कविमनाचे ’खरे’पण
 महा एमटीबी  23-Nov-2017


कवी संदीप खरेंशी माझी ओळख असण्याचं काहीच कारण नव्हतं. त्यांच्यासारखे अनेक कलाकार त्यांच्या कलाकृतींव्दारेच सर्वांच्या परिचयाचे होऊन जातात. अगदी घरातल्या माणसासारखेच. संदीप खरेदेखील या अर्थाने आमच्या घरातलेच होते. आपल्या आशयसंपन्न कवितांनी ज्या ज्या मंडळींना कवी संदीप खरेंनी वेड लावले आहे अशा वेड्यांमध्ये आमचाही समावेश आहेच. किंबहुना आम्ही म्हणजे अगदी पहिल्या-दुसऱ्या रांगेतल्या विशेष वेड्यांपैकी. तर अशा वेड्यांची निर्मिती करण्यात हातखंडा असलेल्या कवी संदीप खरेंबरोबर आपण कुठल्यातरी गंभीर ’… विषयावर बोलू काही’ असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तो योग अचानकपणे जुळून आला आणि त्या निमित्ताने या प्रतिभासंपन्न कलावंताचे ’खरे’पण पहायला मिळाले.

 

जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्यासह कवी संदीप यांची त्यांच्याच घरी पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी रक्तपेढीमध्ये अद्ययावत अशा न्यूक्लिक ॲसिड टेस्टिंगची प्रयोगशाळा सुरु झाली होती. या प्रयोगशाळेचे उद्घाटन होणार होते भा.ज.पा.चे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फ़डणवीस यांच्या हस्ते. याच कार्यक्रमाला जोडून संदीप खरे यांच्या कवितांचा कार्यक्रम व्हावा अशी कल्पना पुढे आली आणि त्याच संदर्भात आमची ही भेट झाली. यावेळी डॉ. कुलकर्णींशी झालेल्या बोलण्यामध्ये स्वत: खरे आणि खरे वहिनींनीदेखील रक्तपेढीबद्दल बऱ्याचशा बाबी आत्मीयतेने समजून घेतल्या. अर्थात कवितांचा हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे बहारदार झाला, हे वेगळे सांगायला नकोच, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तपेढी आणि संदीप खरे यांचे ऋणानुबंध जुळून आले. दुसऱ्यांदा संदीप खऱ्यांची भेट झाली ती त्यांच्याच घरी. यावेळी मात्र मी एकटाच त्यांना भेटायला गेलो होतो. निमित्त जरा वेगळे होते.

 

त्यावेळी जनकल्याण रक्तपेढीमध्ये नुकतीच ’अफ़ेरेसिस’ ही अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित झाली होती. या उपकरणाच्या मदतीने रक्तदात्याच्या शरीरातून केवळ ’प्लेटलेट्स’ हा घटक वेगळा काढता येऊ शकतो. रक्तदात्याने दिलेल्या रक्तातून बाजुला काढलेल्या प्लेटलेट्स आणि थेट रक्तदात्याच्या शरीरातूनच वेगळ्या केलेल्या प्लेटलेट्स या दोन्हींमध्ये गुणात्मकदृष्ट्या बराच फ़रक पडतो. या दुसऱ्या प्रकारच्या प्लेटलेट्स - ज्याला SDP (सिंगल डोनर प्लेटलेट्स) असं संबोधलं जातं - तयार करण्यासाठी अफ़ेरेसिस या उपकरणाची गरज भासते. अर्थात या उपकरणाच्या सहाय्याने प्लेटलेट्स बाजुला काढण्यासाठी रक्तदाते जरा विशेष तयारीचे लागतात. साधारणत: एक ते दीड तास या प्रक्रियेसाठी लागतो. त्यामुळे स्वाभाविकच प्लेटलेट्सची मात्रा जास्त असण्याबरोबरच हा रक्तदाता शारीरिक व मानसिक दृष्ट्याही तयारीचा लागतो. अशा विशेष गुणवत्तेच्या रक्तदात्यांची एक चांगली टीम तयार करण्याचे काम रक्तपेढीच्या माध्यमातून प्राधान्याने केले गेले व ज्या प्लेटलेट्स रुग्णांना मिळण्यासाठी ’प्लेटलेटदाते’ शोधण्यात रुग्णांच्या नातलगांचा अमूल्य वेळ जात होता, तो वेळ रक्तपेढीच्या या कामामुळे अगदी शून्यावर आला. दुर्दैवाने त्या एका वर्षी तर पुण्यात डेंग्यूने हाहाकार माजवला होता. डेंग्यूमुळे प्लेटलेटची मात्रा झपाट्याने कमी होत जाते आणि पर्यायाने रुग्णाच्या जीवास धोका उत्पन्न होतो. अशा वेळी सिंगल डोनर प्लेटलेट्स अक्षरश: संजीवनीचे काम करतात. मला आठवते, या वर्षात म्हणजे २०१४ मधील डेंग्यूची साथ तीव्र असणाऱ्या जुलै ते ऑक्टोबर या केवळ चार महिन्यात जनकल्याण रक्तपेढीने अफ़ेरेसिसच्या सुमारे साडेपाचशे प्रक्रिया केल्या होत्या. अर्थात यामध्ये नि:संशय या प्लेटलेटदात्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच या वर्षाच्या शेवटी या सर्वांचं कौतुक करण्यासाठी एका स्नेहमिलनाचे आयोजन रक्तपेढीने केले होते. या कार्यक्रमात प्लेटलेटदात्यांविषयी सर्व संबंधित लोकांच्या भावना चित्रफ़ितींच्या माध्यमातून संकलित कराव्यात आणि त्या सर्वांना दाखविल्या जाव्यात अशी योजना होती. यात डॉक्टर्स, रुग्ण, रुग्णांचे नातलग व समाजातील काही गणमान्य व्यक्ती या सर्वांचा समावेश केला होता. याच योजनेअंतर्गत एक बाइट कवी संदीप खरेंचा घ्यावा असे ठरले. पहिल्यांदा अर्थातच फ़ोनवरुन बोलणं झालं. रक्तपेढीशी संबंधित बरेचसे विषय तसे समजायला क्लिष्टच. त्यामुळेच फ़ोनवरुन काय काय बोलणार आणि समोरच्याला ते किती समजणार हा तसा आमच्यापुढचा नेहमीचाच प्रश्न असतो, तसा तो यावेळीही होताच. पण जनकल्याणशी संबंधित विषय आहे इतक्याच मुद्द्यावर खरेंनी त्वरित वेळ दिली आणि ’घरीच या म्हणजे निवांतपणे बोलता येईल’ असे सांगितले.

 

ठरलेल्या वेळी मी सिंहगड रस्त्यावरील त्यांच्या घरी पोहोचलो. प्रसन्नपणे हसत त्यांनी स्वत: माझे स्वागत केले. मला बसायला सांगून ते स्वत:च ट्रेमधून पाण्याचे ग्लास बाहेर घेऊन आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे होत होते. मोठ्या माणसांबद्दल आपल्या मनात ज्या कल्पना असतात, त्यापेक्षा खूप सहजपणा इथे पहायला मिळत होता आणि त्याचेच दडपण आल्यासारखे होत होते. फ़ोनवर झालेले बोलणे आठवत संदीप खऱ्यांनी मला पहिलाच प्रश्न टाकला, ’प्लेटलेट्स ला मराठी शब्द काय आहे हो ?’ यावर मी दिलेल्या ’रक्तबिंबिका’ या उत्तरादाखल हसत हसत ते म्हणाले, ’अरे बाप रे ! मग प्लेटलेट्सच ठीक आहे.’ हे बोलणे चाललेले असतानाच खरेवहिनी एका ट्रेमधून चहा-बिस्किट्स वगैरे घेऊन बाहेर आल्या. मला पुन्हा संकोचल्यासारखे झाले आणि मी म्हणालो, ’अहो, वहिनी कशाला त्रास घेतलात ?’ यावर ती गृहलक्ष्मी उत्तरली, ’अहो, तुम्ही घरी आलात ना आमच्या ! मग इतकंही करायला नको ?’ मग चहा घेता घेताच आमचा संवाद सुरु झाला. प्लेटलेटदानासंबंधीची सर्व माहिती सांगून झाल्यावर शेवटी मी त्यांना इतकंच म्हटलं, ’संदीपजी, या सर्व प्लेटलेटदात्यांचे योगदान अमूल्य आहे. कितीतरी लोकांचे जात असलेले प्राण यांनी अक्षरश: माघारी खेचून आणले आहेत. त्यामुळे तुम्ही या लोकांचे कौतुक करणारी चार वाक्येच केवळ बोला. त्यात रक्तपेढीचे नाव आले नाही तरी चालेल.’ त्यांना हा विषय खरोखरीच भिडला हे त्यांनी त्यानंतर दिलेल्या बाइटवरुन माझ्या लक्षात आले. प्लेटलेटदात्यांना उद्देशून केलेल्या आपल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, ’मित्रांनो, तुमचं योगदान खरोखरीच अमूल्य आहे. तुमच्यामुळे केवळ एक व्यक्ती वाचली असं नाही तर त्या व्यक्तीवर आधारित असणारं त्याचं कुटुंबच पुन्हा उभं राहु शकलं. अशा प्रकारे मृत्यूशी झुंज देऊन एखाद्याचे प्राण परत घेऊन येणारे तुम्ही सर्वजण ’रक्तयोद्धा’ आहात असे मी म्हणेन. मलाही तुमच्यात सहभागी व्हायला खूप आवडेल. सर्वांचे कौतुक आणि शुभेच्छा.’ यातला ’रक्तयोद्धा’ हा शब्द मला खूपच आवडला. मी खऱ्यांना म्हटलंसुद्धा की ’तुमच्या प्रतिभेतून काहीतरी नवीन मिळणार याची मला खात्री होती.’ ही क्लिप खूपच सुंदर झाली. या कार्यक्रमासाठी घेतलेल्या अशा निरनिराळ्या क्लिप्स जोडताना आम्ही ही क्लिप मुद्दाम सर्वांत शेवटी टाकली आणि कार्यक्रमात ती खूपच प्रभावी वाटली. संदीप खरेंसारख्या व्यक्तीकडून अशी कौतुकाची दाद मिळणे सर्वच रक्तदात्यांना सुखावून गेले.

 

त्या दिवशी संदीप खरेंच्या घरातून निघताना एकाएकी काहीतरी मनात आलं आणि बोलावं की नाही अशा व्दिधेत असताना मी अखेर बोललोच. मी म्हणालो, ’संदीपजी, या क्लिपचा उपयोग आम्ही केवळ रक्तदाता-प्रबोधनासाठीच करणार बरं का. बाकी कशासाठीही नाही.’ माझ्या बोलण्यातला आशय चटकन त्यांच्या लक्षात आला आणि एक हात माझ्या खांद्यावर ठेवित ते म्हणाले, ’असं म्हणायचीही गरज नाही. माझा तुमच्यावर आणि जनकल्याणवर पूर्ण विश्वास आहे.’ कवी संदीप खरे अंतर्बाह्य ’खरे’ आहेत, याचीच ती पावती होती.

 - महेंद्र वाघ