साबास बेटा...!
 महा एमटीबी  20-Nov-2017


 

हरियाणा हे राज्य पूर्वी स्त्री-भ्रूण हत्येसाठी कुप्रसिद्ध होते. हे कमी की काय म्हणून ऑनर किलिंगच्या बातम्यांसाठी हे राज्य अजूनच कुप्रसिद्धीच्या छायेत गेले, पण गेल्या काही वर्षात हरियाणात स्त्री जन्मदर वाढल्याचे सरकारी आकड्यांत दिसले, हरियाणातील आयएएस अधिकारी शीना अगरवाल, आयपीएस अधिकारी भारती अरोरा, माहिती-तंत्रज्ञानातील हरजिंदर कौर, क्रीडा क्षेत्रात फोगट बहिणी, सायना नेहवाल, साक्षी मलिक, ममता खारब, संतोष यादव, साहित्यक्षेत्रात प्रीती सिंग व राजकारणात सुषमा स्वराज यांनी आपल्या राज्याचे नाव उंचावले आहे. आता यात मानुषी छिल्लर हिने ’मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकून भारताच्या आणि हरियाणाच्या मानात यशाचा तुरा खोवला आहे. मानुषीचा जन्म १४ मे १९९७ चा. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील भगत फूल सिंग या महाविद्यालयात ती वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहे. तिची आई एका शैक्षणिक संस्थेत न्युरोकेमिस्ट्रीच्या विभागप्रमुख आहे तर तिचे वडील डीआरडीओ या संस्थेत वैज्ञानिक पदावर आहेत. मानुषीने शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले असून तिला साहसी खेळांची आवड आहे. मिस वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जेव्हा तिने चीनमध्ये प्रस्थान केले तेव्हा तिचे शब्द होते, “मला मिळालेले संस्कार आणि देशाने केलेले त्याग माझ्यासोबत मी घेऊन जात आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करेन, असे मी वचन देते.’’ मिस वर्ल्ड जिंकण्यापूर्वी तिने ‘मिस इंडिया’ हा किताब जिंकला. हा किताब जिंकल्यानंतर तिने आपला मोर्चा वळवला मुलींच्या मासिक पाळीच्या विषयाकडे. भारतासारख्या देशात अजूनही काही ठिकाणी याविषयी बोलणे टाळले जाते. पण मानुषीने यासाठी ‘प्रोजेक्ट शक्ती’ या अभियानाला हातभार लावला. २० गावांना भेटून तिने तब्बल ५ हजार स्त्रियामंध्ये सॅनिटरी पॅडबद्दल जनजागृती केली. परी नावाची संस्था ही या सॅनिटरी पॅडची निर्मिती करते आणि वॉलमार्टचे हे उत्पादन ग्रामीण भागात महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी मानुषीने हातभार लावला. मासिक पाळीबद्दल तिने वेळोवेळी आपले मत व्यक्त केले. “निरोगी मुले सक्षम देश घडवू शकतात. मासिक पाळीसारखा विषय आजही आपल्याकडे वर्ज्य मानला जातो, त्याचा परिणाम मुलींच्या जडणघडणीवर होतो. या गोष्टीवर प्रभावी काम करणे गरजेचे आहे,’’ असे तिचे म्हणणे आहे. ’प्रोजेक्ट शक्ती’च्या माध्यमातून तिने हे कार्य केले. याही पलीकडे तिला तू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? असे विचारल्यानंतर मानुषी म्हणाली की, “मिस इंडिया झाल्यानंतर बॉलिवूड हे एकमेव क्षेत्र नाही. आपल्याला वाटेल त्या क्षेत्रात कार्य करावे,’’ असे तिचे मत होते. तिच्या याच मतांमुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. सर्वोकृष्ट विचार तिने मिस वर्ल्डच्या स्पर्धेत मांडले. कुठल्या पेशाला सर्वाधिक पगार दिला पाहिजे आणि का ? असा प्रश्न मानुषीला केला गेला. त्यावर मानुषी म्हणाली , “आईला सर्वात जास्त सन्मान मिळायला हवा आणि तो फक्त आर्थिक स्वरूपात नाही तर प्रेम आणि आदराच्या स्वरूपात असावा. माझी आई माझ्यासाठी मोठी प्रेरणास्थान आहे, आई सर्वाधिक सन्मानासाठी पात्र आहे.’’

 

खरंतर १७ वर्षानंतर देशाला ’मिस वर्ल्ड’चा किताब मिळाला, ही इतिहासाची पुनरावृत्ती म्हणावी लागेल. परंतु हरियाणासारख्या राज्यातून आलेली मानुषी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड सारखे किताब जिंकली, याला नवे आयाम प्राप्त झाले आहे. भारतासारख्या देशात पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले गेले. पण आधुनिक काळात स्त्रियांच्या प्रश्नांसाठी प्रबोधनात्मक चळवळी उभारल्या गेल्या आणि स्त्रिया स्वतः च्या पायावर उभ्या रहिल्या. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिने आपले नाव कमावले पण आजही स्त्रियांना काही ठिकाणी तशीच वागणूक दिली जाते. ‘दंगल’ चित्रपटाच्या उत्तरार्धात नायिका आपल्या बापाला अंतिम सामन्याविषयी विचारते, “पुढची स्ट्रॅटेजी काय ?’’  तेव्हा तिचा बाप लाखमोलाचे शब्द उच्चारतो. तो म्हणतो की ’’उद्याची लढाई ही फक्त तुझ्या प्रतिस्पर्ध्याबरोबर नसून अशा लोकांबरोबर आहे जे लोकसमजतात की मुली फक्त घरकामासाठी असतात, लग्न हेच त्यांचे आयुष्य असते. जर तू जिंकलीस तर अशा असंख्य मुली जिंकतील ज्या या विचाराने भरडल्या गेल्या आहेत, तुझा विजय त्यांचा विजय असेल.’’ शेवटी नायिका अंतिम स्पर्धेत जिंकते आणि बाप नायिकेला म्हणतो, “साबास बेटा!’’ आज मानुषी जिंकली, असे असंख्य बाप मनोमन तिची पाठ थोपटत म्हणत असतील, “साबास!’’

 

- तुषार ओव्हाळ