वेदांमधले ज्ञान-विज्ञान – वारसा आजही उपयोगी की कालबाह्य ?
 महा एमटीबी  21-Nov-2017


 

वैदिक काळातली विमाने, गोमुत्राच्या उपचारांनी कँन्सर बरा होणे, गणपतीसाठीची प्लॅस्टिक सर्जरी नव्हे तर डोक्याचे प्रत्यारोपण अशा दाव्यांची व त्यावरील प्रतिवादाची सध्या चलती आहे. त्याही पलीकडे जात राम-कृष्ण प्रत्यक्षात होऊन गेले की रामायण-भागवत-महाभारत-भगवदगीता हे केवळ काल्पनिक ग्रंथ आहेत याबद्दलही चर्चा चालते. महाभारत काळात किरणोत्सारी अस्त्रे वापरात होती; या दाव्याच्या समर्थनार्थ आजच्या कुरूक्षेत्र भागामधील मातीमध्ये आजही किरणोत्साराचा अंश सापडतो आणि त्या आधारावर कुरूक्षेत्रावरील लढाई केव्हा झाली असावी याचा अंदाज बांधता येतो असेही सांगितले जाते. याशिवाय दशावतार, यज्ञ, यांसारखे कितीतरी इतर मुद्दे मधूनमधून चर्चेत असतात.

 

वरील उदाहरणे उद्धृत करण्याचे कारण असे यापैकी अनेक विषय वारंवार चर्चेत येत असतात; मात्र ते विषय अतिशय अशास्त्रीय पद्धतीने हाताळले जात असल्यामुळे त्या चर्चेतून कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचता येत नाही; ना त्यातून काही निष्पन्न होते. त्यानंतर पुन्हा कोणत्या तरी निमित्ताने या विषयांना वाचा फुटते आणि पुन्हा तेच निरर्थकपणाचे चक्र चालू होते.

 

दशावतारांसारख्या संकल्पनेचे उदाहरण घ्यायचे तर त्याला पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा आधार आहे असे सांगितले जाते. मात्र पृथ्वीच्या निर्मितीनंतर येथे सजीव निर्माण झाल्यापासूनच्या काळाचा व विविध अवतारांमधील कालावधीचा हिशोब लावायचा झाला, आणि तो सतयुग-त्रेतायुग वगैरे युगांच्या कालावधीशी पडताळून पहायचा झाला, तर तो अर्थातच जुळत नाही. तेव्हा या दशावतार संकल्पनेला आधार काय, मुळात हे अवतार कोणी ठरवले, एखादी व्यक्ती (त्या काळात) सार्‍या पृथ्वीला नकोशी होईल तिचा संहार करण्यासाठी केवळ एका ‘अवतारा’ची योजना करणे कितपत तर्काला धरून आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. हे झाले दशावतारांचे. मुळात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे समजले तर मग जीवांची उत्क्रांती ही अगदी छोट्यात छोट्या अमीबासारख्या जीवापासून विविध जीव निर्माण होण्यापासून झाली या आता उपलब्ध असलेल्या सिद्धांताचे काय करायचे, असे प्रश्न अनुत्तरीत करताना दिसतात.

 

यज्ञ ही आणखी एक संकल्पना. ही नेहमीच टीकेचे लक्ष्य होताना दिसते. यज्ञामुळे आसपासच्या हवेचे शुद्धीकरण कसे होते हे दाखवणार्‍या रासायनिक अभिक्रिया दाखवल्या जातात. त्यातून कार्बन डायऑक्साइड व पाण्याच्या रेणूचे रूपांतर फॉर्मल्डिहाइड आणि ऑक्सिजनचा रेणू यांच्यात होते हेही दाखवले जाऊ शकते. परंतु मग त्यामुळे ज्या कोणत्या हेतुने तो यज्ञ केला असेल, तो कसा साध्य होतो हे सांगितले जात नाही. कधी कधी पाऊस पडण्यासाठी यज्ञ तर कधी आणखी दुसर्‍या हेतुसाठी. यासाठी प्राण्यांना बळी दिले जात असे की नाही हादेखील चर्चेचा म्हणजे खरे तर वादाचा एक आवडता विषय असतो. याशिवाय सोमरस म्हणजे दारू की नाही, नसेल तर नक्की काय हादेखील अशाच एक विषय. मुळात यज्ञाच्या विविध प्रकारांचे स्वरूपच माहित नसेल तर त्यांना सध्याच्या काळात कोणता पर्याय आहे हे शोधता येणे ही तर फारच दूरची बाब झाली. त्यापेक्षा यज्ञाची पद्धत निरर्थक आहे असे म्हणणे अधिक सोपे पडते.

 

वैदिक काळातील विमाने हा आणखी एक अनेकांना रस असलेला मुद्दा. पुष्पक विमान किंवा असे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. त्यातला एक तर तुकारामांच्या वैकुंठाला जाण्याचा म्हणजे अगदी अलीकडचा. तो कपोलकल्पित म्हणून बाजूला ठेवुया. मात्र एकूणच अशी विमाने जर खरोखर कधीकाळी उडत असतील तरी त्याचे पूर्ण ज्ञान आज उपलब्ध नाही यावर सहमती होण्यास हरकत नसावी. त्यांचे आराखडे म्हणा किंवा इतर स्वरूपातील जी माहिती उपलब्ध आहे तिचे नक्की काय करता येईल? आजच्या विज्ञानाने व तंत्रज्ञानाने या क्षेत्रात किती प्रगती केलेली आहे आणि त्यापुढे आणखी काय करणे शक्य आहे हे पहायचे की यावर अगदी मुळापासून संशोधन करण्याची इच्छा ठेवायची? तेव्हा वैदिक विमानांचे खरे स्वरूप शोधण्याचा उद्देश मग यासंबंधीचे उल्लेख खरे होते का आणि आपले पूर्वज अशा पद्धतीने खरोखर ‘उडू’ शकत होते का हे पाहण्यापुरता मर्यादित राहतो अशे वाटते.

 

आणखी एक उदाहरण द्यायचे ते विद्युतघटाचे (सेल – बॅटरी). दोनएक वर्षांपुरती डेक्कन कॉलेजमध्ये भरवलेल्या एका प्रदर्शनामध्ये कुठल्याशा प्राचीन ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्याची निर्मिती करून दाखवली होती व त्यातून किती व्होल्ट विद्युतनिर्मिती होती हे सांगितले होते. या सार्‍या प्रात्यक्षिकांची गरज अशासाठी की कोणतीही दळणवळणाची साधने शोधायची, तर त्याला उर्जेची गरज भासते. आणि मग साहजिक उद्भवणारा प्रश्न म्हणजे त्याकाळी उर्जेचा स्रोत कोणता होता? मग ती उर्जा विविध अस्त्रांसाठी लागणारी असो, वा तेव्हा उपलब्ध असलेल्या विमानांसाठी लागणारी असो किंवा आणखी कशासाठी. तेव्हा या विद्युतघटाबद्दल बोलायचे तर या क्षेत्रातली प्रगती आता लिथियम आयन सेल वापरण्यापर्यंत गेलेली आहे. खरे तर त्यापुढचे संशोधनही आज चालू आहे. तेव्हा आपल्याकडे विद्युतघट बनवण्याची पद्धत माहित होती हे म्हणण्यापलीकडे आणखी काही उरते का?

 

गणपतीच्या संदर्भात माणसाच्या धडावर हत्तीचे शीर बसवणे शक्य आहे का यावरून टिंगल केली जाते. धार्मिक पातळीवर हे अगदी सर्वमान्य असते. मात्र ही चर्चा त्यापुढे जात हे प्रत्यक्षात कसे शक्य आहे का असे विचारले जाते. अगदी अलीकडे एका चिनी सर्जनने शेकडो उंदरांवर हेड ट्रान्सप्लांट यशस्वीपणे करून दाखवली आहेत. आणखी एका अमेरिकी संशोधकानेही असे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांचे पुढचे प्रयत्न हे प्रयोग माकडांवर आणि त्याहीपुढे अर्थातच माणसांवर करण्याचे असणार आहेत. तेव्हा अगदी गणपतीच्या स्वरूपातील शस्त्रक्रिया करणे भविष्यात शक्य होईल का हे आता सांगता यायचे नाही; मुळात तसे प्रयत्न का करावेत हा प्रश्न तर आणखी वेगळा; मात्र आजचे प्रयत्न भविष्यता म्हटले तर त्या दिशेने जाऊ शकतात हे लक्षात घेण्यास हरकत नसावी.

 

भारतीयांना पाश्चिमात्यांच्या मानसिक गुलामगिरीत व स्वत:बद्दलच्या न्यूनगंडाच्या गर्तेत ढकलण्याचा उद्योग मेकॉले याने केला असे सांगितले जाते; तद्वतच जर्मन तत्वज्ञ मॅक्समुल्लर याने वेदांचे केवळ ‘निसर्गाचे आख्यान’ असे सुलभीकरण करत त्यातील ज्ञान बाहेर येऊच दिले नाही असा आरोप केला जातो. त्यामुळे भारतीय शिक्षणपद्धतीत मॅक्समुल्लरचा जो आदराने उल्लेख पूर्वी केला जाई, तसा तो आता न केला जाता त्याच्याकडे अनादराने पाहिले जाते. दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदांनी मॅक्समुल्लरचे तोंड भरून कौतुक केलेले असल्याने त्याच्यावरील टीकेत काही दम नसल्याचे सांगितले जाते.

 

पूर्वी फक्त वेदांबद्दल बोलले जायचे. उपनिषदांमध्येही बरेच ज्ञान आहे असे आता अनेकांसाठी नव्याने स्पष्ट होत आहे. अनेकांना उपनिषदे हा काय प्रकार आहे हेच माहित नसते. याखेरीज विविध पुराणेही आहेत. यातील सारे ज्ञान संस्कृतमधून भारतीय भाषांमध्ये आणून त्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वा तथ्ये शोधणे हे मोठेच आव्हान आहे. मात्र परिस्थिती अशी आहे की आज जे संस्कृततज्ज्ञ आहेत त्यांना जीव-भौतिक-रसायन असा विविध शास्त्रांचा फारसा गंध नाही. त्यामुळे विविधग्रंथांमध्ये आढळणार्‍या विविध संकल्पनांचे वैज्ञानिक परिभाषेत वर्णन करणे त्यांना जमत नाही. दुसरीकडे काही शास्त्रज्ञांची यातील ज्ञान पडताळून पाहण्याची इच्छा असली तरी त्यांना त्यांच्या वयामध्ये संस्कृतमध्ये पारंगत होऊन ते करता येणे हे फार कठिण होते. शिवाय अनेकदा मूळ वर्णन हे कूटभाषेत असण्याचा संभवही असतो. तेव्हा हे सारे अनुवादात किंवा भाषांतरापेक्षा ज्ञानांतरामध्ये हरवून जाण्याची दाट शक्यता असते.

 

आज इतिहासाचा शोध घ्यायचा तर त्यासंबंधीची ऐतिहासिक कागदपत्रे ज्या-ज्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत त्या भाषेचे ज्ञान, तात्कालिक परिस्थिती, शब्दांचे तात्कालिक अर्थ हे सारे संदर्भ माहित असावे लागतात. साधे मोडी लिपी वाचू शकणारे आज फारसे तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. त्यातही फारसीचा प्रभाव असलेली मोडी, तमीळचा प्रभाव असलेली मोडी यामुळे किती क्लिष्टता येऊ शकत असेल याची कल्पनाच केलेली बरी. या सार्‍यांमुळे पेशव्यांच्या दफ्तरात म्हणा किंवा तंजावरच्या सरस्वती ग्रंथालयात; अक्षरश: लाखो दस्तैवज अक्षरश: धूळ खात पडलेले आहेत हे वास्तव आहे. याला कारण म्हणजे त्यासाठी आवश्यक त्या मनुष्यबळाची कमतरता. तेव्हा संस्कृतमध्ये उपलब्ध असलेल्या ठेव्याचे वस्तुनिष्ठ रूपांतरण करणे हे किती मोठे आव्हान आहे याची कल्पना यावी.

 

देशाच्या राज्यघटनेतील विविध तरतुदींबद्दल बर्‍याचदा तावातावाने बोलले जाताना दिसते. मात्र राज्यघटना किती जणांनी वाचलेली असते? वेद-उपनिषदांच्याबाबतीतही तसेच होताना दिसते. ज्यांनी काही वाचलेले नाही त्यांच्यापैकी काही जण अनेक दाव्यांची टिंगल उडवताना दिसतात तर काही जण त्यांचे समर्थन करताना दिसतात. अशी गंमत आहे. प्रत्यक्षात कोणीच हे मुळापासून स्वत: वाचलेले असण्याची बहुतेक वेळा शक्यताच नसते.

 

तेव्हा प्रश्न खूप आहेत, उत्तरे देऊ शकणारे फारच दुर्मिळ. पण त्याचबरोबर केवळ प्रश्न विचारायला फारसे कष्ट पडत नाहीत. स्वत: कष्ट घेऊन उत्तरे शोधणारे किती आहेत? असा एकूण सारा मामला आहे.

 

यात आणखी एक मुद्दा असा आहे की जगात आपलीच अशी एकमेव संस्कृती नाही. अनेक आहेत. त्यांच्यापैकी किती संस्कृतींमध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वारशासारखा लिखित वा मौखिक स्वरूपाचा वारसा आहे? कित्येक राजकीय, सामरिक व सांस्कृतिक आक्रमणांनंतरही हा वारसा आपल्याकडे टिकून आहे. तेव्हा हे सारे ज्ञान फार जुने आहे म्हणून सारेच कालबाह्य असणार, असे समजायचे की या जुन्यामधले आजही कोणते सोने आहे हे शोधून काढण्याचा ध्यास घ्यायचा? याची दुसरी बाजू अशी की यातील ज्ञान हे हजारो वर्षांच्या संशोधनातून आलेले आणि अनुभवातून आलेले असे आहे. केवळ ते समजून घेण्याची आपल्यापैकी अनेकांची इच्छा किंवा क्षमता नाही, म्हणून ते भंगारात काढणे हे योग्य आहे का?

 

आपल्याला मिळालेला वेदोपनिषदांचा वारसा निश्चितपणे दैदीप्यमान आहे. अर्थात याची दुसरी बाजू म्हणजे आपण त्यातच घुटमळायचे, रमायचे असा नाही. दुसरीकडे त्याचा आजच्या जगाशी काही संबंध आहे का हे पहायचेच नाही असाही याचा अर्थ अजिबात नाही.

 

यासंबंधीची आणखी उदाहरणे व आणखी मुद्दे आपण पुढील भागात पाहू.

 

- राजेश कुलकर्णी