जाणून घ्या, 'केवायसी' बद्दल इत्थंभूत माहिती ...
 महा एमटीबी  28-Nov-2017

 

'मनी लॉंड्रींग' ही देशाच्या सुरक्षिततेच्या व आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीकोनातून जगभर एक गंभीर समस्या झालेली आहे. या वर उपाय म्हणून आता केवायसी (नो युवर कस्टमर) साठीची पूर्तता करणे हे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार प्रथमच करताना अपरिहार्य झाले आहे. याचा मूळ उद्देश असा की आपल्याकडे येणारा ग्राहक (कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी येणारा) खरा (जेन्युईन) आहे ना, याची खात्री करून घेणे होय. यादृष्टीने Prevention of Money Laundering Act 2002 (पीएमएलए) हा कायदा संसदेने पास करून 'केवायसी' पुर्तेतेस वैधानिक स्वरूप दिले आहे. हा कायदा अस्तित्वात नव्हता तेंव्हा अवैध मार्गाने आलेला / मिळविलेला पैसा, सोन्याचे, आधुनिक अस्त्रे (वेपन्स) (ऐके ४७ सारखी) यांचे स्मगलिंग (तस्करी) यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे.  परिणामी दहशतवादी हल्ले, सक्तीचे धर्मांतर यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेस धोका असलेल्या घटना वारंवार घडू लागल्या. याशिवाय काळा पैसा दडविण्यासाठी बेनामी खाती मोठ्याप्रमाणावर उघडली जात होती. हा काळा पैसा, सोने, जमीन व रोख स्वरुपात अनुत्पादित स्वरुपात रहात असे, याचा देशाच्या अर्थ व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत होता. शिवाय कर रूपाने मिळणारा पैसा सरकारला  मिळत नसे. आता केवायसी बाबतची पूर्तता करणे ही सबंधित वित्त संस्थेची जबाबदरी झालेली आहे. त्यादृष्टीने आता सर्व ठिकाणी खालील प्रमाणे ही पूर्तता करून घेतली जाते त्यशिवाय खाते कार्यान्वित (अॅक्टिव्ह) होत नाही. 

वैयक्तिक स्वरूपात व्यक्तिगत KYC ची पूर्तता करून देण्यासाठी लागणारी कागद पत्रे :

 • फोटो.
 • राहण्याच्या पत्त्याचा पुरावा 
  (आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी एकाची सत्य प्रत.)
 • पॅन कार्ड
 • ओळखीबाबत पुरावा 
  (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी एकाची सत्य प्रत.)
 • आजकाल केवळ पॅन कार्ड व आधार कार्डची सेल्फ अट्टेस्टेड सत्य प्रत (झेरॉक्स) ही दोनच डॉक्युमेंट्स यासाठी पुरेशी आहेत.

संस्थात्मक 'केवायसी'ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रे : 

 • पॅन कार्ड - सर्वांनाच आवश्यक
 • डिक्लरेशन डिड
 • बॅक खाते पुस्तक / उतारा नजिकचे कळतील
 • कंपनी / बॉडी कॉर्पोरेट
 • इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट
 • मेमोरेंडम व आर्टिकल ऑफ असोसिएशन
 • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या
 • ठराव


भागिदारी संस्था : 

 • पॅन कार्ड - सर्वांनाच आवश्यक
 • भागिदारी पत्र
 • भागिदारी पत्राचे नोंदणी दाखला
 • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
 • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

ट्रस्ट, फाउंडेशन, एनजीओ, चॅरिटेबल बॉडीज :

 • पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक
 • नोंदणी दाखला
 • ट्रस्ट डिड
 • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
 • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

आजकाल मोबाईल फोनचे नवीन सिमकार्ड घेताना 'केवायसी' पूर्तता करणे आवश्यक झाले आहे. अशी पूर्तता झाल्याशिवाय नवीन सीमकार्ड कार्यान्वित (अॅक्टिव्ह) होत नाही.

'केवायसी' पूर्तता करणाऱ्या ग्राहकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यामुळे त्याचेच आर्थिक तसेच अन्य व्यवहार सुरक्षित राहणार आहेत व आपल्या नावाचा कोणी गैर वापर करू शकणार नाही. तसेच केवायसी पुर्तेतेसाठी आपण जेंव्हा पॅन कार्ड, आधार कार्ड, तसेच अन्य आवश्यक कागदपत्र सबंधित वित्त संस्थेस किंवा मोबाईल सर्व्हिस प्रोव्ह्याडर द्याल, त्या प्रत्येक वेळी सबंधित सत्यप्रतीवरही सत्य प्रत कुठल्या प्रकारच्या केवायसी पूर्ततेसाठी देत आहात याचा स्पष्ट उल्लेख करावा. जेणेकरून ती सत्य प्रत आपल्या परस्पर अन्य कोठे वापरता येणार नाही. कालच असे वाचण्यात आले की, स्टेटबँकने पुढाकार घेतलेल्या  ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर स्टेट बँक व अन्य २७ बँका लवकरच केवायसी साठी करणार आहेत. विमुद्रीकरण, डिजिटल पेमेंट, जीएसटी व केवायसी यासारख्या उपाय योजनांमुळे अर्थव्यवस्थेला पारदर्शकता व बळकटी येईल असे नक्की म्हणावेसे वाटते.


याविषयात तज्ज्ञ सुधाकर कुलकर्णी यांनी नुकतीच 'केवायसी' बाबत जनता सहकारी बँकेच्या फेसबुक पेजवरून नेटिझन्सला माहिती दिली होती. या लेखाच्या माध्यमातून तो व्हिडिओ देखील आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत, जेणेकरून 'केवायसी' बाबतच्या तुमच्या सर्व शंका दूर होतील. अगदी सोप्या पद्धतीने 'केवायसी' समजून द्यायचं असेल तर हा व्हिडिओ अवश्य बघा!

 

- सुधाकर कुलकर्णी
सर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर, पुणे