चित्रपटसृष्टीचा माहितीकोश
 महा एमटीबी  29-Nov-2017

 
 
 
भारतीय चित्रपटसृष्टी एक विलक्षण गोष्ट आहे. त्यातील कलाकार, निर्मिती, संगीत उद्योग आणि ‘ग्लॅमर’ या बाबी सतत चर्चेत असतात. तरुणांना त्याचे आकर्षण मोठेच असते. अशा या मायावी सृष्टीत संगीत क्षेत्रात नाशिकचे रवी बारटक्के यांनी अपार मेहनतीने मोठे यश मिळविले आणि अभिनेते, अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक यांचा सहवास त्यांना लाभला. त्यातून त्यांचा या क्षेत्राचा नकळत अभ्यास झाला आणि ‘चित्रपटसृष्टीचा माहितीकोश’ अशी त्यांची आगळी ओळख निर्माण झाली. लहानपणी खेळ आणि शिस्तीच्या आकर्षणामुळे ते रा. स्व. संघाच्या शाखेत जात. पुढे मात्र उद्योगधंद्यामुळे संघकार्य शक्य झाले नाही. मात्र, ‘‘संघाची भारतव्यापी नव्हे विश्वव्यापी संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्याग आणि समर्पित भावना यांचा आपण आदर करतो,’’ असे ते म्हणतात.
 
 
‘रवीशेठ’ या नावाने ओळखले जाणारे रवींद्र द्वारकानाथ बारटक्के यांच्या लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर मुंबईहून मामाकडे नाशिकला त्यांना यावे लागले. त्या काळात १९७८ मध्ये त्यांनी कॅसेट वितरण व्यवसाय सुरु केला. मुंबईहून २२८ कॅसेटची बॅग भरून आणायची आणि नाशिकमध्ये विविध दुकानातून वितरण करायचे असे व्यवसायाचे स्वरूप होते. या व्यवसायात प्रामुख्याने सिंधी व्यापारी होते. त्यांच्याशी स्पर्धा करीत रवीजींनी आपले वेगळेपण निर्माण केले. नाशिकच्या थिएटर मालकांशी चांगले संबंध असल्याने त्यांना चित्रपट सहज पाहायला मिळत. त्यातून त्यांची संगीतात रुची निर्माण झाली. त्यामुळे ते अत्यंत निवडक कॅसेट आणत. तसेच रोख व्यवहार यामुळे त्यांचा चांगला जमबसू लागला. अन्य व्यापारी देखील आपल्या कॅसेटची निवड करण्याची गळ त्यांना घालू लागले. एका कॅसेटला दहा पैसे असे त्याबद्दल ते रवीजींना देत. ५० रुपयापर्यंत जास्तीची कमाई त्यातून होत असे. पुढे त्यांचे चांगले नाव झाले. त्यातून रेकॉर्ड निर्मितीत भारतात क्रमांक १ ची असलेली एचएमव्ही कंपनी तंत्रज्ञानातील बदलामुळे कॅसेट निर्मितीकडे वळली, तेव्हा त्यांनी वितरणासाठी १९८५च्या सुमारास रवीजींशी संपर्क साधला. मग चित्रमंदिर थिएटर जवळील संगीतातील दर्दी अप्पा शेंडे यांची जागा घेऊन त्यांनी व्यवसायात खूप मोठी मजल मारली. ‘रामलखन’च्या कॅसेटमुळे तर जणू लॉटरीच लागली. या कामगिरीबद्दल कंपनीने त्यांना ‘गोल्ड डिस्क’ प्रदान केली असून अजूनही त्यांच्या संग्रही आहे. अन्य अनेक कंपन्यांनी देखील विविध प्रमाणपत्रे आणि मानचिन्हे दिलेली आहेत. मोठे यश मिळाल्यामुळे मुंबईतील चित्रपटांच्या प्रीमियरची बोलवणीही त्यांना येऊ लागली. यश चोप्रा, सुभाष घई, मनोजकुमार, अनिल कपूर, राजेश खन्ना, बी. आर. चोप्रा अशा अनेकांची जवळून ओळख झाली. बॉलीवूड जवळून पाहायला मिळाले. चित्रपट कलाकारांच्या आवडत्या, महागड्या ‘चायना गार्डन’सारख्या हॉटेलातून पार्ट्या होऊ लागल्या. मात्र, कॅसेटचे युग संपून सीडी बाजारात दाखल होऊ लागल्या. तंत्रज्ञानाने पुन्हा एकदा कूस बदलली. आणि ‘मोहब्बते’ चित्रपटापासून या व्यवसायाला उतरती कळा लागली. पायरसीचे संकट कॅसेटच्या जमान्यात होतेच. मात्र, अधिकृत कॅसेट रास्त दरात विक्री करून रवीजींनी नाव कमविले होते. एका कॅसेटवर एका बाजूस आठ आणि दोन्ही बाजूंना सोळा गाणी मावत. सीडीत ही संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे खडतर काळ आला. कॅसेट उद्योगात आरती डिस्ट्रीब्यूटरच्या माध्यमातून नाशिकचे नाव भारतीय पातळीवर नेवून ‘एच. एम. व्ही’ या ख्यातनामकंपनीचे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे केंद्र म्हणून त्यांनी आपला व्यवसाय नावारूपाला आणला. व्यवसायात चढ  उतार असतातच, असे सांगताना सध्या सीडीचे युग सुरु झाल्यावर संगीत क्षेत्राला उतरती कळा आल्याने त्यांनी संगीताच्या सीडीबरोबरच मोबाईल, कॉस्मेटीक आणि महिलांची वस्त्रप्रावरणे आणि पादत्राणे आदींचा व्यवसाय देखील सुरु केला आहे. उत्तमव्यवसायिक आपल्या व्यवसायात कालानुरूप कसा बदल करू शकतो, याचा हा वस्तुपाठच त्यांनी घालून दिल्याचे दिसून येते. ‘‘मराठी माणसाने नोकरी करू नये असे नाही, मात्र नोकरी साजेशी असावी, अन्यथा व्यवसाय करण्यास लाजू नये,’’ असे रवीजींचे मत अनुभवांती तयार झाले आहे. कॅसेट उद्योगात नाव कमविलेल्या रवीजींना आलेले चित्रपटक्षेत्राचे मनोरमअनुभव, मिळालेला मान्यवर नट मंडळींचा सहवास यामुळे ते नाशिकमधील या क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखले जात असून त्याचा लाभ संगीत, अभिनय क्षेत्रातील नव्या जुन्या कलाकारांना होत आहे. 
 
 
- पद्माकर देशपांडे