‘परमानंदा’चा निर्माता नव्या मोहिमेवर
 महा एमटीबी  25-Nov-2017


 

आयुष्यात सहज म्हणून केलेले काम कधी कधी त्या व्यक्तीला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवते. छायाचित्रकार चार्ल्स ओरेअर यांनी काढलेल्या छायाचित्राचीही अशीच काहीशी गोष्ट आहे. आता चार्ल्स ओरेअर म्हणजे कोण ? हे सहज लक्षात येणार नाही, पण संगणकाच्या युगात क्रांती करणारे ‘मायक्रोसॉफ्ट एक्सपी’ हे व्हर्जन आणि ते सुरू झाल्यावर डोळ्यांना परमानंद देणारे ते हिरवेगार डोंगर आणि निरभ्र आकाश हे दृश्य सर्वांनाच परिचयाचे. डोळ्यांना सुखावणारे हे छायाचित्र ज्यांनी टिपले तेच हे चार्ल्स ओरेअर. आज हे छायाचित्र टिपून २१ वर्षांचा काळ लोटला आणि स्वतः चार्ल्सही ७६ वर्षांचे आहेत. अर्थातच हा जगातला सगळ्यात फेमस वॉलपेपर आहे. ‘ब्लिस’ असे या वॉलपेपरचे नाव. ‘ब्लिस’ अर्थात ‘परमानंद’. जगाला परमानंद देणारे चार्ल्स पुन्हा एका नव्या मोहिमेवर जात आहेत. आता त्यांना मोबाईलसाठी काही अशीच परमानंद देणारी छायाचित्रे टिपण्याचे काम सोपविण्यात आले आहे. परमानंद देणाऱ्या या छायाचित्रामागची कहाणीदेखील रंजक आहे. चार्ल्स यांनी त्यांच्या अमेरिकेतल्या नॅपा व्हॅलीमधल्या प्रवासादरम्यान हा फोटो काढला होता. त्यावेळी ते त्यांच्या प्रेयसीची भेट घेण्यासाठी जात होते. उन्हात चमकणाऱ्या कुरणाचा असलेला हा फोटो एवढा प्रसिद्ध होईल, असे त्यांना साहजिकच वाटले नव्हते. ते त्यावेळी एका फोटो एजन्सीमध्ये काम करत होते. आपल्या प्रवासावरून परतल्यानंतर नेहमीसारखा त्यांनी तो फोटो ऑफिसमध्ये फाईल केला. ते त्या फोटोबद्दल नंतर विसरूनही गेले. काही दिवसांनी त्यांना एजन्सीतून फोन आला. ते त्यावेळी दुसऱ्या शहरात होते.

 

‘‘तुम्ही काढलेल्या त्या फोटोची मूळ प्रत तातडीने आम्हाला पाठवून द्या,’’ असं त्यांना त्यांच्या बॉसने सांगितलं. आपण आता बाहेर असून तो फोटो जर कुरिअरने पाठवला तर तो खराब होण्याची शक्यता असल्याचं ओरेअर यांनी सांगितलं. तेव्हा सेकंदाचाही विचार न करता त्यांच्या बॉसने त्यांना विमानाचं तिकीट पाठवत तातडीने यायला सांगितलं. ‘‘तो फोटो खूपच महत्त्वाचा आहे,’’ एवढंच तो म्हणाला. यावेळी हा फोटो ‘विंडोज एक्सपी’साठी डीफॉल्ट वॉलपेपर म्हणून वापरण्यावर बिल गेट्‌स यांनी शिक्कामोर्तब केले होते. पुढे जे झालं तो इतिहास आहे. गेल्या १३ वर्षांमध्ये जगभरातल्या १ अब्जांपेक्षा जास्त लोकांनी हा वॉलपेपर पाहिलाय. याबद्दल ओरेअर यांना मानधनही देण्यात आलं. पण त्यावेळी हा फोटो इतका प्रसिद्ध होईल याची कल्पना त्यांना नव्हती. आता ७६ वर्षांचे असणारे ओरेअर या सगळ्याचा फारसा विचार न करता फोटोग्राफीच्या आपल्या वेडात आजही रममाण आहेत. त्यांच्या फोटोनंतर मायक्रोसॉफ्टने अनेक फोटोंची निवड वॉलपेपरसाठी केली पण, चार्ल्स यांच्या फोटोची जागा कोणीही घेऊ शकले नाही. म्हणूनच वयाच्या ७६ व्या वर्षी या ज्येष्ठ फोटोग्राफरवर खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘ब्लिस’ नावाच्या या संगणक वॉलपेपरचं आता स्मार्टफोन व्हर्जनही येणार आहे. यासाठी फोटो टिपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपला कॅमेरा घेऊन ते नव्या कामगिरीसाठी निघाले आहेत. नव्या पिढीला आवडतील असे स्मार्टफोन वॉलपेपरसाठी फोटो टिपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्याने कं पनीला त्यांच्याकडून खूपच मोठ्या अपेक्षा आहेत.त्यामुळे आपल्या तरुण वयात त्यांनी ज्या प्रकारचा फोटो टिपला होता, तशीच कामगिरी ते आताही निश्चितच पार पाडतील यात शंका नाही.

 

- तन्मय टिल्लू