महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची कालसुसंगत वाटचाल
 महा एमटीबी  20-Nov-2017


 


१९६३ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत माझी आजीव सेवक म्हणून शिक्षकपदी निवड झाली. १९६३ ते १९८५ पर्यंत बावीस वर्ष मी संस्थेच्या विविध शाखांमधून विविध पदांवर कामे केली. संस्थेतील माझी १९ वर्षांची सेवा डेक्कन जिमखाना भावे हायस्कूल म्हणजे आजच्या विमलाबाई गरवारे प्रशालेत झाली. प्रारंभी शिक्षक, नंतर उपमुख्याध्यापक व शेवटची दहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून मी सेवा केली. माझ्या आधीचे मुख्याध्यापक श्री. म. बा. शाळिग्राम हे १९७२ मध्ये जरी निवृत्त झाले, तरी १९७० पासूनच त्यांनी मला मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसविले आणि आपण दूर राहून सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. आपल्या निवृत्तीनंतर गावडे यांच्या हाती शाळा सुरक्षित राहील असा विश्वासही त्यांनी निरोपाच्या समारंभात व्यक्त केला होता.


म.ए.सो. ला प्रदीर्घ अशी शिक्षकपरंपरा स्थापनेच्या वेळचे शिक्षक संस्थापक श्री.महागावकर (१८६०) व त्याचे नंतर या वर्गाचे ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट’ या नोंदणीकृत संस्थेत १८७४ मध्ये रुपांतर करणारे वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचेपासून लाभली. स्थापनेचे वेळी पहिले खजिनदार व कार्यवाह म्हणून आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा परीसस्पर्श लाभला.


स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थेने सासवड व बारामती येथे १९०६ व १९११ साली शाळा सुरु केला. त्या काळापासून आजपर्यंत संस्था सतत वर्धिष्णू राहिली. आज संस्थेच्या ११ पूर्व प्राथमिक, ११ प्राथमिक, १४ माध्यमिक शाळा, १० कनिष्ठ महाविद्यालये व ७ उच्च शिक्षणसंस्था व पाच व्यावसायिक व उपयोजित शिक्षण देणाऱ्या शाखा असून यातून चाळीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


या वाटचालीत संस्थेच्या सतत संपर्कात राहण्याचे भाग्य मला लाभले. संस्थेच्या आधुनिक काळातील कालसुसंगत वाटचाल मला प्रशंसनीय वाटते. पारंपारिक विषयांबरोबरच जैवविविधता, जैवतंत्रज्ञान, पत्रकारिता, व संगणक विज्ञानातील अत्याधुनिक विषयांचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी करार करून चालविलेले वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम व विद्यार्थी देवाण-घेवाण, व्यवस्थापन प्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग शिक्षण, कोकणातील ग्रामीण भागासाठी रुग्णसेवा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इ. अनेक उपक्रम संस्थेने चालू केले आहेत. ‘नॅक’ चे उत्तम मानांकन महाविद्यालयांनी प्राप्त केले आहे. नीती आयोगातर्फे ‘अटल एनोव्हिटिव्ह मिशन’ तर्फे विद्यार्थ्यामधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी ‘अटल टिंकरींग लॅबोरेटरीज’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.


शिक्षणामधील कालसुसंगत बदलांमुळे शिक्षकांना सतत प्रशिक्षणाची गरज भासते. विशेषतः ग्रामीण भागातही चालणाऱ्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना सातत्याने सक्षम बनवावे लागते. यासाठी संस्थेने स्वतःची ‘शिक्षण प्रबोधनी’ चालविली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘व्यक्तिमत्व विकास केंद्र’ संस्था चालवत आहे.


मुलींचे सैनिकी शिक्षण करून त्यातून देशांला सक्षम, आत्मविश्वासू व नेतृत्वक्षमता प्राप्त असणाऱ्या महिला मिळाव्यात यासाठी ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ संस्था १९९७ पासून चालवत आहे. नुकतीच शाळेतील विद्यार्थिनीनी ४१५ कि.मी .ची ‘निर्भय भारत’ अश्वारोहण मोहीम पूर्ण केली. या सर्व समाधानाच्या व कौतुकाच्या बाबी आहेत. या शाळेतील ‘म.ए.सो. शूटींग रेंज’ आता राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजपटू घडवीत आहे.


२०११ मध्ये संस्थेने उपयोजित अनौपचारिक शिक्षण देण्यासाठी कम्युनिटी महाविद्यालय ही शाखा सुरु केली आहे. कुशल मनुष्यबळ बनविण्यासाठी व स्वतःच्या पायावर तरुण-तरुणींना उभे करण्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमही संस्था चालवित आहे. खेळाची आवड व खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी संस्था ‘क्रीडा प्रबोधिनी’ चालवत असून तेथे विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. आंतरशालेय ‘म.ए.सो करंडक’ स्पर्धाही होतात.


संस्थेने आजपर्यंत अगणित विद्यार्थी घडविले असून समाजाच्या विविध क्षेत्रात आज ते नेतृत्व करीत आहेत. बोर्डात व विद्यापीठात शेकडो विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे. हे विद्यार्थी व उत्तमोत्तम शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी संस्थेची संपदाच होत. सध्याचे संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हेही माजी विद्यार्थीच आहेत ही अभिमानाची बाब आहे. संस्थेने MES Alumni Association (MAA) नावाचा माजी विद्यार्थी-शिक्षक-सेवक संघ सुरु केल्याचे समजले. त्याचा मेळावा १९ नोव्हेंबर २०१७ ला गरवारे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब ठरली.


म.ए.सो. ची वाटचाल आता शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे चालू आहे. या वाटचालीचा एक सहभागी व साक्षीदार मीही आहे याचा मला अभिमान वाटतो. या वाटचालीस माझ्या शुभेच्छा !

- डॉ. प्र. ल. गावडे
दूरध्वनी क्रमांक – (020) 24339346
मोबाईल क्रमांक – 9850557615