शुभांगीची उत्तुंग आकाश भरारी
 महा एमटीबी  24-Nov-2017


 

यात काहीच दुमत नाही की, आजकालच्या महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे आहेत. अगदी घरापासून ते देश चालविण्यापर्यंत महिलांनी बाजी मारली आहे. त्यात आता लष्कर, पोलीस यातही महिला मागे राहिलेल्या नाहीत. त्यातीलच नौदलातही वैमानिक होण्याची जिद्द असलेली एक म्हणजे शुभांगी स्वरूप. जी भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक बनली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेलीतील शुभांगी लवकरच मेरिटाइम रेकॉग्झनिसन्स एअरक्राफ्ट हे विमान उडवणार आहे. बुधवारी शुभांगी स्वरूप इंडियन नेव्हल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे शुभांगीचे वडील ज्ञान स्वरूप स्वतः भारतीय नौदलात कमांडर आहेत तर तिची आई कल्पना स्वरूप या विशाखापट्टणम्‌मध्ये नौदलाच्या माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत. शुभांगीची वैमानिक म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे स्वप्न सत्यात उतरल्याची आनंददायी प्रतिक्रिया तिच्या बाबांनी व्यक्त केली. “या प्रसंगी हा क्षण कितीही आनंददायी, रोमांचकारक असला तरी मला माहिती आहे की, ही एक खूप मोठी जबाबदारी आहे.’’ अशा शब्दांत शुंभागीने तिचे मत व्यक्त केले. म्हणजे एकीकडे इतके मोठे यश मिळाले असूनही त्यामध्ये वाहवत न जाता शुभांगीची कर्तव्यनिष्ठा दिसून येत आहे. 

 

शुभांगीला पी - ८ आय विमान चालविण्याची संधी मिळू शकते. अशी माहिती समोर आली आहे. शुभांगीला लहानपणापासून विमानांबद्दल आकर्षण होते. एझिमा अॅकॅडमीमधून नौदल ओरिंएटेशनचा सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील एक वर्षासाठी शुभांगी आता वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहे. हे प्रशिक्षण हैदराबादमधील डुंडीगल हवाईदल अॅकॅडमीमध्ये होईल. एझिमा अॅकॅडमीमधून एकूण १० कॅडेट्‌स पुढील प्रशिक्षणासाठी जातात. त्यापैकी यावेळेस प्रथमच महिला कॅडेट्‌सचा त्यात समावेश आहे, असे एका अधिकार्‍यांनी सांगितले. याबद्दल बोलताना शुभांगीने सांगितले की, “ती तिच्या बाजूने शंभर टक्के अजून प्रयत्न करणार आहे.’’ तसेच तिच्या या उत्तुंग यशानंतर तिला अशी आशा आहे की, ती अशा महिलांसाठी प्रेरणा बनेल ज्यांना नौदलात येण्याची इच्छा आहे. शुभांगीसह आणखी ३ महिलांची निवड झाली. त्यात दिल्लीची आस्था सहगल, पॉंडिचेरीची रूपा ए. आणि केरळची शक्तिमाया एस. यांचाही नौदलाच्या अर्मामेंट इन्स्पेक्शन ब्रँचमध्ये समावेश करण्यात आला आहे. या शाखेमध्ये त्यांना शस्त्रे, दारूगोळा आणि लेखापरीक्षण इ. कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. यांच्यामुळे नौदलात चार महिलांची भरती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या महिलांनी फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर संपूर्ण भारताला त्यांचा अभिमान वाटेल, असे कर्तृत्व केले आहे. त्यासाठी त्यांना खूप सा-या सदिच्छा आणि पुढील वाटचालींसाठी देखील शुभेच्छा!

 

- पूजा सराफ