उत्तरकार्य 
 महा एमटीबी  27-Nov-2017

 
 
दुपारी ३ वाजता येणारी बस ४.३० वाजता धडगाव च्या बस स्टॅन्ड वर उगवली, तीच खच्चून भरलेली. मी आणि धनसिंग कसेबसे आत घुसलो. जमान्या ला जाणारी मुकाम्मी बस, जेमतेम कंडक्टरसीट जवळच्या दांड्याला धरून उभे राहिलो. शंभरएक जणांनी खच्चून भरलेली बस, त्यातच काही कोंबड्या, काही पोती, टोपल्या आणि आयुष्यात प्रथमच अनुभवाला येत असलेला विड्यांच्या धूरा आडून ताडी चा दरवळणारा तीव्र गंध. माझी अवस्था बघून धनसिंग ने डायलॉग टाकलाच, " अभिजीत, ये है असली इंडिया." म्हणालो हो बाबा खर आहे.
 
 
तेव्हा मी S. Y. Bsc ला शिकत होतो, विद्यार्थी परिषदेच्या कामात येऊन जेमतेम वर्ष झालं होत. साधारण १९९१-९२ चा काळ, त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अक्कलकुवा तालुक्यातल्या मोलगी मध्ये जिल्हयाच श्रमानुभव शिबीर आयोजित केल होत, पाच  दिवसाच. सम्पूर्ण  धुळे जिल्ह्यातून १००-१२५ कॉलेज ची मुल-मुली यात सहभागी होणार होते. त्या साठी ठिकाण ठरवणे, गावात श्रम कुठे आणि काय करायचे त्याचा शोध घेणे, गृह्संपर्क-सर्वेक्षणासाठी पाडे शोधणे, जमेल तेवढा धान्य संग्रह करणे आणि आसपास च्या पाड्यांमध्ये राहण्यार्या कॉलेज करणाऱ्या तरुणांनापण या शिबिरात जोडता आल तर ते हि करणे या कामगिरीवर अस्मादिकांची १५ दिवसांसाठी बिनपगारी फुल अधिकारी अशी नेमणूक झाली होती.
 
 
नेमणूक करतांना आमच्या जिल्हा संघटन मंत्री संजय कुलकर्णी ने दिलेले वट्ट दोनशे रुपये आणि संजयला कधीतरी ६ महिन्यापूर्वी अक्कलकुवा होस्टेल ला एकदाच भेटलेला, पण मोलगीमध्ये राहणारा हा धनसिंग खत्र्या वसावे आणि तिथल्या नटावद्कर आश्रमशाळेचे व्यवस्थापक सायसिंग भामट्या वळवी ही दोन नावं,  एवढी investment खिशात होती. सायसिंग सरांनी माझी आश्रमशाळेत त्यांच्या घरची एक खाट आणि गोधडी देऊन केलेली निवास व्यवस्था स्वीकारून धनसिंग च्या शोधात बाहेर पडलो होतो.
 
 
मला यांच्या सगळ्यांच्या नावाची सुद्धा खूपच गम्मत वाटत होती... खत्र्या, भामट्या, जिर्या, जुझाऱ्या... काय पण एकेक..गावाचं नाव पण काय तर जमाना, काठी... माझ्या गेल्या २२-२३ वर्ष्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच सातपुड्याच्या या चौथ्या पुडात म्हणजे रांगेत मी पोहचलो होतो.
 
 
धनसिंग भेटला आणि लवकरच आमची खूपच गाढ मैत्री झाली. काळाकभिन्न वर्णाचा, बरंचस अपर नाक, मजबूत शरीरयष्टी, काळेभोर स्वच्छ पाणीदार डोळे आणि टिपिकल भिलोरी टोन मध्ये शहरी मराठी बोलण्याचा प्रयत्न करणारा धनसिंग आणि एखाद्या एलिअन सारखा या सगळ्या चित्राशी कुठेही अजिबात मॅच न होणारा मोलगी च्या रस्त्यांवरून आणि पाड्यांवरून त्याच्या सोबत फिरणारा मी, अशी आमची जोडी लवकरच सगळ्यांच्या ओळखीची झाली होती. 
 
 
जमान्याला पोहचायला संध्याकाळ झाली. तिथे पंचायत समिती चे सदस्य दरबारसिंग दादांच्या घरी जायचं होत, शिबिराची माहिती सांगायला. पायवाटेवरून डोंगर चढतांना चित्रात बघितल्या सारख डोंगराच्या आड सूर्याच भलमोठं बिंब भराभरा खाली सरकत होत. दादांच्या घरी पोहचलो तर चांगलंच अंधारून आलेलं. नेमके दादा त्या दिवशी कुठेतरी बाहेरगावी गेलेले, घरातल्यांशी धनसिंगची चांगली ओळख असावी कारण त्याने लगेच आमच्या रात्रीच्या जेवणाची आणि मुक्कामाची पण व्यवस्था शिताफीने लाऊन घेतलेली दिसत होती. भल मोठ अस्सल सागवानी लाकडाच्या खांबांवर माडाच्या झावळ्या, तुराट्यांनी शाकारलेल घर, एका बाजूला कोपर्यात चूल मांडलेली, दुसऱ्या कोपर्यात देव्हाऱ्यासारख काहीतरी दिसत होत. अंगणात काही कोंबड्या बागडत होत्या. घरातच एका बाजूला खाट टाकली होती, तिच्यावरच बसलो. एकदम मानेला काहीतरी ओलसर स्पर्श झाला आणि दचकलोच, मागे बघितल तर दोन गाई घरातच बांधलेल्या, त्यापैकीच एकीने माझ्या शर्टला वैरण समजून अंदाज घेतला होता. 
धनसिंग म्हणाला, "अरे आम्ही आमची गाई गुर घरातच बांधतो आमच्या सोबत, ती आमच्या कुटुंबाचा एक भागच मानतो." घरातल्या मातेने आमच्या समोर चहाचा कप धरला, आश्चर्य म्हणजे घरातच गाई असून चहा मात्र बिनदुधाचा काळा होता, मी धनसिंग कडे बघितल तर तो म्हणाला, " गाईच दुध फक्त तिच्या वासरासाठी असत, आम्ही कधीच आमच्यासाठी त्याचं दुध तोडत नाही, त्यामुळे कोणी पाहुणा आला तर चहा पण बिनदुधाचाच प्यावा लागतो त्याला."
 
 
रात्रीच्या जेवणात भात, कसलीशी आमटी सोबत कच्या कैरीची तिखट घालून केलेली चटणी होती. चिमणीच्या अंधुक उजेडात हा-हु करत पोटात अन्नब्रम्ह पडून घेतल आणि बाहेर अंगणात चांदण्याखाली बाजेवर आडवा झालो.
 
धनसिंग घरातल्या लोकांशी गप्पा मारत बसला होता, मध्येच गुडगुडी आणली गेली, सगळे गुडगुडी पीत गप्पा मारू लागले, धनसिंग मिस्कील हसत म्हणाला, "काय बघायची का चव?" म्हणलं, "नको बाबा, तुमची गुडगुडी तुम्हालाच लखलाभ". 
 
दिवसभराच्या पायपिटीने आणि पोटात गेलेल्या आमटी भाताने केव्हा डोळा लागला कळलच नाही. सकाळी उठलो तो बरंचस उजाडलं होत, मोलगीला निघायचं होत पण आवरून होईपर्यंत बस निघून गेलेली होती.
 
धनसिंग म्हणाला, "चल, पायी पायीच निघू. मध्ये रस्त्यात एक दोन पाड्यात माझे मित्र राहतात त्यांची पण ओळख करून देतो." मी घाबरत विचारल, "अरे पण किती दूर आहे इथून मोलगी?"
 
 
"अरे इथेच, दोनेक तासात पोहोचू, हा समोर डोंगर दिसतोय न, तो उतरून खाली गेलं की मोलगी.... बास." 
 
धनसिंग मला हे, पुढच्या बिल्डींगच्या उजवीकडे टर्न घेऊन लगेच पुढेच.... च्या स्टाईलं ने सांगत होता. मी निमुटपणे मान हलवली. पायवाट धरून तो पुढे आणि मी मागे अशी आमची यात्रा सुरु झाली.
 
गप्पा मारत, हे झाड बघ, तो डोंगर बघ, अस करत चाललो होतो, तेवढ्यात एका छोट्या टेकडीवरच्या घराजवळ बरीचशी माणसं जमलेली दिसत होती, गोवऱ्या पेटवल्या होत्या, काहीतरी धार्मिक विधी चालले असल्याच दिसत होत. ते बघून एकदम धनसिंग जागेवरच थांबला आणि एकटक तिकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू यायला लागले होते, मला काही कळेचना, काय झालंय ते. त्याला घाबरत घाबरत विचारल, "काय रे काय झालं?, काय चाललयं ते, तू का रडतोयेस असा."
 
तो डोळे पुसत म्हणाला, "अभिजीत, तो कुणाच्या तरी उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरु आहे." मी म्हंटल, "मग? तू का रडतोयेस असा?"
तर तो म्हणाला, " अरे माझी आई काही दिवसांपूर्वीच वारली, तीचं पण उत्तरकार्य आज करायचं होत, पण तुझ्या सोबत यायचं ठरल होत, म्हणून आज नाही करता आलं."
 
मला अक्षरशः प्रचंड धक्का बसलेला, म्हटलं, "अरे वेडा आहेस का तू सांगायचस न आधी मला, नसतो आलो आपण आज."
तो म्हणाला, "नाही रे, तू इतक्या लांबून आमच्या गावाचं, समाजचं काहीतरी भलं करायला आलायेस, मग मी मागे राहून कसं चालेल, असही, आमच्या समाजात ते कार्य नंतर केल तरी चालतं. पण शिबीर आधी महत्वाचं. ते बघून आईची आठवण आली म्हणून रडू आलं, चल."
 
पुढे डोळे पुसत पुढे तो आणि त्याच्या मागे मनातले कढ आवरत मी डोंगर उतरू लागलो.
 
 
- अभिजीत खेडकर