हिम्मतवाला..
 महा एमटीबी  28-Nov-2017
 
 
 
दुर्दम्य आशावादाच्या बळावर स्वत:चे आयुष्य घडवत समाजाचे ऋण फेडणारे खूप कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे विष्णूपंत गोविंद कोरडे. जुन्नर तालुक्यातल्या विष्णूपंतांच्या घरचे वातावरण अत्यंत पारंपरिक अन् पापभिरू. त्यांचे वडील हरीभाऊ सेवाभावी वृत्तीचे होते. ते विहिरी खणण्याचे कंत्राट घ्यायचे. जशी वडिलांची पंचक्रोशीत ख्याती, तशीच एक हुशार विद्यार्थी म्हणून विष्णूही सुपरिचित. पण, घरची आर्थिक संपन्नता म्हणजे केवळ दोन वेळची भाकरी-भाजीची सोय. अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेणे म्हणजे जणू विष्णूपंतांसाठी दिवास्वप्नच! पण, विष्णूपंतांना आयुष्यात काही तरी करायचे होते. त्यामुळे मुंबईला जाऊन काम करून शिकायचे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले. पण, मुंबईतही त्यांना अशा नोकर्‍या मिळाल्या की त्यासोबत शिक्षण घेणे शक्यच नव्हते. शेवटी त्यांनी सिक्युरिटी गार्डची नोकरी केली. जिथे आश्रयाला होते, तिथे मग लहान घराचीही सोय झाली. रात्री झोपायलाही तिथे पुरेशी जागा नसायची. पण, तरीही विष्णूंनी वर्षानुवर्षे सिक्युरिटी गार्ड म्हणून रात्रपाळीत नोकरी केली. याविषयी विष्णूपंत सांगतात की, ’’त्यावेळी सगळीकडून नकारात्मक परिस्थिती होती. तरीही मी मनाला धीर द्यायचो की, असं काही तरी केलं पाहिजे की, एक चांगली प्रतिष्ठेची नोकरी आपोआप मिळेल.’’ इच्छा तिथे मार्ग. विष्णूपंतांना एमपीएससीच्या परीक्षांबाबत कळले. १९७८चे ते साल होते. रात्री सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी आणि दिवसा एमपीएससीचा अभ्यास हा त्यांचा दिनक्रम झाला. कुणीच मार्गदर्शक नसल्यामुळे एमपीएससीची तयारी कशी करावी, याचे ज्ञान नव्हतेच. फक्त मनात आग होती, या शहरात आपणही मानाने जगायला हवे. शून्यातून अस्तित्व निर्माण करायला हवे. याच जिद्दीमुळे विष्णूपंतांनी एमपीएससीची परीक्षा दिली. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. पण, ते हिंमत हारले नाहीत. सिक्युरिटीची नोकरी करता करता ते पुन्हा झटून एमपीएससीच्या अभ्यासाला लागले आणि परीक्षा उत्तीर्ण झाले. 
 
 
कोणतीही नोकरी मिळत नाही म्हणून सिक्युरिटी गार्डची नोकरी पत्करणारे विष्णूपंत राज्य सरकारच्या पर्यटन खात्यात ’ऐषोआराम कर निरीक्षक’ म्हणून नियुक्त झाले. पुढे प्रशासकीय सेवेत त्यांच्या कर्तृत्वाची कमान वाढतच गेली. विष्णूपंतांच्या आयुष्याला स्थैर्य लाभले, पण म्हणून ते गप्प बसले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी  समाजासाठी स्वत:ला झोकून दिले. निराधार, दुर्बल, अज्ञानी लोकांचे शोषण होऊ नये म्हणून त्यांनी  अनेक सेवाभावी संस्थांमध्ये स्वेच्छेने जबाबदारीपूर्ण काम करायला सुरूवात केली. त्याद्वारे त्यांनी अक्षरश: हजारो लोकांचे आयुष्य बदलून टाकले. ते स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार तर झालेच, पण अगणितांच्या जीवनाचे दीपस्तंभही झाले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यामधील गरीब शेतकर्‍यांना जोडधंदा मिळावा म्हणून २५ वर्षांपूर्वी ज्ञानेश्‍वर दुग्धव्यवसाय संस्था स्थापन केली. तसेच विघ्नहर सहकारी संस्था स्थापन केली. अशा अनेक संस्थांच्या निर्मिती माध्यमातून त्यांनी समाजबांधवांच्या विकासाचा संकल्प राबविला. ज्ञानेश्‍वर दुग्धव्यवसाय संस्था सुरु केल्यामुळे प्रस्थापित व्यावसायिकांची गोची झाली. कारण, विष्णूपंत या संस्थेद्वारे गरीब शेतकर्‍यांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर व्यवसाय करायचे. मग काय, प्रस्थापितांनी ज्ञानेश्‍वर दुग्धव्यवसाय संस्थेविरोधात न्यायालयात खटला दाखल केला की जेणेकरून संस्थेचे काम थांबेल. पण, सत्याचा विजय झाला. संस्थेने तो खटला जिंकला. आज तालुक्यातल्या गरीब शेतकर्‍यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. पुढे मुंबईमधल्या जुन्नर-आंबेगाववासीयांचे एकत्रीकरण करून त्यांच्यासाठी विष्णूपंत सहकार्‍यांच्या मदतीने जोमाने काम करत आहेत. विष्णूपंत म्हणतात, ‘‘मनामध्ये मोठी शक्ती आहे. लक्ष्य ठरवून त्या विचारांच्या दिशेने मनापासून काम केले की, सारी सृष्टी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागते. त्यामुळे हिंमत कधी हारू नये.’’
 
- योगिता साळवी