राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यव्यापी 'हल्लाबोल आंदोलना'ला कराड येथून सुरुवात
 महा एमटीबी  25-Nov-2017कराड : केंद्र आणि राज्य सरकार विरोधातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'हल्लाबोल आंदोलना'ला आज कराड येथून सुरुवात करण्यात आली आहे. कराड येथील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे.


माजी मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळा वंदन करून पवार यांनी चव्हाण यांच्या कार्याचा गुणगौरव केला. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या समृद्धीसाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची राज्यात सुरुवात करुन दिली. यामध्ये खेडयातील सामन्य कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्या अथक प्रयत्नांतून राज्याच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे' असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

एकही आश्वासन सरकारला पूर्ण करता आले नाही 

सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण कसे करावे, हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले होते. परंतु सध्याचे सरकार या मार्गावरून पूर्णपणे भरकटले असून गेल्या तीन वर्षात सरकारला आपले एकही आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तारखेवर तारखा दिल्या जात आहेत, शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकला हमीभाव मिळत नाही, उलट यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यास त्यांच्यावर गोळीबार केला जातो आहे. या सरकारच्या कार्यकाळात राज्यातील शेतकरी, तरुण, एसटी कामगार, व्यापारी वर्ग, शिक्षक विद्यार्थी सर्वजण हवालदिल झाले आहेत, असे आरोप त्यांनी यावेळी केला.

मागासवर्गीय विद्यार्थांच्या शिष्यवृत्ती बंद

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थांना वेळचावेळी शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यांच्या विकासासाठी शिष्यवृत्तीसाठी देण्यात येणार्या निधीमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. परंतु सध्याच्या सरकारने ही शिष्यवृत्तीचा निधी बंद केला आहे. तसेच केंद्राकडून येणारा निधी देखील माघारी पाठवण्यास सुरुवात केला आहे. त्यामुळे राज्यात मागासवर्गीय विद्यार्थांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.