अशी पाखरे येती ...
 महा एमटीबी  20-Nov-2017‘हसा खेळा पण शिस्त पाळा’ अशीच सगळ्यांच्या जीवनात शाळेची भूमिका असते. शाळेत मिळालेल्या शिक्षणाचं, संस्काराचं प्रतिबिंब आज आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या आवारात बघायला मिळालं. आपल्या शाळा-कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींच्या सोबत घालवलेल्या क्षणांना उजाळा देण्यासाठी, आपल्या गुरुजनांना भेटण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा-महाविद्यालयातले विद्यार्थी कर्वे रस्त्यावरच्या गरवारे महाविद्यालयात जमा झाले होते. निमित्त होते ‘मएसो’च्या १५८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे.


या स्नेहीजनांमध्ये कोण नव्हते. कला, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या माजी विद्यार्थ्यांची मांदियाळीच आज आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर जमली होती. त्यांच्या सहज वावरानं या स्नेहमेळाव्याला आनंदाचं जणू उधाणच आलं होतं. ऋषितुल्य प्रा. डॉ. प्र.ल. गावडे सर वयाच्या ९४ व्या वर्षी अंथरुणावरून न उठण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला बाजूला ठेऊन आपल्या या सुहृदांना भेटण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजण आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यासमोर अक्षरशः नतमस्तक झाले. गीत-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी माजी विद्यार्थ्यांना बोलतं करताना आपल्या जुन्या आठवणीत हरवून जात होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योति चांदेकरांना आपल्या शाळेबद्दल भरभरून बोलताना पाहण्याचा दुर्मिळ क्षण अनेकांनी अनुभवला. मधुरा दातारच्या जय शारदे वागेश्वरी... या गोड आवाजातील चार ओळी मंत्रमुग्द्ध करून गेल्या. अशा अनेक क्षणांचे साक्षी होण्याची संधी या स्नेहमेळाव्यानं उपस्थितांना मिळाली. या सोहळ्यात प्रत्यक्षपणे सहभागी होण्याची संधी ज्यांना मिळणार नव्हती अशा देशविदेशात राहणारे माजी विद्यार्थी ‘स्काईप’च्या माध्यमातून आपल्या वर्गमित्रांना, आपल्या सरांना, आपल्या बाईंना भेटले. जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी मनाच्या कुपीत असलेलं शाळेचं स्थान अबाधित असल्याचं प्रत्येकाच्याच बोलण्यातून दिसत होतं.


आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात संस्थेच्या प्रत्येक शाखेचा स्टॉल उभारण्यात आला होता. आपल्या शाळेच्या स्टॉलला भेट देऊन प्रत्येकजण आपल्या शाळेच्या प्रगतीची माहिती घेत होता आणि आपल्या शाळेला मनोमन प्रणाम करत होता. या आनंदोत्सवाला वयाची मर्यादा अजिबात नव्हती. वर्षा-दोन वर्षापूर्वी कॉलेजातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांपासून कोणाचातरी आधार घेत आपल्या विद्यार्थी दशेतल्या स्मृतिंना उजाळा देण्यासाठी येणाऱ्या वयोवृद्धांपर्यंत तितक्याच उत्साहानं या सोहळ्यात सहभागी झाले होते. वयान थकलो असलो तरी शाळा-कॉलेजातल्या वयात जगण्याची जी लय सापडली ती मात्र आजही कायम आहे असंच त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मितहास्याचं सांगणं होतं.


शाळा-कॉलेजातले आनंदाचे, प्रेमाचे, आपुलकीचे, आनंदाचे ते क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी आलेले हे माजी विद्यार्थी आपल्या मनात आजच्या स्मृती साठवूनच बाहेर पडत होती.