराजी कोणत्याच मराठी कलाकाराने व्यक्त केली नाही अशा आशयाची बातमी आज महाराष्ट्र टाईम्सने पहिल्या पानावर प्रसिद्ध केली आहे. या वृत्तावर खरमरीत टिका करत दिग्दर्शक योगेश सोमण याने सोशल मीडिया वरून पुरावे सादर केले आहेत. 

 
सोमण यांनी त्यांच्या फेसबुकच्या पोस्ट मध्ये म्हणलं आहे की, ''म टा म्हणतोय ' ना s दुर्गा, ना न्यूड ना निषेध ' धादांत खोटं, पुरावा सोबत दिलाय. मी iffi ला गेलो, तिथे बोललोही.'' या पोस्टच्या खाली त्यांनी एक व्हिडिओ जोडला आहे. 'इफ्फी'त  'न्यूड'ची निवड होऊ शकली नाही याची मला खंतच वाटते, अशा शब्दात सोमण यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत नाराजी व्यक्त केली असल्याचे या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. 
 
'माझं भिरभिर' या सोमण यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निवड ''इफ्फी'साठी झाली होती. रवी जाधव यांच्या 'न्यूड'ची निवड झाली असून हा चित्रपट ऐनवेळेस वगळण्यात आल्याने काही मराठी कलाकारांनी 'इफ्फी'ला न जाण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान योगेश सोमण यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट वरून देखील बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.