सायबर गुन्ह्याचे आव्हान
 महा एमटीबी  24-Nov-2017


 

पूर्वी टी.व्ही हा चैनीचा घटक असल्याचा समज होता. एखाद्या घरात टी.व्ही. असणे हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई, पण वृत्तवाहिन्या वाढल्या आणि टी.व्ही. ही गरज बनली. कालांतराने हीच गोष्ट संगणक आणि मोबाईलच्या बाबतीत झाली. आज संगणक किंवा मोबाईल या गरजेच्याच नव्हे तर आयुष्याच्या अविभाज्य घटक झालेल्या आहेत, परंतु आपल्या हाती असलेला मोबाईल आपण वापरत असलेला संगणक हे सुरक्षित आहे, याची शाश्वती आपल्याला नाही. व्हायरस नावाचा दैत्य या यंत्रणांपुढे आ वासून पुढे असू शकतो. ऍन्टी व्हायरसमुळे याला रोखणे शक्य झालेही परंतु याला पूर्णपणे पायबंद घालण्यात यश आलेले नाही. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस या परिषदेत डिजिटल विश्व दहशतवादी व कट्टरतावाद्यांसाठी मोकळे मैदान ठरू नये, याची जबाबदारी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे,असे मत व्यक्त केले तर सायबर सुरक्षा हा आगामी काळातील सर्वात मोठा विषय असून सुरक्षा यंत्रणांनी माहितीची देवाण-घेवाण करण्याची आवश्यकता आहे, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. दहशतवादाचे आव्हान हे जगापुढे आहे. भारताने वेळोवेळी याला तोंड दिले आहे. यापुढे हे हल्ले सायबर असतील, असे मत तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. आपले दैनंदिन जीवन हे बऱ्यापैकी या डिजिटल विश्वावर अवलंबून आहे. यावर हल्ला केल्यास देशाला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. रॅन्समवेअर सारखा वायरस पसरल्याने काही देशांना फटकाही बसला. तो फटका भारतातील एटीएम्सना न बसण्याचे कारण आपल्या एटीएम्स यंत्रणेची प्रणाली ही कालबाह्य होती. हे कारण जरी आपल्या पथ्यावर पडले तरी दरवेळी असे होईलच याची शाश्वती नाही. व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात आहे. ही बाब जरी वाखाणण्याजोगी असली तरी थोडी चिंताजनक आहे. दहशतवादी संघटना याच माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांचे ब्रेनवॉश करून दहशतवादी संघटनेत सामील केले जाते. म्हणून यावरही थोडे नियंत्रण असणे गरजेचे आहे. आधारचे निर्माते नंदन निलकेणी यांनी जनधन, आधार आणि मोबाईल अशी JAM ही संकल्पना सांगितली, या संकल्पनेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. आपला देश ऑनलाईन व्यवहाराकडे यशस्वी घौडदौड करत आहे. अशा वेळेला अनेक लोकांचे ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. लोकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. यासाठी डिजिटल डिव्हाईड ही पूर्णपणे नष्ट होण्याची गरज आहे.

 

 

खऱ्या अर्थाने ’मददगार’

‘‘आपली सांस्कृतिक अस्मिता ही आत्मशोधातून आंतरिक समृद्धता आणण्यात असते. इतरांचे अस्तित्व नष्ट करण्याकरिता नाही, याचे भान सुटले की सांस्कृतिक अराजकता निर्माण होते व त्यातून सामाजिक व राजकीय अराजकतेचा जन्महोतो,’’ असे प्रतिपादन दिलीप करंबेळकर यांनी आपल्या जागतिकीकरण आणि स्थानिकीकरण या लेखात केले आहे. ही अराजकता दहशतवादाच्या मार्गानेही येत असते. नक्षलवाद हाही दुस-या प्रकाराचा दहशतवादच. काश्मीर हे शापित नंदनवनच. दहशतवाद नावाचा शाप हा पाचवीला पूजलेलाच जणू. स्वातंत्र्योत्तर काळात खो-यात क्वचितच शांतता नांदली असावी, पण आता या चित्रात थोडे सकारात्मक बदल दिसत आहेत. दोन तरुणांनी दहशतवादाचा चोखाळलेला मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणाचा निर्णय घेतला. एका तरुणाने दहशतवादाचा मार्ग सोडल्यानंतर जम्मू पोलीस आणि लष्कराने संयुक्त विद्यमाने ’मददगार’ ही हेल्पलाईन सुरू केली. एका फुटबॉलपटूने दहशतवादाचा मार्ग निवडला होता. तो परत आला आणि त्यानंतर ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनचा वापर फक्त दहशतवादाच्या मार्गावर परतू पाहणा-या तरुणांसाठी नसून दहशतवादाच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीच्या आप्तेष्ट, मित्र व हितचिंतकांसाठीही असेल. आप्तेष्टांसाठी ही हेल्पलाईनसुद्धा असल्याने याचा खूप मोठा फायदा होईल. एका दहशतवादी तरुणाला त्यांच्या घ रच्यांनी गळ घातल्याने तो परत आला. आता ही हेल्पलाईन देशभरात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नक्षलवादासारखी समस्यासुद्धा सुटायला मदत होईल. खरंतर यात दहशतवादाच्या मार्गातून सुखरूप परत आलेल्या तरुणांनाही सहभागी करता येईल. कारण जे तरुण या मार्गावर असतील परतलेले तरुण आपले अनुभव कथन करून त्यांना मागे आणण्यात नक्की यशस्वी ठरतील. संवादाने प्रश्न सुटत असतात. म्हणून संवाद महत्त्वाचा असतो. माणूस जेव्हा हतबल होतो तेव्हा तो सद्सद्कविवेकबुद्धी गहाण ठेवतो. अन्यायाविरोधी चिडून काही लोक शस्त्र हाती घेतात, पण यामुळे प्रस्थापितांपेक्षा सामान्यजणच चिरडले जातात हे शस्त्र हाती घेतलेल्या लोकांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान होते. धर्म नही सिखाता आपस में बैर रखना.असे म्हटले जाते. या हेल्पलाईनमुळे ही समस्या सुटण्यात थोडीशी का होईना मदत होईल. उद्या भारत दहशतवादमुक्त झाला तर या हेल्पलाईनचा सिंहाचा वाटा असेल यात वादच नाही. ही हेल्पलाईन ख-या अर्थाने मददगार होईल, हे नक्की.

 

- तुषार ओव्हाळ