इफ्फी ठरली तरुण निर्मात्यांसाठी वरदान
 महा एमटीबी  23-Nov-2017

 

इफ्फीत तंत्रज्ञान, दर्शकगण, वितरण प्रदर्शनाच्या सोयी या विषयावर ओपन फोरममध्ये चर्चा
पणजी : तरुण सिने निर्मात्यांसाठी इफ्फी ही सर्वात मोठी संधी असल्याचे मत निर्माते श्रेयांस जैन यांनी आज ओपन फोरम मधील चर्चेत मांडले. फिल्म्स सोसायटी ऑफ इंडियाने आयोजिलेल्या तंत्रज्ञान दर्शकगण, वितरण, चित्रपटांचे अर्थशास्त्र आणि प्रदर्शनाच्या सोयी यांच्या बदलत्या परिप्रेक्षात चित्रपट निर्मिती या विषयावर आजची चर्चा झाली. भारत मिर्ले, एन.विद्याशंकर (कर्नाटक) आणि व्हिएतनामचे निर्माते लवाँग दिन्ह डुंग यांनी या चर्चेत भाग घेतला.

 

सिनेमाचे माध्यम सामान्य आणि अभिजनांनाही आकर्षुन घेते असे सांगून श्रेयांस जैन यांनी त्यांच्या चित्रपट निर्मितीचा अनुभव चर्चेत मांडला. ‘साई आलो पायी पायी’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत सध्या व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

 

‘फादर अँड सन’ या व्हिएतनामी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक डुंग यांनी महोत्सवात त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. व्हिएतनाममध्ये स्वतंत्र निर्मात्याला चित्रपट बनवणे अवघड पडते, असेही ते म्हणाले.तंत्रज्ञान झपाट्याने बदलले असले तरी चित्रपट निर्मितीची संस्कृती आपण जपली पाहिजे, असे मत बेंगलुरु महोत्सवाचे संचालक विद्याशंकर यांनी सांगितले. कर्नाटकातले निर्माते भारत मिर्ले यांनी फिल्म बाजारमुळे इफ्फी तरुण निर्मात्यांना वरदान ठरली असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान बदलले तरी चित्रपटांच्या आर्थिक गुंतवणुकीची समस्या अद्याप तशीच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.