दुश्मन ताकदवान आहे...
 महा एमटीबी  19-Nov-2017

 
 
क्षयरोगाने आपले स्वरूप विनाशकारकरित्या बदलले आहे. गेल्या वर्षी देशात २७.९ लाख क्षयरूग्णांनी नोंदणी झाली आणि त्यापैकी ४.२३ लाख रुग्ण मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे एकट्याचे दहन/दफन नक्कीच झाले नसेल. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांचे, संबंधितांचे भावविश्‍वही विनाश पावले असेल निश्‍चितच. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या आठवड्यात क्षयरोगासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात भारतामध्ये या रोगाची तीव्रता झपाट्याने वाढते आहे, असेच सूचित केले गेले. 
 
मॉस्कोमध्ये कालपरवाच क्षयरोगाचे उच्चाटन यासंबंधीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्यापक अधिवेशन आयोजित केले होते. यामध्ये ११४ देशांनी भाग घेतला होता. त्यापैकी ७५ देशांनी युद्धपातळीवर क्षयरोग निदान उच्चाटनासाठी कार्य करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
 
क्षयरोग, मानवी उत्क्रांतीसोबतच मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारा आजार. काही वर्षांपूर्वी क्षयरोगाची बाधा म्हणजे देवाघरचे बोलावणे असे पक्के ठरलेले. त्यानंतर या आजारावर औषधनिर्मिती झाली. थोडा काळ ठीक गेला, पण त्यानंतर क्षयरोगाचे जंतू अचानक इतके बलवान झाले की, ते पूर्वीच्या औषधांना दाद देईनासे झाले. क्षयरोगाचा टर्बोक्युलोसिस, टि.बी.पासून या आजाराचा भयानक प्रवास मल्टी ड्रग रेसिस्टन्स टिबी  (एमडिआर) पर्यंत झाला आहे. मनुष्याचे दुर्दैव असे की, त्याच्या उत्क्रांतीसोबतच माणसाचा विनाश करणार्‍या आजारांची आणि विकारांचीही उत्क्रांती होत आहे. 
 
क्षयरोग बरा होतो, मग त्याची भीषणता इतकी का? कारण अज्ञान तसेच सरकारतर्फे  औषधे विनामूल्य असली तरी  दोनवेळचे जेवणही नशिबी नसलेल्यांना औषधासोबत चौफेर अन्न खाणे कसे शक्य होईल? दुसरे असे की, क्षयरोगाची थुंकी तपासणीबाबत एक चाचणी आहे. त्याचा रिपोर्ट दीड महिन्यांनीच मिळतो. कारण त्यासंबंधीची यंत्रणा विशिष्ट एकदोन इस्पितळामध्येच आहे. तो रिपोर्ट मिळाल्यावरच उपचार करता येतात. मग त्या दरम्यानच्या कालावधीत रुग्णांनी काय करायचे? हातावर हात धरून क्षणाक्षणांनी शरीर पोखरणार्‍या क्षयरोगाचे स्वागत करायचे? हो. दुर्दैवाने तसेच आहे. त्यामुळे क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी जनजागृतीसोबतच या रोगाच्या विरोधी यंत्रणा कितीही खर्चिक असल्या तरी शासकीय माध्यमातून त्या विकसित होणे गरजेचे आहे. कारण दुश्मन ताकदवान आहे.
 
 
माणुसकीचा आत्मा
 
मुंबईच्या विक्रोळी उपनगरात १६ वर्षांची मुलगी आणि २० वर्षांचा मुलगा (दोघेही सख्खे भाऊ बहीण) एमडीआर टिबीने मृत पावले. सुरुवातीला झालेल्या क्षयरोगावर उपचार करून झाले होते. नंतर पुन्हा दुसर्‍यांदा क्षयरोग झाला तो एमडीआरच्या स्वरूपात. सरकारतर्फे यांना औषधे विनामूल्य मिळत होती. त्यांच्यावर उपचारही विनामूल्य झाले होते. तरीही हे दोन उमलते जीव फुलण्याआधीच कोमेजले. का? कारण, क्षयरोगासंबंधाची अवास्तव भीती, अज्ञान त्या कुटुंबामध्ये, परिसरामध्ये भरून राहिली आहे. इतकी की, या दोन मुलांना शिवडी हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी १०८ व्यवस्थेतर्फे रुग्णवाहिका आली. आईने मुलांना कसेबसे चौकात आणले. तिथे मुलं मलूल होऊन जमिनीवर निपचित पडली. त्यांना उचलून रुग्णवाहिकेमध्ये टाकायचे होते. मुलांची विधवा आईही बहुतेक टिबीची शिकार. तिच्यात मुलांना उचलण्याचे बळ नव्हतेच. त्यावेळी चौकात लोकांची गर्दी, पण कोणीही माई का लाल त्या मुलांना हात लावायला तयार झाला नाही. हा सर्व असंवेदनशीलतेचा तमाशा ही दोन्ही मरणोन्मुख मुलं हताशपणे पाहत होती. त्यानंतर  रुग्णवाहिकेमध्ये असलेले डॉक्टर आणि एका स्थानिक समाजसेविकेने या मुलांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. पुढे शिवडी हॉस्पिटलमध्ये डॉ. ललित आनंदे यांच्या मदतीने या मुलांवर तात्काळ उपचारही सुरू झाले पण क्षयरोगाने या दोन्ही भावाबहिणींची फुफ्फुसे निकामी करून टाकली होती. २४ तासांत दोन्ही भावंडे मरण पावली.
 
या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? क्षयरोग? होय. तो तर आहेच, पण क्षयरोग संसर्गजन्य रोग म्हणून लोक या रुग्णांशी इतके फटकून वागतात की, त्यापेक्षा हे जग नकोच, असे रुग्णांना वाटत असेल. त्यामुळे क्षयरोग झाला असेल तर लोक चोरून-लपून उपचार करताना आजही दिसतात.  तसेच रोगाच्या अवास्तव भीतीने आणि अज्ञानानेही लोक रुग्णांशी अमानवी वर्तन करतात. असो, भरचौकात दोघे भाऊ -बहीण आपल्याला रुग्णवाहिकेमध्ये कोणी तरी उचलून टाकेल, अशी वाट पाहत होते. त्यावेळी मृत्यूसमोर उभ्या असलेल्या या दोघांना माणसाचे, समाजाचे शेवटचे दर्शन काय दिसले असेल? समाजात माणुसकी नाही, माणसात राम राहिलेला नाही हेच. क्षयरोगाचे उच्चाटन करायलाच हवे, माणूस जगवायचा असेल तर ते गरजेचे आहेच पण समाजातल्या असंवेदनशीलतेच्या राक्षसाला कसे मारायचे? माणुसकीचा आत्मा कसा जागवायचा?