असुरक्षित मुंबई नगरी
 महा एमटीबी  02-Nov-2017


 

मुंबई... देशाची आर्थिक राजधानी. अशा या मायानगरी मुंबईची एक वेगळीच खासियत...एक वेगळा रुबाब... देशातील प्रमुख शहरांच्या यादीमध्ये मुंबईने आपलं स्वतंत्र हक्काच स्थान निर्माण केलं. देशाच्या कानाकोप-यात राहणारे आणि मुंबईच्या प्रेमात पडलेले चाहते, आयुष्यात किमान एकदा तरी मुंबईची सफर करायची स्वप्नं उराशी बाळगून असतात. पुस्तकांमधून,चित्रपटांमधून मुंबईची विविध वैशिष्ट्ये, तिची धावती जीवनशैली, गजबजलेली पर्यटनस्थळे, ग्लॅमर भल्याभल्यांना भुरळ घालते. इतकंच काय तर मुंबईकर गावाला जरी गेले, तरी गावाकडची मंडळी ‘मुंबईचे पाहुणे’ म्हणून आपला खास पाहुणचार करून मुंबईविषयी तोंड भरून कौतुक करतात. आपल्याकडून मुंबईविषयी खूप काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात काय तर, आपण या स्वप्नांच्या नगरीमध्ये राहत असल्याचा सार्थ अभिमान मुंबईकरही मनोमनी बाळगून असतात. पण आता मात्र परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. कारण, ही मायानगरी दिवसेंदिवस असुरक्षिततेकड झुकत चालली आहे. कारण, मुंबई शहर असुरक्षित शहरांच्या यादीत 16व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. ‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स रुनिट’ने ‘सेफ सिटीज इंडेक्स 2017’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील 60 शहरांची एक यादी जाहीर करण्यात आली  आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 2015 मध्ये असुरक्षित 50शहरांच्या यादीत मुंबई 44व्या क्रमांकावर होती. मुंबईला चोरी, लुटमार, दरोडा, बलात्कारसारख्या घटनांचे ग्रहण लागले आहे. त्यातही मग प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मुंबईही पाण्याखाली जाते. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरही  मुंबई सातत्याने राहिली आहे. आता तर मुंबईकरांना अधूनमधून छोट्या-मोठ्या संकटांना सामोरे जावेच लागते. अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाले तर महिनाभरपूर्वीच एलफिन्सटन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत 23 जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेला मुंबईकर संध्याकाळी सुखरूप घरी येईलच, याची शाश्वती देता येत नाही. कारण, कोणत्याही क्षणी आपल्यासमोर संकट आ वासून उभं राहू शकतं आणि आपल्याला मृत्यूच्या दाढेत खेचून घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे या असुरक्षित मुंबईत प्रत्येक मुंबईकराने आपली काळजी, आपली सुरक्षा तसेच शहराच्या सुरक्षेकडे लक्ष दिलेच पाहिजे. 

 

जबाबदारीचे भान हवे!

‘इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’च्या अहवालानुसार सुरक्षित शहरांमध्ये जपानमधील टोकियो हे राजधानीचे शहर अव्वलस्थानी आहे, तर पर्यटकांनी सदैव गजबजलेले सिंगापूर हे दुस-या आणि जपानमधीलच ओसाका हे शहर तिस-या क्रमाकांवर आहे. असुरक्षित शहरांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो तो पाकिस्तानमधील कराचीचा, दुसरा म्यानमारमधील यांगूनचा आणि बांगलादेशची राजधानी ढाका आहे तिस-या स्थानावर.

तेव्हा, जगात वाढत चाललेल्या असुरक्षिततेमुळे केवळ शांतताच बाधित झाली नसून, त्याचा थेट परिणाम सारबर सुरक्षा, आरोग्यविषयक सुरक्षेवरही जाणवू लागला आहे. ‘इकॉनॉमिस्टाइंटेलिजन्स युनिट’ रा संस्थेने जगातली या सर्व प्रकारांतली सुरक्षिततेच्या निकषांवर 60 असुरक्षित शहरांची निवड करून गेल्या दोन वर्षांत यासंदर्भात त्या शहरांत काय सुधारणा झाल्या आहेत, याचा अंदाज घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुधारणा करण्यासाठी केलेल्या  उपययोजनांमध्ये  केवळ एक टक्क्याने वाढ झाली आहे. असुरक्षित शहरे भूकंपाच्या भीतीच्या छायेतही जगत आहेत. पण तिथल्या लोकांना भूकंप झाल्यास काय करावे आणि आपला जीव कसा वाचवावा, याचे रितसर प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचा सामना करण्यासाठी  मुंबईमध्ये तशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्या मानाने टोकियो भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने असे प्रशिक्षण अनिवार्य आहे.

आपल्याकडे केवळ ‘आपत्कालीन योजना’ हा शब्द तेवढ्यापुरता वापरला जातो, पण 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला आजा अशाप्रकारचे प्रशिक्षण देणे, ही काळाची गरज बनत चालली आहे.मुंबईच्या दृष्टीने विचार केल्यास, दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी सार्वजनिक ठिकाणांना सहसा अधिक टार्गेट केले जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा वाढवणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. अर्थात, आपल्याकडे हे काम केवळ पोलिसांचेच आहे, असा समज आपण करून घेतलेला असतो. परंतु, मुंबईच्या लोकसंख्येच्या विचार करता, उपलब्ध असलेली पोलिसांची ही संख्या निश्चितच तोकडी  पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी आपण एक जबाबदार नागरिक आहोत, याचे भान राखणे तितकेच गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना एखाद्या संशयास्पद हालचाली किंवा एखादी संशयास्पद वस्तू आढळल्या तात्काळ त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे. कारण, आपण थोडी सावधगिरी बाळगली तर त्यातून पुढचा अनर्थ टळू शकतो.तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ऍप्स तयार करण्यात आले आहेत. त्यांचाही वापर फायदेशीर ठरेल.

 

- सोनाली रासकर