एनआयए सेफ हाऊस
 महा एमटीबी  19-Nov-2017

 
 
 
‘इंडियन मुजाहिदीन’चा खतरनाक दहशतवादी यासीन भटकळ याच्या कारवायांवर बेतलेली ‘उसबा - थरार एका दहशतवादी टोळीच्या खात्म्याचा’ ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली. वरिष्ठ पत्रकार, लेखक दिनेश कानजी यांनी या कादंबरीच्या माध्यमातून दहशतवादाच्या इतिहासातील एक काळेकुट्ट प्रकरण उघड केले आहे. चंद्रकला प्रकाशन, पुणे यांच्या या बहुचर्चित कादंबरीतील एक प्रकरण देत आहोत.
 
एनआयए सेफ हाऊस (दिल्लीत अज्ञात स्थळी असलेले फार्म हाऊस) 
७ ऑगस्ट २०१३...

 दिल्लीतील अज्ञात स्थळी असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये अंधार्‍या खोलीत खुर्चीवर परवेज मुसा बसला होता. त्याचे दोन्ही हात बांधले होते. दिल्लीत एनआयएची अनेक सेफ हाऊस आहेत. काही एखाद्या फ्लॅटमध्ये, काही वरकरणी गोदामवाटेल अशा बॅरेकमध्ये. पण, आठ एकरांवर पसरलेले हे फार्म हाऊस अत्यंत खास होते. फार्म हाऊसचे कंपाऊंड आठ फूट उंच होते. एनआयएच्या ताब्यात एखादा मोठा मासा आला की, त्याच्यासाठी ही खास व्यवस्था होती. हे फार्म हाऊस इंटरॉगेशनसाठी वापरले जाते, याची सर्वसामान्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. बडा आरोपी एनआयएच्या हाती आला की, त्याची डायरीत एण्ट्री करण्याआधी त्याला इथे आणले जात असे. मीडियातल्या लोकांसाठी हे ठिकाण अज्ञात होते. पोलीस दलातील लोकांनाही या सेफ हाऊसचा वासवारा नव्हता. मुसा हा आयएममधला मगरमच्छ होता. काही दिवस आयबीच्या ताब्यात राहिल्यानंतर त्याला थेट इथे आणण्यात आले होते.
 
तीन दिवस केलेल्या मारहाणीमुळे त्याच्या शरीरातील एकेक पेशी ठणकत होती. रोज त्याला जिलेब्या खाऊ घातल्या जायच्या. पण, ही दावत नव्हती. ही एनआयएच्या इंटरॉगेशनची विशेष पद्धत होती. जिलब्या खाल्ल्यामुळे त्याला प्रचंड झोप यायची. पण, त्याला झोपण्याची परवानगी नव्हती. पेंगण्याचीही नव्हती. झोप नसल्यामुळे त्याचा मेंदू शिणलेला. त्या अंधार्‍या खोलीतील खुर्चीवर तो सुन्न होऊन बसला होता. खोलीच्या बाहेर एनआयए चीफ, डायरेक्टर जनरल अरूप त्यागी एका टेंटेड काचेतून त्याचे निरीक्षण करीत होते. पोलीस उपायुक्त रामसिंह नेगी त्यांच्यासोबत होते. ‘‘रामसिंह, हे प्रकरण मी तुमच्यावर सोपवलंय. मुसा खतरनाक आहे आणि चलाख देखील. त्याच्याकडून माहिती मिळवणे सोपे नाही. पाकिस्तानातल्या त्याच्या हॅण्डलरना याच्या अटकेची बातमी मिळण्यापूर्वी आपल्याला याला बोलता करावा लागेल. आयबीच्या ऑफिसर्सनी त्याच्याकडून आयएमचे अड्डे, त्याच्या साथीदारांची नावे अशी बरीच माहिती काढून घेतली आहे. त्याच्यावर आपण वर्कआऊटही सुरू केले आहे. त्यामुळे तुमचा भार थोडा हलका झाला आहे. तुम्ही त्याच्याकडून आयएमची ‘मोडस ऑपरेंडी’ तपशीलवार समजावून घ्या. तो खोटं बोलणार नाही, पण अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्याच्याकडून काहीही सुटायला नको. तुमच्या सोबत आणखी सहा ऑफिसर आहेत. तीन शिफ्टमध्ये कामचालू दे, गो अहेड!’’ अशी सूचना देऊन त्यागी निघाले. ‘‘आय विल ट्राय माय बेस्ट सर!’’ असे आश्वासन देऊन रामसिंह नेगी यांनी त्यांना निरोप दिला.
 
रामसिंह नेगी हे एकेकाळी दिल्ली क्राईमब्रँचची शान होते. गुंतागुंतीची प्रकरणे हातोहात सोडवणे, ही त्यांची विशेषता. उत्तमअकॅडमिक करिअर असलेल्या नेगी यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या प्रोफेसरसारखे होते. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून(जीएलसी) त्यांनी डिग्री घेतली होती. कदाचित त्यामुळेच थर्ड डिग्री वापरल्याशिवाय गुन्हेगाराला बोलते करण्याची कला त्यांना साध्य होती. उंगली टेढी केल्याशिवाय घी काढण्याचे कसब त्यांना साधले होते. मुसासाठी आता त्यांना उंगली टेढी करण्याची गरजही उरली नव्हती. ते कामइतरांनी गेले तीन दिवस जबाबदारीने केले होते. नेगी इंटरॉगेशन रुममध्ये दाखल झाले. खुर्चीत पेंगणार्‍या मुसाने त्यांची चाहूल लागताच मान वर करून पाहिले.
 
सलग तीन रात्री झोप न मिळाल्यामुळे त्याचे डोळे तारवटले होते. पिंजारलेले केस, लालसर डोळे आणि त्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्याचा चेहरा सैतानासारखा भयंकर दिसत होता. डोक्यावर आठ्या घालून तो नेगी यांच्याकडे पाहात होता. ‘‘मुसा, तुला ठाऊक असलेली प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचे काममाझ्यावर सोपवण्यात आले आहे. तू सहकार्य केलेस, तर तुझाही त्रास वाचेल आणि माझेही श्रमवाचतील.’’
 
नेगींची प्रस्तावना ऐकून त्याही स्थितीत मुसा हसला. ‘‘बोला ना जनाब, तुम्हाला काय माहिती हवी आहे. मला जे करायचे होते, ते मी केले. अल्लाची जितकी खिदमत माझ्या नशिबी होती, ती माझ्या हातून घडली. आता इंडियन गव्हर्नमेंट मला जिवंतपणी सोडणार नाही याची मला खात्री आहे. मला आणखी मार सोसवणार नाही, तुम्हालाही तकलीफ देण्याची माझी इच्छा नाही. तुम्ही विचारा प्रश्न, मला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट सांगायला माझी ना नाही.’’
 
नेगींची नजर मुसाच्या डोळ्यावर होती. त्यात कोणत्याही भावनेचा लवलेश नव्हता. कोणतेही भय नव्हते, अगदी मृत्यूचेही. केलेल्या घातपातांचा त्याला पश्चाताप नव्हता. ‘‘गुड मुसा! तू माझे कष्ट वाचवलेस. आता मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे, कोणताही तपशील न गाळता, काहीही न लपवता सांगशील अशी अपेक्षा आहे. माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास, तर जे काही होईल त्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. मी केवळ तुझ्या माहितीवर अवलंबून नाही. तुझा साथीदारही आमच्याकडे आहे आणि इतर बरेच तुरुंगात आहेत.’’
‘‘बोला जनाब! मी तयार आहे.’’
 
‘‘ठिक आहे, सुरूवातीपासून सुरूवात करू. तुझ्या घराबद्दल, बालपणाबद्दल सांग?’’
 
  ‘‘मी मूळचा कर्नाटकचा. भटकळ हे माझे गाव. माझे अब्बा मोहम्मद झरार हे व्यावसायिक आहेत. ते दुबईत असतात. लहानपणापासून माझे त्यांच्याशी कधी पटले नाही. त्यांची विचार करण्याची पद्धत खूपच वेगळी होती. ते सतत धंद्याबद्दल बोलायचे. पैसा त्यांचे सर्वस्व होते. मला ते कधीच पटले नाही. त्यामुळे लहानपणापासून आमच्यात दुरावा होता. ते तबलीग जमातचे बंदे होते. तीन-चार महिन्यातून एकदा ते भारतात येत. दहा-बारा दिवस मुक्कामकरत आणि पुन्हा दुबईला परतत. माझ्या शैक्षणिक प्रगतीबाबत ते नेहमी नाराज असत. माझा ओढा शिक्षणापेक्षा कुराणाकडे होता. शिक्षणामुळे मेंदूमध्ये गोंधळ निर्माण होतो, माणूस अल्लाच्या शिकवणीपासून भरटकतो, असे माझे ठाममत होते. मी दहावीनंतर शिक्षण सोडले. त्यामुळे त्यांची नाराजी आणखीनच वाढली. मला त्याची पर्वा नव्हती.
 
मी भटकळमधल्या जसीमइक्बाल सईदी आणि सलीमईशाकी या मित्रांच्या संपर्कात राहू लागलो. आम्ही इस्लामची चर्चा करायचो. इस्लामवर प्रकाश टाकणार्‍या नसीमहिजाजी या लेखकाने लिहीलेले ‘दास्तॉं-ए-इमान-फरोशोंकी’, ‘सुलतान सलाउद्दीन अयुबी’, या पुस्तकांची आम्ही चर्चा करीत असू. मकदूमकॉलनीतली जामिया मशीद, गोल मशिदीजवळची लोवाना कॉम्प्लेक्स इथे आमची चर्चा होत असे. दरम्यान, पोटापाण्यासाठी मी काही व्यवसाय करून पाहिले. मुंबईत भेंडी बाजारमध्ये आमचे वडिलोपार्जित घर होते. मी मुंबईच्या कपडा मार्केटमधून लुंगी आणून भटकळमध्ये विकण्याचा व्यवसाय सुरू केला. अम्मीने या धंद्यासाठी भांडवल म्हणून मला पाच हजार रूपये दिले. रमजानमध्ये खजुराचा व्यवसायही करून पाहिला. भटकळमधले माझे मित्र सलीमईशाकी आणि समीऊल्ला या धंद्यात माझे भागीदार होते. पण हा व्यवसायही तोट्यात गेला. सरकारने ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’वर (सिमी) बंदी घातल्याचे मला मुंबई भेटीत समजले. माझ्या मस्तकात भडका उडाला. दोन धंदे आतबट्‌ट्याचे ठरल्यानंतर अखेर भटकळमधल्या नूर मशिदीजवळ मी युनानी औषधे आणि अत्तराचा व्यवसाय सुरू केला. या धंद्यात मौलाना शीश माझे भागीदार होते. मुंबईत खार पाली हिलला राहणार्‍या अब्दुल असद या मित्राने माझा मौलाना शीश यांच्याशी परिचय करून दिला. मौलाना शीश यांचा इस्लामचा गाढा अभ्यास होता. त्यांचे वक्तृत्व आक्रमक होते. ते ‘अहले हदीस’चे अनुयायी होते. पैगंबराने सांगितलेली तत्वे जशीच्या तशी पालन करण्यावर या पंथाचा भर असतो. सौदी अरबमध्ये या चळवळीची सुरूवात झाली. तेच ‘अहले हदीस’चे मुख्य केंद्र. ‘अहले हदीस’च्या प्रसारासाठी तिथून भरपूर पैसा येतो. मौलाना शीश यांच्यामुळे मी प्रचंड प्रभावित झालो. त्यांनी माझे आयुष्य बदलले. भटकळमधले मुस्लीमहे नवमुस्लीमआहेत. हजार वर्षांपूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला, असे मानले जाते. ते नयावती बोली बोलतात. पारसी, गुजराती आणि कोंकणी या तीन भाषांचा संकर म्हणजे नयावती. व्यापारी वृत्तीचे हे लोक मोठ्या संख्येने व्यवसायानिमित्त दुबई आणि सौदीमध्ये आहेत. प्रत्येक घरातला एक माणूस तिथे आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत या भागात होणार्‍या जातीय दंगलींमुळे त्यांच्यात कट्टरता वाढली आहे. या बदलत्या माहौलमध्ये भेटलेल्या काही लोकांमुळे इस्लामबाबत माझे विचार अधिक कडवे होत गेले. मौलाना शीश यांच्याशी मी इस्लामबद्दल चर्चा केली. इस्लामबद्दल माझ्या ज्ञानाची त्यांनी अगदीच किव केली. मी मात्र त्यांची इस्लामची जाण पाहून खूपच प्रभावित झालो. मी ‘अहले हदीस’चा स्वीकार केला. पैगंबराने स्वीकारलेली जीवनशैली म्हणजे ‘अहले हदीस.’ माझ्या दिनचर्येवर ‘अहले हदीस’चा प्रभाव दिसू लागला. मी दाढी वाढवली, वेशभूषा बदलली. माझ्यात इतका बदल झाला की, माझ्या घरचे लोक, शेजारी मला हसू लागले, पण मला त्यांची पर्वा नव्हती. मौलाना शीश यांच्यासोबत मी पहिल्यांदा इक्बाल भटकळला भेटलो. नूर मशिदीजवळचे आमचे अत्तराचे दुकान अंजुमन इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. कॉलेजमध्ये शिकणारे दरभंगा, नालंदा, गाझियाबाद, मुजफ्फराबादचे विद्यार्थी माझ्या दुकानावर नियमितपणे येत असत. भटकळचा निवासी असलेला साजिद सलाफीचाही यात समावेश होता. हा रियाज भटकळचा चुलतभाऊ होता.
 
 हे कॉलेज भटकळमधील तरूणांचे महत्त्वाचे केंद्र होते. जुम्म्याच्या नमाजसाठी कॉलेजच्या कॅम्पसचा वापर होत असे. देशभरातले मुस्लीमविद्यार्थी अंजुमनमध्ये शिकण्यासाठी येत. त्यामुळे ‘सिमी’ने हे आपल्या कारवायांचे केंद्र बनवले. तौकीर नावाचा तरूण ‘सिमी’च्या कारवायांचा म्होरक्या होता. कॉलेजच्या प्रिन्सिपलचा या कारवायांना जोरदार विरोध होता. पण परीस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यांच्या विरोधाला न जुमानता तौकीरच्या कारवाया सुरू होत्या.
 
कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आमचा राबता वाढला. भेटींचा सिलसिला वाढू लागला. कधी कधी रात्रभर आम्ही जिहादबद्दल चर्चा करीत असू. त्यानंतर जगभरात चाललेल्या जिहादच्या यशासाठी सर्व एकत्र नमाज पढत असू. आमचा गट पुढे पुढे खूप घट्ट आणि एकजीव होत गेला. या गटात दरभंगातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. इंडियन मुजाहिदीनच्या दरभंगा मोड्युलची बीजेही इथेच पडली. 
 
-दिनेश कानजी