विश्वसुंदरी मानुषी!
 महा एमटीबी  20-Nov-2017
भारताची आणि त्यातल्या त्यात हरयाणाची मुलगी, मानुषी छिल्लर हिने विश्वसुंदरी किताब जिंकल्यावर, समस्त भारतीयांना हर्षवायू झाला आहे. का नाही होणार? २००० साली प्रियांका चोप्राने हा किताब जिंकला. पण त्यानंतर भारत जणूकाही सुंदरीविहीन झाला होता! भारतातील सुंदर्‍यांचे उत्पादन थांबले की काय, म्हणून पेज-थ्रीचे पत्रकार व ज्यांना दररोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत नाही, असे मध्यमवर्गीय प्रचंड अस्वस्थ होते. मानुषीने या लोकांची अस्वस्थता संपविली आहे. हे फार चांगले झाले. आता भारतातील समस्त महिला सशक्त झाल्यात, असे मानायला हरकत नाही. पुरुषांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात एखाद्या महिलेने दमदार पाऊल टाकले की, स्त्रियांची कड घेऊन लढणार्‍या सर्व कर्कश संघटना, आता महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, अशी आरोळी ठोकतात. परंतु, विश्वसौंदर्याचे हे असे क्षेत्र आहे की, यात पुरुषांचे प्राबल्य तर सोडाच, पण नावालादेखील पुरुष नसतात. त्यामुळे या क्षेत्रात एखाद्या भारतीय महिलेने प्रथम स्थान पटकाविले, तर त्याचे एवढे कौतुक का होते, हे कळायला मार्ग नाही. असो.


या विश्वसुंदरी स्पर्धेत विजयी होण्याची खरी गोम, प्रत्यक्ष मुलाखतीत जे प्रश्न विचारतात, त्याला मिळणार्‍या उत्तरांमध्ये आहे म्हणतात. कुठले उत्तर अधिक ‘सौंदर्यवान’ असेल, हे परीक्षक ठरवितात (की त्यांना ठरवून दिले असते?). विश्वसुंदरीच्या स्पर्धेत स्त्रीचे सौंदर्य तेवढे बघायला हवे. त्यांची जी काही सौंदर्याची मापे असतील, त्यात एखादी स्त्री व्यवस्थित बसत असेल, तिला विश्वसुंदरी म्हणून किताब देण्याची प्रथा असती, तर ती अधिक योग्य ठरली असती. परंतु, आयोजक चलाख आहेत. त्यांनी मुलाखतीतील प्रश्नोत्तरावर अंतिम निर्णय ठेवला. यात कुणा नाराजाला उजर करण्याची संधी राहात नाही. आम्हाला हे उत्तर अधिक योग्य वाटले म्हणून आम्ही अमुक व्यक्तीला निवडले, असे साळसूदपणे सांगण्याची सोय असते. दुसरे असे की, एवढा मोठा खर्चीक सोहळा आयोजित करण्यासाठी लागणारा प्रचंड पैसा, सौंदर्यप्रसाधने निर्माण करणार्‍या कंपन्या देतात, असे समजले. असेही ऐकिवात आहे की, ज्या देशात सौंदर्यप्रसाधने वापरण्याबाबत महिलावर्गात ‘जागृती’ नाही, अशा देशांमधली स्पर्धक, सुंदरी म्हणून निवडण्यात येते. सोप्या शब्दांत, कंपन्या ठरवितात कोण सुंदरी बनेल. यात तथ्य असेल किंवा नसेलही. १६ वर्षांपूर्वी भारताच्या तीन की चार स्त्रिया विश्वसुंदरी बनल्या होत्या. त्यानंतर भारतात सौंदर्यप्रसाधनांचा खप किती टक्के वाढला, याचा तुलनात्मक अभ्यास समोर आला, तरच या आरोपाची सत्यासत्यता पडताळून पाहता येईल. तोपर्यंत हे असे आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार. ज्याला जे सोयीचे ते तो घेणार. जर हा आरोप खरा असेल की, आपल्या उत्पादनांचा खप वाढावा म्हणून सौंदर्यप्रसाधनांच्या कंपन्या अंतिम निर्णयात ढवळाढवळ करतात, तर ते फार गंभीर समजले पाहिजे. १६ वर्षांनंतरच भारताची मुलगी विश्वसुंदरी का झाली? आतापर्यंत एकही सुंदरी भारतात निपजली नाही का? असे समजायचे का की, या १६ वर्षांत भारतातील सौंदर्यप्रसाधनांच्या खपात प्रचंड घट झाली आणि ती थांबून पुन्हा खप वाढावा म्हणून यावेळी भारतीय मुलीला विश्वसुंदरी बनविण्यात आले? अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. या सर्वांची सुयोग्य उत्तरे, वर सांगितलेल्या तुलनात्मक अभ्यासानंतरच देता येऊ शकतील. तसा अभ्यास कुणीतरी करायला हवा. कुणा नेत्याची लोकप्रियता किती आहे, यापेक्षा हा अभ्यास जास्त महत्त्वाचा ठरू शकेल, असे वाटते. तसेही रामदेवबाबांच्या पतंजली कंपनीने, सौंदर्यप्रसाधने बनविणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. आताशा एका बहुराष्ट्रीय कंपनीने तर ‘वेदशक्ती’ नावाची टूथपेस्ट काढली आहे. वेदांचा आणि टूथपेस्टचा काय संबंध? वेदांमध्ये, दात कशाने चमकवायचे हे सांगितले आहे की काय? तपासून बघायला हवे. सांगायचे तात्पर्य हे की, या बहुराष्ट्रीय कंपन्या प्रचंड धास्तावल्या आहेत. हीच बाब सौंदर्यप्रसाधनांचीदेखील आहे. भारतीय मुलगी विश्वसुंदरी म्हणून निवडण्यात, हेही एक कारण असू शकते. तसेही आपल्या शारीरिक सौंदर्याचे प्रदर्शन करून अमाप पैसा कमविणे, भारतीय मूल्यांच्या विपरीत आहे. पण, आता आपणही जगाच्या तुलनेत कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नये, असा विचार करून, सर्वसामान्य लोकांनी या विश्वसुंदरी स्पर्धेला स्वीकारलेले दिसते. काही हरकत नाही. काळाच्या प्रवाहात अनेकानेक नव्या गोष्टी येतात आणि काही जातात.


आम्ही काही मित्र गप्पागोष्टी करीत बसलो होतो, तेव्हा विश्वसुंदरी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. एकाने उत्साहात येऊन म्हटले की, 16 वर्षांनंतर हा मान आपल्या देशाला मिळाला आहे. दुसरा म्हणाला की, मानुषी ही आतापर्यंतच्या भारतीय विश्वसुंदर्‍यांमध्ये पाचवी आहे. कुणी म्हणाले, तिसरी. कुणी म्हणे, चौथी. एक जण तर एकेकीचे नाव घेऊन हाताची बोटे मोजू लागला. परंतु, एक जण मात्र, गमतीने सुरू असलेला हा वाद बघत आणि ऐकत होता. त्याच्या चेहर्‍यावर वेगळेच भाव होते. वादावादीत आवाजाचा स्तर वर वर चढायला लागला तेव्हा, आतापर्यंत चूप बसलेला मित्र म्हणाला, ते जाऊ द्या. आतापर्यंत भारतात किती विश्वसुंदर्‍या झाल्यात, यावर कशाला वाद घालता? चार झाल्या असतील नाही तर पाच झाल्या असतील! पण एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांची आई- जिजाबाई होऊन किती वर्षे झालीत? चारशे वर्षेतरी झाली असतील. तेव्हापासून दुसरी जिजाबाई काही तयार झाली नाही. ती पहिली आणि शेवटचीच राहणार का? त्या मित्राच्या या बोलण्याने आम्ही सर्व शरमून गप्प बसलो. त्याने आमच्या तोंडावर फेकलेल्या या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? समाज, आईवडील की आधुनिकतेचे वारे प्यायलेल्या तरुणी? 16 वर्षांनंतर भारताला विश्वसुंदरीचा ‘मानाचा’ किताब मिळवून देणार्‍या मानुषी छिल्लरचे अभिनंदन करताना, आमच्यावर त्या मित्राच्या प्रश्नाचेही उत्तर देण्याची जबाबदारी आहे, असे वाटत नाही का?

 

- श्रीनिवास वैद्य 

8446017838