आता अनुभवायला मिळणार इटालियन देसी सफर
 महा एमटीबी  25-Nov-2017


 

एखादे इटालियन गाणे सुरू आहे आणि त्याच तालावर एखाद्या मराठी किंवा हिंदी गाण्याने ठेका धरला तर?अशाच कोस्टा निओ क्लासिका या इटालियन क्रुझमधून सफर करण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट घेऊन आले आहे. कोस्टा क्रुझ या युरोपमधील क्रुझिंग कंपनीची ही सप्त तारांकित क्रुझ महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. नुकतेच या क्रुझचे मुंबईत आगमन झाले आणि शुक्रवारी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या नव्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.


कोस्टा निओ क्लासिकाच्या महाराष्ट्रातील मुंबई ते मालदिव या पहिल्यावहिल्या जलप्रवासाची घोषणा करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटकांना क्रुझमधून अत्त्युच्च दर्जाचा जलप्रवास माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टने कोस्टा क्रुझबरोबर हातमिळवणी केली आहे. २४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेला हा प्रवास मार्च २१ पर्यंत सुरू राहणार आहे. या क्रुझची बांधणी उत्तम असून क्रुझच्या आतील भागांमध्ये विविध पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांसाठीही खेळण्याची जागा या ठिकाणी असून क्रुझवरील सर्वच कर्मचारीवर्गाला उत्तम प्रशिक्षण देण्यात आले आहे. पर्यटकांना हव्या असणार्‍या जिम, स्विमिंग पुल आणि स्पासारख्या गोष्टींनाही उत्तमरित्या सजविण्यात आले आहे.एखाद्याला या क्रुझमधून फिरण्याचा मोह आवरणार नाही, अशी उत्तम व्यवस्था या क्रुझमध्ये करण्यात आली आहे. या जहाजात ६५४ केबिन्स तयार करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पर्यटकांच्या पसंतीनुसार समुद्राची दृष्ये टिपणारी आणि बाल्कनी असलेली अशी निरनिराळी केबिन्स तयार करण्यात आली आहेत. तसेच यामध्ये कॅसिनो, चित्रपटगृह, नृत्याची जागा, बॉलरूम, ग्रँड बार अशा निरनिराळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. व्यायामाबाबत जागरूक लोकांसाठीही जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे.

 

छोट्यात छोट्या गोष्टीची खरेदी असो किंवा पुस्तकप्रेमी असो त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन या क्रुझवर पुस्तकांची मांडणीही करण्यात आली आहे. क्रुझच्या डेकवर सनबाथ किंवा पोहण्याचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येतो तर दुसरीकडे निरनिराळ्या देशांमधून येणार्‍या पर्यटकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांकडेही योग्यरितीने लक्ष देण्यात आले आहे. खास करून भारतीयांच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची पर्वणीच या ठिकाणी अनुभवता येते.या क्रुझवर असलेल्या निरनिराळ्या देशातील कर्मचार्‍यांमुळे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असलेल्या भारतीय कर्मचार्‍यांमुळे भाषेचा अडसरही दूर होतो. पुढील चार महिन्यांसाठी मुंबई हे या इटालियन क्रुझ लायनेरचे होमपोर्ट असणार आहे आणि ही प्रामुख्याने मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.अत्यंत माफक दरात म्हणजेच मुंबई ते कोची असा चार दिवसांचा जलप्रवास केवळ २९ हजार रुपये प्रति व्यक्ती तर मुंबई ते मालदिव असा सात दिवसांचा जलप्रवास अंदाजे ४५ हजार रुपये प्रति व्यक्ती करता येणार आहे. पर्यटन विभागाने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असून प्रत्येकाने एकदा तरी या क्रुझमधून राजेशाही थाटाचा अनुभव घ्यायला जायलाच हवे.

 

रोजगाराच्या संधी मिळणार

पर्यटन विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतलेल्या पुढाकारामुळे येत्या काळात राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच क्रुझ बंदर विकसित करण्यासाठी चालना मिळणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश असलेल्या क्रुझ पर्यटनालादेखील यामुळे चालना मिळणार आहे. २०१९ मध्ये महाकाय अशी जवळपास साडेसहा हजार पर्यटकांना जलसफर घडवेल, असे कोस्टाचे नवे जहाज भारताला भेट देण्याची शक्यता आहे.

 

- जयदीप दाभोळकर