दानशूरांची दानत
 महा एमटीबी  22-Nov-2017


 

एका इंग्रजी वचनानुसार, जग हे चांगल्या लोकांनी भरलेले आहे आणि जर का अशी चांगली लोकं तुम्हाला सापडत नसतील, तर तुम्हीच त्यापैकी एक व्हा! श्रीमंत व्यक्ती म्हटलं की आपल्याला त्यांचा फक्त चंगळवादच दिसतो, त्यांचा ऐषोआराम, कधी कधी त्यांचे उद्धट वागणे अशा नानाविध गोष्टी आपल्यासमोर येतात. पण असेही काही समाजभान जागृत असणारे कोट्याधीश आहेत, ज्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते आणि त्या लक्ष्मीचा समाजालाही लाभ व्हावा, म्हणून ही मंडळी सढळ हस्ते मदतीसाठी सदैव तत्पर असतात. त्यापैकी एक म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जनक बिल गेट्‌स आणि उद्योजक वॉर्न बफेट. दोघांनी मिळून ’गिविंग प्लेज’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानुसार श्रीमंतांनी आपली अर्धी संपत्ती आपल्या संपूर्ण आयुष्यात किंवा मरणोत्तर गरजूंना दान करायची. ऑगस्ट २०१० साली ४० अमेरिकन श्रीमंतांनी आपली अर्धी संपत्ती दान देण्याचा निर्धार केला. सुरुवातीला हा उपक्रम फक्त अमेरिकेपुरता मर्यादित होता, पण पाहता पाहता हे लोण इतरही देशांत पसरले. फेब्रुवारी २०१३ पासून इतर देशातील श्रीमंत व्यक्तीही या उपक्रमात आवर्जून सहभाग झाल्या. आजघडीला तब्बल २१ देशातील १७१ लोक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अमेरिकेतून सुरू झालेला हा उपक्रम ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, जर्मनी, इस्रायल, मलेशिया, सौदी अरेबिया, तुर्की, युक्रेनसारख्या देशातील कित्येक धनिकांनी मनस्वी स्वीकारला. भारतातूनही अझीम प्रेमजी, किरण मझुमदार-शॉ, पीनसी मेनन यांनी आधी सहभाग नोंदवला. आता ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन नीलकेणी व त्यांची पत्नी रोहिणी नीलकेणी यांनीसुद्धा आपली अर्धी संपत्ती दान करण्याचा मानस जाहीर केला आहे. आता अंदाजे तब्बल ३६६ दशलक्ष डॉलर एवढ्या निधीच्या माध्यमातून हे लोककल्याणाचे कार्य होणार आहे. सध्या जगात निर्वासितांचा प्रश्न आ वासून उभा आहे. तेव्हा या दान केलेल्या निधीच्या माध्यमातून निर्वासितांच्या हितासाठी काम केले जाईल. तसेच आपत्ती निवारणासह जागतिक आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, वैद्यकीय संशोधन, गुन्हेगारी न्याययंत्रणेतील सुधारणा, पर्यावरण संतुलनासाठी या निधीचा विनियोग केला जाईल. बरेचदा एवढे महत्कार्य करताना व्यक्तीच्या मनात अहंभाव निर्माण होतो. पण, या उपक्रमात बिल गेट्‌स यांनी यापूर्वी असे दान केलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन इतरांनाही मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे किती संपत्ती दान केली यावरून एखाद्याची दानशूरता ठरत नसते, तर कितीही संपत्ती पदरी असली तरी दान देण्याची मानसिकताच दानशूरपणाचे खरे लक्षण.

 

- तुषार ओव्हाळ