मेलिता नॉरवुड - लंडनची हेर आजीबाई
 महा एमटीबी  23-Nov-2017

 
मेलिता नॉरवुड काही कडवी साम्यवादी स्टॅलिनवादी वगैरे नव्हती. ती एक भोळीभाबडी साम्यवादाचं वैचारिक आकर्षण असणारी स्त्री होती. साम्यवाद हाच जगाला तारून नेईल, असं तिला प्रमाणिकपणे वाटतं होतं,’’ डेव्हीड बर्क म्हणतो.
 
त्या काळात अनेकांचं असं झालं. तसं युरोपला साम्यवादी तत्त्वज्ञान किंवा साम्यवादी राजकीय विचार नवा नव्हता. अनेक विद्वानांनी अनेक तत्त्वज्ञाने मांडून ठेवली होती. त्यातलंच ते एक तत्त्वज्ञान होतं.
 
पण १९१७ साली रशियात बोल्शेविक क्रांती झाली. साम्यवादी तत्त्वज्ञानावर आधारित राजकीय आणि सामाजिक व्यवस्था सुरू झाली. त्या व्यवस्थेमुळे रशिया हा एक संपन्न, समृद्ध आणि समर्थ देश बनला आहे. असं चित्र रंगविण्यात येऊ लागलं. आणि तिथे अनेकांना साम्यवादाची भुरळ पडली. युरोपमधला कामगार वर्ग आणि मध्यमवर्ग ज्यांना भांडवलशाहीचे फटके बसत होते. त्यांना एकदम असं वाटायला लागलं की, ज्या राज्यव्यवस्थेत सर्व माणसं समान आहेत, बळी तो कान पिळी असला प्रकार जराही नाही, अशी ही साम्यवादी व्यवस्थाच सर्वोत्तम.
 
 
इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, अनेक शतकापासून प्रथम राजे, सरंजामदार मग चर्च आणि त्यानंतर धनदांडगे भांडवलदार यांची सततची दादागिरी सहन करून युरोपातले गरीब नि मध्यमवर्गीय गांजून गेले होते. अशा मनस्थितीत त्यांना रशियातली सर्वांना समान लेखणारी राज्यव्यवस्था यशस्वी दिसली. त्यामुळे सरंजामदारी पोपशाही आणि भांडवलशाही या सर्वांनाच साम्यवाद हा एक प्रभावी पर्याय आहे, असं वाटलं. रशियाप्रमाणे आपल्या देशांमधूनही हीच राज्यव्यवस्था लागू झाली तर आपणही रशियन नागरिकांप्रमाणे सुखी होऊ, असं त्यांना प्रामाणिकपणे वाटलं. अखेर सुख हवं असणं, ही मानवी प्रवृत्ती आहे.
 
या प्रवृत्तीचा सोव्हिएत रशियन सत्ताधार्‍यांनी पुरेपूर फायदा घेतला. १९१७ ते १९२४ या आपल्या ७ वर्षांच्या कारकिर्दीत लेनिनने आणि १९२४ ते १९५३ या आपल्या २९ वर्षांच्या काराकीर्दीत स्टॅलिनने साम्यवादाच्या या वैचारिक आकर्षणाचा फायदा घेत जगभर हेरांची जाळी उभारली.
 
तुमच्या देशात तुम्हाला साम्यवादी व्यवस्था हवी आहे ना, सोव्हिएत रशियाचे हात बळकट करा म्हणजे तुमच्याकडचा साम्यवादी पक्ष बलवान होईल आणि अखेर ती व्यवस्था तुम्हाला मिळेल. फक्त त्यासाठी तुमच्या देशाच्या राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक वर्तुळात काय काय घडामोडी चालल्यात त्याची तुम्हाला उपलब्ध होईल ती माहिती आपण पाठवत चला. अशा भुलावणीला अनेक इंटलेक्चुअल्स बळी पडले. मेलिता नॉरवुड ही त्यातलीच एक. आपण सोव्हिएत रशियाला माहिती पुरवतोय, याला ’हेरगिरी’ म्हणतात याचाही अशा अनेकांना पत्ता नव्हता. अशा भाबड्या लोकांनी पाठवलेली माहिती रशियनांच्या फार उपयोेगाची ठरली असेल, असंही नाही पण केवळ साम्यवादाच्या आकर्षणाच्या मोहक गळाने रशियाने जगभराच्या तथाकथित बुद्धिमंत-विचारवंतांना साफ बनवलं आणि माहितीचे असंख्य स्त्रोत निर्माण केले, हा यातला महत्त्वाचा मुद्दा.
 
मेलिता नॉरवुडने दिलेली माहिती मात्र फारच मौल्यवान ठरली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारावरच सोव्हिएत अणुशास्त्रज्ञांनी १९४९ साली पहिला अणुस्फोट केला. एका दृष्टीने तिथूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली कारण अणुबॉम्ब हे रामबाण अस्त्र आता अमेरिकेप्रमाणेच रशियाच्याही भात्यात आलं.
 
घडलंं असं की, १९३३ नंतरच्या काळात मेलिता नॉरवुड ही राजकीयदृष्ट्या थोडी जागृत झाली म्हणजे आपल्या हिंदी पिक्चरवाल्यांच्या आवडत्या भाषेत सांगायचं तर ’जब से उसने होश सँभाला तब पाया की, जर्मनीमध्ये नाझीवाद अणि इटलीमध्ये फॅसिस्टवाद प्रबळ होत चालले आहेत. त्यांच्या अतिरेकी राष्ट्रवादाला पायबंद घालण्यात बिटिश राजकारणी अयशस्वी ठरत आहेत. मग आता ब्रिटनचा आणि एकंदर जगाचा तारणहार कोण तर अर्थातच साम्यवादी रशिया. या कळात अमेरिकेने जे अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं होतं, त्यामुळे सर्वसामान्य युरोपीय माणसाला अमेरिकेबद्दल आपलेपणा वाटत नसे.
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन या पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेला ऍन्ड्र्यू रॉथस्टाईन यांच्या संपर्कात मेलिता १९३४ साली आली. त्याने तिला तत्कालीन सोव्हिएत गुप्तहेर संस्था एन. के.व्ही. डी.शी जोडून घेतलं. दोनच वर्षांत मेलिता नॉरवुड एन. के. व्ही. डी. ला माहिती पाठवू लागली. त्या काळात रॉथस्टाईलने कदाचित मेलितासारखे अनेक हस्तक निर्माण केले असतील. मेलिताच्या माहितीला महत्त्व आलं ते १९४० नंतरच्या काळात.
  
१९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. अल्बर्ट आईनस्टाईनच्या सिद्धांतावरून प्रत्यक्ष अणुबॉम्ब बनविण्याचे प्रयोग अँग्लो अमेरिकन्स जर्मन्स आणि रशियन्स एकाच वेळी करत होते. १९४० नंतरच्या कालखंडात मेलिता नॉरवुड ’ब्रिटिश नॉन फेरस मेटल्स रिसर्च असोसिएशन’ या संस्थेच्या संचालकाची कार्यवाह म्हणून कामकरू लागली. इतकं साधं, निरूपद्रवी भासणारं नाव धारण करणारी ही संस्था प्रत्यक्षात ब्रिटिश अणुबॉम्ब प्रकल्पाचं कामकरत होती पुढे अमेरिकेने अणुबॉम्ब तयार केला, त्याचा उपयोग केला आणि इतर स्पर्धकांवर मात केली, हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे परंतु साम्यवादाला सहानुभूती असलेल्या विचारवंतांच्या दृष्टीने अमेरिकेकडे अणुबॉम्ब आहे आणि सोव्हिएत रशियाकडे नाही, म्हणजे असमतोल निर्माण झाला!
 
 
हा असमतोल दूर करण्याचे रशियनांचे जोरदार प्रयत्न चालूच होते. जर्मनीच्या पराभवानंतर अनेक जर्मन शास्त्रज्ञ सोव्हिएत सेनेच्या हाती लागले होते. त्यांना कामाला जुंपण्यात आले होते. शिवाय अँग्लो-अमेरिकन अणू संशोधन प्रकल्पात मोठ्या पदावर काम करणारा क्लाउस ङ्गुक्स हा शास्त्रज्ञ रशियाने ङ्गोडून आपल्याकडे वळवला. त्यामुळे रशियन अणुबॉम्ब प्रकल्पाने एकदम हनुमान उडीच घेतली, पण तरीही युरेनियम अतिशुद्ध स्वरूपात आणणं आणि त्यातून प्लुटोनियमचा अर्क काढणं सोव्हिएत शास्त्रज्ञांना अजून जमत नव्हतं. त्यांच्या अणुभट्टीत काहीतरी गङ्गलत होती. त्यामुळे हे घडत होतं. अशा स्थितीत अचानक ध्यानीमनी नसताना त्यांच्या हाती मेलिता नॉरवुडने पाठवलेली अणुभट्टीविषयक माहिती आली. त्यांनी ती उपयोगात आणून पाहिली. आणि त्यांचा सगळा प्रश्नच सुटला. सोव्हिएत रशियन अणुबॉम्ब तयार झाला. १९४९ साली त्याचा प्रायोगिक स्ङ्गोट करण्यात आला. रशिया अण्वस्त्रसज्ज राष्ट्र झाले. क्रेमलिनच्या महालात स्टॅलिन आणि मॉस्कोच्या लाल चौकातल्या शवपेटीत लेनिन, आनंदाने बेहोष झाले.
 
अणु संशोधन क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, मेलिताकडून मिळालेली माहिती, त्यांची त्यांना शोधून काढायला आणखी किमान ५ वर्षं लागली असती. म्हणजे मेलिताच्या माहितीमुळे रशिया ५ वर्षं अगोदरच अण्वस्त्रधारी बनू शकला. गंमत म्हणजे आपण ही हेरगिरी केलीय, असे मेलिताला त्याही वेळी वाटलं नव्हतं आणि नंतरही वाटत नव्हतं. डेव्हिड बर्कशी बोलताना ती म्हणाली, ‘‘कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या तरी विरुद्ध अशी हेरगिरी वगैरे करावी, असा माझा मुळी उद्देशच नव्हता. मला आपलं एवढंच वाटत होतं की, सोव्हिएत रशिया जगाच्या बरोबरीने असला पाहिजे.’’
 
 
 
आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेलिताची ही हेरगिरी उघडकीस यायला १९९९ साल उजाडावं लागलं. म्हणजे १९४९ साली रशियाने अणुस्ङ्गोट केला. मग शीतयुद्ध सुरू झालं. नंतर १९५३ साली स्टॅलिन मेला. मग काही काळ निकिता कू्रश्चेव्हची जराशी सौम्य राजवट आली. शीतयुद्ध संपेल अशी आशा लोकांना वाटू लागली. तोच क्रूश्चेव्हची हकालपट्टी होऊन ब्रेझेनेव्ह आला. शीतयुद्ध आणखीनच कठोर बनलं. एवढं सगळं अनुभवत मेलिता नॉरवुड १९७० साली नोकरीतून रीतसर निवृत्त झाली. तरीही तिचं हेरगिरीचं भांडं ङ्गुटलं नव्हतं. पुढे १९९१ साली सोव्हिएत रशियाच कोसळला. सर्वांना समान न्याय देणारं ते उदार, न्यायी, श्रमिकांचं, कष्टकर्‍यांचं महान राज्य संपलं बिचारं! तरीही मेलिताचं रहस्य शाबूत होतं. ते ङ्गुटायला १९९९ साल उजाडलं, तेव्हा मेलिता ८९ वर्षांची झाली होती. पुढे ती २००५ पर्यंत जगली. १९९९ साली मेलिता नॉरवूडच्या हेरगिरीची कथा ब्रिटिश वृत्तपत्रांमधून भरभरून आल्यावर ब्रिटिश सरकारची पंचाईत झाली. कारण साहजिकच लोकांच्या मनात प्रश्न आला की, सरकारच्या अण्वस्त्र प्रयोगशाळेत महत्त्वाच्या पदावर एक साम्यवादी हस्तक घुसलेला असताना ब्रिटनची एम.आय.५ नि एम.आय. ६ ही सुप्रसिद्ध गुप्तहेर खाती काय करत होती?
 
मग सरकारने काही तरी थातूरमातूर खुलासा केला आणि मेलिता नॉरवूडवर देशद्रोहाचा खटला भरण्यास नकार देऊन प्रकरण मिटवून टाकलं. मेलिता नॉरवूड ही मूळची लात्‌विया या पूर्व युरोपीय देशातली होती. तिचा बाप अलेक्झांडर सिरनीस आणि आई गाटर्‌रूड यांनी १९२० च्या दशकात लात्‌वियातून इंग्लंडला स्थलांतर केलं होतं.
 
डेव्हिड बर्क हा पत्रकार आहे. पूर्व युरोपीय देशांमधून इंग्लंडला स्थलांतरित होणार्‍या लोकांच्या मुलाखती घेणं, त्यांचा अभ्यास करणं हे त्याचं आवडतं क्षेत्र आहे. १९९९ नंतर तो अनेकदा मेलिताला भेटला आणि त्याने तिच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या.
 
त्या मुलाखतींवर आधारलेलं त्याचं पुस्तक ‘द स्पाय हू केमइन ङ्ग्रॉम को ऑप’ हे ऑक्टोबर २००८ मध्ये प्रकाशित झालं. या नावालाही हेरगिरीच्या जगात थोडा इतिहास आहे. प्रख्यात ब्रिटिश लेखक जॉन ल कार याचं ‘द स्पाय हू केम इन ङ्ग्रॉम कोल्ड’ हे पुस्तक १९६३ साली आलं होतं. १९६५ साली त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपटही आला होता. हेरगिरीचं जग हे नुसतंच थरारक आणि रोमांचक नसून किती विश्र्वासघातकी असतं,हे त्यात मांडण्यात आलं होतं.
 
- मल्हार कृष्ण गोखले