महिला सक्षमीकरणाच्या संस्कृतीक्षम दिशा
 महा एमटीबी  22-Nov-2017
 

 
 
महिलांच्या कल्याणाचा, प्रगतीचा विषय निघाला की हमखास १९७५ सालाचा विषय निघतोच. १९७५ साल ’आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित केले गेले आणि त्यानंतर जगभरात महिलांच्या कल्याणासंबंधी भूमिका विचारात आल्या, असे मत हिरीरीने मांडले जाते. इतकेच काय आपल्या भारतीय सरकारच्या पंचवार्षिक योजनांचा विचार केला तर त्याबाबतही कित्येक जण असेच मत मांडताना दिसतात की, आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतरच भारतीय महिलांचे प्रश्‍न, त्यासंबंधीच्या योजना प्रकाशात आल्या पण, जेव्हा आपण नाशिकच्या महिला सक्षमीकरणाच्या संस्कृतीक्षम कल्पना राबविणार्‍या स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीला भेट देतो तेव्हा आपल्या महिला सक्षमीकरणाच्या जाणिवा रूंदावतात.
 
 
नाशिक शहराच्या मानबिंदूवर स्थिरावलेले स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीची वास्तू म्हणजे राणी भवन. राणी भवन हे नाशिक शहराचा एक लॅँडमार्कच झाले आहे. वास्तू म्हणजे केवळ विटा सिमेंटचे  रचलेले मनोरे असते का? नाही राणी भवन ही नुसती वास्तू नसून त्यातून  समाजकल्याणाच्या दिशा उजळल्या आहेत. या वास्तूत  महिला सक्ष्मीकरणाचे अनेक अंगाने विचार होतात आणि त्यावर कार्यही होते.
 
 
राणी भवनामध्ये गेले असता विद्याताई चिपळूणकर, मंगल सौंदाणे भेटल्या. अतिशय आत्मियतने त्यांनी स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीची माहिती सांगितली. विद्याताई म्हणाल्या, ’’काळ बदलला आहे, जागतिकीकरणाने जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे पण, स्त्री म्हणून स्त्रीचे आंतरिक पवित्र शक्ती असलेले अस्तित्व चिरस्थायी आहे. नातेसंबंध जपत, स्त्री समाज आणि त्याद्वारे देशाच्या कल्याणासाठी जाणता अजाणता २४ तास कार्यरत असते. तिच्या जगण्याच्या पद्धतीचे स्वरूप बदललेले असले तरी त्यातून अभिप्रेत असणारे मार्ग कुटुंब आणि समाजाभिमुखच आहेत. या सर्वांचा विचार करून आज समितीमध्ये उपक्रम केले जातात.’’ या दोघींशी बोलल्यानंतर समितीच्या स्थापनेची माहिती कळली. ती अशी- शौर्यशाली स्वातंत्र्यसेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदानाला १९५८ साली १०० वर्ष झाली. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना १९५८ साली करण्यात आली. देशभक्ती, स्वाभिमान व शौर्य यांचे साक्षात प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाईंची केवळ स्मृती चिरस्थायी करणे, एवढाच या संस्थेचा हेतू नाही. राणी लक्ष्मीबाईंच्या गुणांचा आदर्श, पुढील पिढ्यांतील मुलींनी आपल्यामध्ये जोपासावा, या उदात्त हेतूने संस्थेच्या कार्याची सुरुवात झाली. संस्थेत राष्ट्रभक्ती संस्कृती संवर्धन व संरक्षण यांना प्रोत्साहन देणार्‍या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 
 
 
या संस्थेच्या उपक्रमांना भेट देण्यासाठी दिवस अपुरा पडतो. संस्थेमध्ये चालणारा प्रत्येक उपक्रम एक स्वतंत्र विषय आहे.
 
अहिल्यादेवी वसतिगृह - संस्थेच्या या वसतिगृहात २२ भगिनी तसेच ६ वनवासी क्षेत्रातील विद्यार्थिनींची निःशुल्क राहण्याची आणि जेवणाची सोय आहे. या वसतिगृहाचेही एक वेगळेच विश्‍व आहे. निरनिराळ्या ठिकाणांहून भगिनी इथे वस्तीसाठी येतात. शिक्षण किंवा नोकरीसाठी त्या शहरात आलेल्या असतात. सुरक्षित आणि घरंदाज निवारा म्हणून त्या राणीभवनात येतात आणि इथल्याच होतात. वसतिगृहात नित्यनियमाने होणार्‍या प्रार्थना, योगासने, विविध उपक्रमांमध्ये सर्वजणी सहभागी होतात. नाही, सर्वजणी मिळून उपक्रम राबवितात हेच म्हणणे योग्य ठरेल. तरुण मुली म्हटल्या की मोबाईल, टीव्ही, सिनेमा पाहणे हे ओघाने आलेच असे वाटते पण इथल्या वसतिगृहात प्रार्थनेच्या वेळी स्वेच्छेने मोबाईल, दूरदर्शन बंद करून एकत्रितपणे तल्लीन होऊन प्रार्थना करणार्‍या युवती, महिला पाहिल्या. न राहवून प्रार्थना संपल्यावर त्यातल्या एका युवतीला मी विचारले, ’’प्रार्थना कंपलसरी आहे का? नाही मोबाईलवर बोलणे सुरू असताना ते बंद करून तुम्ही लगबगीने प्रार्थनेला गेलात.’’ यावर ती तरुणी मंद स्मितहास्य करत म्हणाली, ’’मॅडम मी धुळ्याची. वकील आहे.  पूर्वी प्रार्थनेला वेळ नसायचा. देवदेवही विशेष प्रसंगीच असायचे. पण इथे आल्यापासून मला प्रार्थनेचे महत्त्व कळले. खरेच मनाला शांती लाभली. इथे कुणावर प्रार्थनेला यायची, प्रार्थना करायची सक्ती नाही.’’ 
 
 
असे म्हणून ती पुन्हा मोबाईलवर बोलण्यात गुंग झाली. वसतिगृहात अगदी स्वच्छता. तितकीच शांतता. मुली-मुली राहातात म्हणून आवाज नाही की गोंधळ नाही. 
 
 
गोकुळ पाळणाघर- या परिसरात पूर्वी मध्यमवर्गीय वस्ती होती. ६०-७० च्या दशकात गृहिणी नोकरीही करू लागल्या. कामानिमित्ताने शहरात विस्थापितांचे प्रमाण वाढलेले. त्यामुळे आजी आजोबा गावी आणि पती पत्नी मुलं शहरात, हे दृश्य. मग आई-वडील दोघेही कामाला गेल्यावर लहान बालकांना सांभाळणार कोण? त्यावेळी शहरात सर्वप्रथम पाळणाघराची संकल्पना राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीने गोकुळ पाळणाघराच्या रूपात साकार केली. 
 
 
शारदा माता बालक मंदिर- मुलांना करू द्यायचे, खेळू द्यायचे, पाहू द्यायचे, बोलू द्यायचे, खेळता खेळता शिकू द्यायचे आणि या सर्वांमध्ये त्याचा विकास करायचा, हा उपक्रम शारदा देवी बालमंदिरामध्ये चालतो. इंद्रिय शिक्षण, भाषाज्ञान, गणित, जीवनव्यवहार, परिसर, सामान्य ज्ञान, चित्रकला, हस्तव्यवसाय, खेळ, राष्ट्रीय वृत्तीचा विकास यासंबंधी सण उत्सव आयोजन, संगीत, परिपाठ आणि इंग्रजी भाषा ज्ञान या सर्वांचा या बालमंदिरामध्ये अंतर्भाव केलेला आहे. 
 
 
जिजामाता उद्योग केंद्र -गेल्या ५६ वर्षांपासून जिजामाता उद्योग केंद्र समाजाला चवीचे पदार्थ देत आहे. संस्थेतील कार्यकर्त्यांनी, भगिनींनी स्वहस्ते पदार्थ केल्याने त्यांना घरगुती चव आहे. त्यामुळे केंद्रातील खाद्यपदार्थांना सतत मागणी आहे. इतर रूचकर पदार्थांसोबतच अनारसे, विविध भाजण्या, विविध फराळाचे पदार्थ, पापडाचे विविध प्रकार, तिखट, हळद, मसाले, शेवया, फुलवाती, खास हळदीपासून तयार केलेले कुंकूम यांना शहरात भरपूर मागणी आहे. मंगला सौंदाणकर, शोभना कुलकर्णी, ज्योती देशमुख आणि सुशीला कुलकर्णी यांनी जिजामाता उद्योगकेंद्राची इथ्यंभूत माहिती दिली. त्याचप्रमाणे इथे तृप्ती भाजीपोळी केंद्रही आहे.
 

 
कै. इंदुमती गायधनी अन्नदान योजना - यानुसार वर्षाच्या ३६५ दिवशी शासकीय रुग्णालयात अन्नदान केले जाते. तसेच टी.बी. सॅनिटोरियममध्ये फळवाटप केले जाते. शहराजवळील वनवासी पाड्यातील कुपोषित बालकांना सकस अन्न उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातात.
 
कै. जान्हवी मोडक रुग्ण उपयोगी साहित्य सेवा-संस्थेत १५ प्रकारचे रुग्णोपयोगी साहित्य आहे, यात कुबड्या, वॉकर, व्हीलवॉकर, व्हीलकमोड चेअर, फाऊलर बेड, एअर बेड, कमोड चेअर, टॅ्रक्शन युनिट, युरिन पॉट वगैरे आहे. गरजूंना हे साहित्य वापरण्यासाठी देण्यात येते.
 
कै. शांताताई आठल्ये वैद्यकीय मदत योजना-यानुसार गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक तसेच सर्वतोपरी मदत केली जाते. शैक्षणिक मदत योजना-शिकण्याची इच्छा आहे, परंतु परिस्थितीमुळे शिकू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध केली जाते.
 
सरस्वती भजन वर्ग- संस्थेतर्फे दर गुरुवारी भजनवर्ग घेतला जातो. रजनी जोशी हा वर्ग घेतात. नाशिक शहरातील बहुतेक महिला भजनी मंडळाच्या सहभागी महिलांनी या वर्गाचा लाभ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या सहकार्याने संस्थेच्या परिसरात  अन्य उपक्रमही चालतात. उदा. कुटुंब सुसंवाद केंद्र, संस्कृत संभाषण केंद्र, पौरोहित्य वर्ग, भारतीय स्त्री शक्ती वगैरे..संस्थेच्या अशा कार्यक्रमांमुळे गेल्या ५३ वर्षात सामाजिकतेची जाणीव निर्माण करणारी, चारित्र्य व संस्कार करणारी संस्था असा संस्थेचा नावलौकिक झाला आहे.
 
 
पुढे मंगल सौंदाणकर म्हणाल्या,’’इतकेच नाही तर बालिका, तरुणी व प्रौढ महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिरांचेही आयोजन संस्थेतर्फे केले जाते. तरुणींमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, त्यांच्यातल्या नेतृत्व आणि कर्तृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात राबविल्या जातात.’’ 
 
 
या सर्व उपक्रमांसाठी लागणारा खर्च कसा उभा केला जातो?
 
यावर विद्याताई म्हणाल्या, ’’संस्था या खर्चासाठी निधी उभा करते. नाशिक शहराची ही नामांकित संस्था आहे. आम्ही आवाहन करतो की, संस्थेमध्ये वनवासी मुलींना विनामूल्य राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक मदत करू शकता. तुम्हाला एखादी कला येत असेल तर तुम्ही ती कला संस्थेमध्ये येणार्‍या इतर व्यक्तींना शिकवू शकता. आपल्या इथे उद्योग मंदिर आहे. या उद्योग मंदिरासाठी वेळ देऊ शकता. स्मारक समितीच्या कामात सक्रिय सहभाग देऊ शकता. शैक्षणिक, वैद्यकीय, अन्नदान तसेच नूतन वसतिगृहासाठी आर्थिक साहाय्य करू शकता. त्यानुसार आमच्या उपक्रमाला कधीही आर्थिक अडथळा निर्माण होत नाही.’’
 
राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीला, त्या अनुषंगाने राणी भवनला भेटणे, हा एक शब्दातीत अनुभव आहेच पण त्याहीपेक्षा विलक्षण अनुभव आहे तो या संस्थेच्या महिला पदाधिकार्‍यांना भेटणे होय. कुठलेही अवडंबर न माजवता, प्रसिद्धीच्या पाठी न जाता या महिला पदाधिकारी निःस्वार्थीपणे संस्थेसाठी वर्षोनुवर्ष आत्मिक समाधानाने काम करत आहेत. छे! काम करीत आहेत, असे म्हणणे म्हणजे या पदाधिकारी महिलांच्या समाजकल्याण, राष्ट्रप्रेमाच्या भावनेवर अन्याय करणे होईल. इतक्या या पदाधिकारी भगिनी संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, समाजकल्याणात कार्यरत आहेत. त्यांच्या समर्पित संस्थेला आणि कार्याला अभिवादन..!
 
 
 
महाराष्ट्राची धर्मभूमी आणि आधुनिक स्मार्ट शहराचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून नाशिक शहर नकाशावर वेगाने दीप्तीमान होत आहे. नाशिक शहराच्या देदीप्यमानतेला वेगळे तेज मिळवून वेगळे आयाम मिळवून देणारी एक संस्था म्हणून स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती आणि समितीची राणी भवन वास्तू.  एक अत्यंत शांत पवित्र आणि तितकीच लोकाभिमुख खंबीर संस्था  म्हणून या संस्थेचा आणि राणी भवन वास्तूचा परिचय देता येईल.
 
 
वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर या स्वातंत्र्यलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या संस्थापिका आणि प्रथम अध्यक्ष होत. आता स्मारक समितीच्या अध्यक्षा मा. शांतक्का आहेत. उपाध्यक्षा मंगला सौंदाणकर, शुभांगी कुलकर्णी तर चिटणीस विद्या चिपळूणकर, सुमित्रा गायधनी आहेत. सुलभा लिमये या खजिनदार आहेत, सहखजिनदार भाग्यश्री पाटील आहेत. निशिगंधा मोगल आणि चित्रा जोशी सदस्य आहेत.
 
- योगिता साळवी