कोपर्डी खटल्याची अंतिम सुनावणी २९ नोव्हेंबरला
 महा एमटीबी  22-Nov-2017

दोषींना फाशीच देण्याची विशेष सरकारी वकिलांची मागणी


 

अहमदनगर : कोपर्डी हत्याकांडातील तिन्ही आरोपींना दोषी ठरवल्यानंतर या घटनेवरील अंतिम निर्णय येत्या २९ तारखेला देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज स्पष्ट केले आहे. या तिन्ही आरोपींनी अत्यंत अमानुष असे कृत्य केले असून त्यासाठी या सर्वांना जन्मठेपेऐवजी फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम त्यांनी केली आहे. त्यामुळे येत्या २९ तारखेला न्यायालय यावर कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

सरकारी वकील निकम यांनी आज यासंदर्भात बाजू मांडताना आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी १३ कारणे दिली. कोपर्डीतील बलात्कार व हत्या हे अत्यंत निंदनीय आणि अमानुष कृत्य असल्याचे त्यांनी सांगितले. गुन्हा करताना हे सर्व आरोपी प्रौढ होते त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर ते अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करणार नाहीत, याची शाश्वती देता येऊ शकत नाही असे ते म्हणाले.

 

गेल्या १८ तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने कोपर्डी घटनेतील तिन्ही आरोपी असलेले जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना या घटनेत दोषी ठरवले होते. तसेच कठोर शिक्षा देण्यासंबंधी मत प्रदर्शित केले होते. त्यामुळे या तिघांना मृत्यदंड देण्यात येऊ नये, यासाठी तिन्ही गुन्हेगारांच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपला युक्तिवाद मांडला होता. तसेच बचावाचा अधिकार सर्वांनाच असून निकालावर कोणत्याही प्रकारचा सामाजिक दबाव असू नये, असे मत आरोपीच्या वकिलाने मांडला होता. त्यामुळे या संबंधी अंतिम निकाल २९ तारखेला देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.