प्रार्थना कशासाठी?
 महा एमटीबी  21-Nov-2017आपण अनेक संकल्पना आपल्या सोयीनुसार वापरत असतो. त्यांचा अर्थही आपल्या सोयीने लावत असतो... मुळात माणसाने जे काही निर्माण केले आहे ते त्याने त्याच्या सोयीसाठीच निर्माण केलेय् अन् गरज असेल तसे ते, त्याच्या तो उपयोगी पडावे यासाठी वाकवीत असतो. हे वाकविणे अर्थाच्या बाजूने असते, संकल्पना म्हणून असते... ही चलाखी माणूस त्याच्याही नकळत करीत असतो आणि त्याला तो नैतिकतेचे नाव देतो. हे खरेतर भंपक आहे, खोटारडेपणा आहे, पण माणूस ते करत असतो. ईश्वर त्याने निर्माण केला अन् मग युगानुयुगे तो त्याला हवा तसा ईश्वर घडवीत राहिला. आता ईश्वर त्यानेच निर्माण केला असल्याने त्याची पूजा कशी करायची, तो काय खातो, कसा वागतो, त्याचा पेहराव काय, कसा दिसतो तो आणि मग त्याला प्रसन्न करण्यासाठी काय काय केले पाहिजे, हेदेखील माणसानेच माणसांना सांगितले. ज्या वर्तमानात माणूस असेल अन् तिथे जे वातावरण आणि त्याच्या गरजा असतील त्यानुसार या सार्‍यांत बदल करण्यात आले... माणसाने मग भगवंताला अपौरुषेय ठरविले. त्यातच देवाची प्रार्थनाही आली.


प्रार्थना कशासाठी करायची? प्रार्थना म्हणजे स्तुती आहे का? बरे, ती का करायची? आपल्याला कुण्या बड्या व्यक्तीकडे काम असले की आपण त्याची तारीफ करतो. तुम्हीच आमचे तारणहार आहात, आज मी जे काय आहे ते तुमच्यामुळेच आहे अन् पुढेही मी जे काय असेन, असू शकतो त्यासाठी तुमचेच आशीर्वाद हवे आहेत... अशी त्याची तारीफ केली, त्याला हलका हलका केला की मग आपण आपली मागणी त्याच्यासमोर सादर करत असतो. ‘हे इतके काम झाले, कंत्राट मिळाले, बढती मिळाली, नोकरी मिळाली... की बरे होईल... बाकी काहीच नको.’ असा आपला समारोप असतो. हव्या त्या कागदावर त्या व्यक्तीची सही मिळाली की आपण कसे कृतकृत्य झालेलो असतो... देवाकडेही आपण नेमके हेच करत नसतो का? ‘तूच सारे काही आहेस, तू जगनियंता आहेस’, ‘तूच तारक, तूच मारक’ अशी त्याची स्तुती करतो. मग पुत्रपौत्र, धन-धान्य, सुख-समाधान असे सारे काही मागत असतो. आपण तर मोक्ष मागतो, स्वर्ग मागतो, पाप आपण करतो आणि पापक्षालन त्याने करावे, अशी याचना करतो. ही लाच देणे नाही का? हा भ्रष्टाचार नाही का?


प्रार्थना त्याच्यासाठी नसते. प्रार्थना म्हणजे याचना नव्हे, मागणीही नव्हे अन् काही मागण्यासाठी सुखावण्यासाठी केलेली स्तुतीही नव्हे! प्रार्थना मागण्यासाठी नव्हे, देण्यासाठीच केली जाते. आपण मात्र प्रार्थना म्हणजे मागणी समजतो. ‘मी क्षमाप्रार्थी आहे.’, ‘आपल्या चरणाशी माझी ही प्रार्थना आहे.’ असे आपण बोलत असतो. प्रार्थना म्हणजे परा अर्थना... प्रार्थनेत मागायचेच असेल तर ते स्वत:साठी नाही, जगासाठी, दुसर्‍यांसाठी. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे...’ अन् अशी प्रार्थना करण्याचा अधिकारही मिळवावा लागत असतो. सहजच कुणालाही प्रार्थना करता येत नाही. नाहीतर कुणीही प्रार्थना केली असती अन् कुठेही केली असती. शाळेत, आश्रमातच प्रार्थना केली जाते. आश्रम म्हणजे आत्मिक श्रम करण्याची जागा. नव्या जगात त्याची शाळा झाली. तिथे प्रार्थना केली जाते. बाजारात दुकानदार व्यवसाय सुरू करण्याआधी एकत्र जमून प्रार्थना नाही करत... कार्यालयांमध्ये कामाला लागण्याआधी सामूहिक प्रार्थना होत नाही. कारण तिथला कर्मयोग निष्काम नसतो. काही हवे असते. फायद्यासाठी लेन-देन असते. शाळेत जे काय मला मिळते आहे ते समाजासाठी, राष्ट्रासाठी उपयोगी पडू दे, ही प्रार्थना आहे. तो अधिकार विद्यार्थ्यांनी मिळविला असतो. ज्ञानाने आपले ज्ञानाधिष्ठित कर्तव्य पूर्ण केल्यावर त्याला प्रार्थनेचा अधिकार मिळत असतो. तशा प्रार्थनेचे पसायदान होते. ते निवृत्तीकडेच मागायचे असते, कारण प्रवृत्ती ही स्वत:साठी मागण्याच्या बुद्धीची असते. म्हणून ज्ञानदेवांनी गीतेवर भावार्थदीपिका सिद्ध केल्यावर मग निवृत्तिनाथांकडे प्रार्थना केली... ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रति वाढो, भुता परस्परे जडों, मैत्र जीवांचे...’ दुष्टांचे निर्दालन कर, असे म्हटलेले नाही. त्यांची दुष्ट प्रवृत्ती, खलवृत्ती संपू दे, असेच मागितले आहे. हा भावच मुळात प्रार्थना करण्याचा अधिकार मिळवून देत असतो. विश्वाचे आर्त तुमच्या प्रार्थनेत उमटले की, मग निवृत्ती सुखावत असते आणि मग ‘अरे अरे ज्ञाना झालासे पावन’ अशी पावती देत असते. ज्ञाना आणि निवृत्ती ही बंधूंची म्हणजे भावांची नावे आहेत. श्लेषार्थाने ही नावे आली आहेत. ज्ञानाने त्याचे ज्ञानाधिष्ठित कर्तव्य पूर्ण केल्यावर निवृत्तीकडेच प्रार्थना करायची असते. त्यासाठी तुम्ही पूर्ण रिते झालेले असायला हवे. हे असे रिक्त होणे म्हणजे साधना. रिते होणे ही सहजसाध्य बाब नाही. जन्मापासून अन् त्याही आधीपासून तुम्ही तुमच्यात काय काय भरून घेतलेले असते. नातीगोती, धर्म-जात, गोतावळ्यांचा गुंता तुम्हाला जन्मापासूनच चिकटला असतो, त्यातले राग-लोभ, वासना, मोह असे सारेच काही तुम्ही भरून घेतलेले असते. त्यातून ज्ञानाने निवृत्ती करायची असते. रिक्त व्हायचे असते तेव्हाच नवे काही भरले जाईल. गाभार्‍यात आधीच तुम्ही तुम्हाला हवी तशी भगवंताची दगडाची मूर्ती बसवून ठेवल्यावर तिथे भगवंत येईल कसा? देवळात देव असावा, असे तुम्हाला वाटते, तुम्ही असे खच्चून भरले असता, त्यात देवाला जागाच नसते. तुमच्या देहातच देव नाही तर विटा-मातीच्या देवळात तो कसा असेल? तुम्ही आधी रिकामे व्हा, मग तुम्हाला प्रार्थना करण्याचा अधिकार येईल. भांडं रिकामं असेल तर त्यात दूध, पाणी, ताक, अमृत... जे काय भरायचे असेल ते भरू शकाल. तुम्ही रिक्त झालात कीच मग तुमचे आभाळ होऊ शकते. आभाळ नेहमी रिक्त असते. मेघ दाटून आले की पाऊस पडून जातो, पुन्हा आभाळ रिक्तच! असे रिक्त झालात की तुम्हाला प्रार्थनेचा अधिकार येतो आणि मग तुमच्या प्रार्थनेचे पसायदान होते... जगाच्या कल्याणासाठी मागितलेले!

- श्याम पेठकर